Friday 31 August 2018

पोरक्या लेकरांचं जग : भाग 11


कुणीच पालक नाहीत आणि कुणाला तरी लांबचे का होईना पालक, नातेवाईक आहेत अशा दोन प्रकारची 'अनाथ' मंडळी संस्थेत वास्तव्यास असायची. पालकत्वाची जबाबदारी स्वतःहून नाकारणारे आणि सो कोल्ड नैतिक व्यवस्थेमुळे झालेली अनाथ बालके ही जणू निर्मिती प्रक्रिया अनाथालयांचा कणा होता की काय वाटत राहायचं. कारण ही प्रक्रिया अव्याहतपणे चालूच असायची. पालकत्त्वाची जबाबदारी नाकारणारी असंख्य बेगडी, स्वार्थी नातीही याच मुशीत पाहायला मिळाली. एकीच्या पालकांनी मुलीला 4 वर्षाची असताना संस्थेत दाखल केलं आणि ती एकदम 18 वर्षाची झाल्यावर घरी घेऊन जाण्यासाठी उगवले. 
मला सख्खी कोणतीही नाती नाहीत पण ज्यांची डोळ्यासमोर नाती दिसायची त्याचेही अनेक पैलू हळूहळू इथंच उलगडत गेले. 
तिघा भावंडांना रेल्वे ट्रॅकखाली सोडून देणारा सख्खा बाप, स्वतःच्याच पोरीवर जबरदस्ती करणारा बाप, भाऊ, पहिलं लग्नं फसलं म्हणून दुसरं लग्नं करायच्या आधीच पहिल्या नवऱ्याची मुलं संस्थेत सोडून जाणारी जन्मदात्री, घटस्फोट झाला म्हणून मुलांची जबाबदारी नाकारणारे पालक, 2-4 एकर शेती असलेल्या आजीने 7,8 वर्षाच्या दोघा नातवांना सांभाळता येत नाही म्हणून अनाथालयात आणून सोडले. आई घरातून निघून गेली/वारली पण वडील सांभाळू शकत नाही; यासारखी कितीतरी समाजमान्य नाती केवळ पालकत्व न निभावण्याच्या फोल कारणांनी संस्थेतील अनाथांची संख्या वाढवत असायची. संस्थेला जितक्या बालकांची मंजुरी तितकी बालकं असायचीच. अर्थातच यात मुलांचा दोष नव्हता. पण आपली पुरुष प्रधान संस्कृती बाईनंच पालकत्व निभवावं, अशी असल्यानं बऱ्याच कमी शिक्षित आया, आज्या आपल्या लेकरांना अनाथालयात सोडून जायच्या. 
दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत अशी पालक असलेली मुलं सुट्टी संपवून पुन्हा संस्थेत दाखल व्हायची तेव्हा त्यांच्याकडे घरचा खाऊ, नवीन 3, 4 ड्रेस (जो आम्हाला फक्त एकच मिळायचा), शॅम्पू, तेलाची बाटली, पावडर मेकअपचं सामान असं काय काय घेऊन यायची. ही सगळी हौस मौज करायला यांच्याकडे पैसे आहेत आणि स्वतःचं पोर सांभाळायला संस्था कशाला हवी? असे प्रश्न तेव्हा मला पडायचे. त्यातील काही मुलांना त्यांच्याच पालकांकडून धोका आहे हे कळल्यावर ‘स्व ओळख’ ही अडचण सोडता आमच्यापेक्षा या पालक असलेल्या मुलांची अवस्था दयनीय आहे, हे लक्षात यायला लागलं. 
मी समाजमान्य नात्यांनी जन्मले नाही, मला का टाकलं? अनैतिक, पाप असे अनेक अनुत्तरित प्रश्न माझ्या मनात थैमान घालायचे. पण तेव्हाच समाजमान्य नात्यांनीही फार काही मोठा तीर मारला नाही, हेही वेगवेगळ्या अनुभवांनी अधोरेखित व्हायचं.
कधीतरी एका क्षणी मी एका मोठ्या ताईला जिला आई होती नकळत भांडणात बोलून गेले. 'तुमच्या घरी टीव्ही, फ्रिज, स्वतःच घर आहे. अगदी तुला तुझी आई आहे (तेरे पास माँ हैं टाईप) तर इथं अनाथ म्हणून कशाला राहतेस? फुकट सगळं मिळतं म्हणून आलात ना? आईचा भार कमी करायला? तू तुझ्या आईकडून लाड करून घेतेस आणि इथंही करून घेतेस.'
एवढं बोलल्यावर तिने अंगावरचा फ्रॉक काढला आणि उघडी छाती दाखवली. म्हणाली “बघ गाये, मी रात्रभर घराच्या बाहेर उभी राहावी म्हणून आईनं मला कसे चटके दिलेत. एक काका आला होता तिच्याकडे झोपायला. छोट्याश्या खोलीत मला झोपायला जागा नव्हती. मग रात्रीचा पहारा मला द्यायला लावला तिने घराबाहेर उभं करून. तेव्हापासून मला आईची घाण वाटते. तुला बरंय तुझी आई किमान किती पुरुषांबरोबर झोपते हे तुला कळत नाही. पण, मला दर सुट्टीत तिचे वेगवेगळे पुरुष पहायला मिळतात. माझी आई जगाला दाखवत नाही पण मला माहितीये ती वेश्या आहे. आता बघ, 18 पूर्ण होऊन मी संस्था सोडायचीच ती वाट पाहतेय. मग ती माझं लग्नं लावून देईल तिच्या एका यारासोबत” हे सांगताना तिच्या डोळ्यातलं पाणी त्या चटका बसलेल्या फोडावरून घरंगळत गेलं. डोळ्यातल्या खाऱ्या पाण्यामुळे तर तिची जखम जास्तच चरचरीत झाली. “एक हात नाहीच आहे आपल्याला या दुःखापेक्षा एक हात सडका आहे आणि तो आपण काढूच शकत नाही आपल्या शरीरातून याचं दुःख क्षणाक्षणाला बोचत असतं गं.” 
माझं ते वाक्य तिला इतकं लागलं की त्याच वर्षी तिने संस्थेला राम राम ठोकला. कालांतराने तिची माझी सहज रस्त्यावर गाठ पडली तेव्हा लक्षात आलं की संस्थेतील वातावरण किमान मुलींसाठी तरी जास्त सुरक्षित होतं. दुदैवाने तिच्या बाबतीत फारच वाईट झालं. 24 तास दारूत बुडलेला घोड नवरा, मारहाण, शिवीगाळ, 3 पोरं या पलीकडे तिचा संसार नाही.
हे सगळं पाहून बरं झालं आपलं आयुष्य कुणा पालकांच्या ताब्यात नाही या जाणिवेने स्वतःचं अनाथपण साजरं करावसं वाटायचं. 18 वर्षानंतर आपणच आपले माय-बाप ही संकल्पना 'समाजमान्य' नात्यांची अनेक फोल उदाहरणं पाहिल्यावर मनाला स्पर्शून जायची. तरीही समाजमान्य नात्यांच्या अनेक चांगल्या पैलूंचं गारुड माझ्या मनावर आहेच. त्यामुळेच समाजमान्य नात्यांचा हव्यास अनेक वर्ष टिकून राहिला आहे.
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment