Friday 3 August 2018

बीडचा जरेवाडी पॅटर्न- 2

जरेवाडी शाळा सध्या आठवीपर्यंत आहे. संदीप पवार सर सांगतात, '1995 साली मी रूजू झालो तेव्हा सहा विद्यार्थी अचानक शाळेत यायचे बंद झाले. चौकशी केली. तेव्हा कळलं की या गावातील बहुतेक लोक ऊसतोडणी कामगार म्हणून स्थलांतर करतात. मुलंही सोबत जातात आणि शिक्षणाची लिंक तुटते. बऱ्याचदा मुलांची शाळा कायमची थांबते. मुलांनी गाव सोडलं तर त्यांना पुन्हा शाळेकडे आणणे अवघड होते. मी गावकऱ्यांशी सातत्याने बोलून मुलांना नातेवाईकांकडे किंवा आजी- आजोबांकडे ठेवायची विनंती केली. वेळप्रसंगी मुलांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची जबाबदारी आम्ही उचलली आणि मुलांचं स्थलांतर पूर्णपणे थांबविलं.'
जरेवाडीच्या शाळेत 2014 साली ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह उभारण्यात आलं. वित्त आयोग तसंच जिल्हा परिषदेचे सभापती संदीप क्षीरसागर यांच्या मदतीतून जमा झालेल्या एकूण 15 लाख रूपयांतून हे वसतिगृह बांधण्यात आलं. स्थलांतरित कामगार परतेपर्यंत त्यांच्या मुलांची राहण्या-खाण्याची व्यवस्था, कपडे, साबण, तेल अशा जीवनावश्यक वस्तू या वसतिगृहाद्वारे पुरविल्या जातात. त्यामुळे कितीतरी मुलं शाळाबाह्य होण्यापासून वाचली.
जरेवाडी शाळेचं काम बघून लोक स्वेच्छेने मदत देतात. बीडचे उपशिक्षण सभापती धैर्यशील सोळंके यांच्याकडून 51 हजार रुपये तर इतरांकडून सव्वालाखापर्यंतची लोकवर्गणी जमा झाली आहे. मुलांना सोडवायला येणाऱ्या गाड्यांच्या ड्रायव्हर्सनेही सात हजारांची मदत केली. ऊसतोडणी कामगारांना स्नेहसंमेलन पाहता यावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून ते उन्हाळ्यात आयोजित केलं जातं. या स्नेहसंमेलनात लोक स्वेच्छेने मुलांना बक्षीसे जाहीर करतात, त्यातूनही दीड- पावणेदोन लाखांपर्यंतचा निधी जमा होतो. तो शाळेच्या विकासासाठी वापरला जातो.
जरेवाडी शाळेने नुकतंच तासाला 500 लीटर पाणी शुद्ध करणारे हायटेक मशीन बसविलं आहे. पालक आणि ग्रामस्थांनी एका महिन्यात सुमारे 1,34,400 रुपये जमा केले आणि सप्टेंबर 2017 मध्ये या निधीतून वॉटर प्युरिफायर बसवला.
2013 साली सरांना आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. हा प्रोग्राम संपूर्ण गावाने एका मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह पहिला. त्यावेळी गावाने चांगले काम करणाऱ्या 11 शिक्षकांचा त्याच दिवशी कृतज्ञतापूर्वक सत्कार केला. गेली 22 वर्षे पवार सर जरेवाडी शाळेत कार्यरत आहेत. सरांची बदली करण्याचा झालेला प्रयत्न, गावकऱ्यांनी पार हायकोर्टात जाऊन बदलीच्या निर्णयाला स्थगिती आणून हाणून पडला. उत्तम गुणवत्तापूर्ण शाळा बनविणाऱ्या शिक्षकांना त्याच शाळेत आणखी काही वर्षे सेवा करता येईल, असे आदेश काढण्यात आले.
सुरूवातीला 24 मुलं असणाऱ्या या शाळेत आता 590 मुलं शिकतात आणि 18 शिक्षक कार्यरत आहेत. जरेवाडीच्या शाळेत प्रवेशासाठी प्रतिक्षा यादी असते. लोक आपल्या नातेवाईकांकडे मुलांना ठेवून किंवा त्यांच्यासाठी भाड्याची खोली करून या शाळेत शिकवितात. कारण त्यांना गुणवत्तेची खात्री असते. 'पवार सरांना दुसऱ्या एखाद्या प्रकल्पावर काम करायला सरकारने बोलावलं तर काय होईल?' या मी विचारलेल्या प्रश्नाला आजोबांनी बोलकं उत्तर दिलं, ‘हा देवमाऩूस आहे. राहू द्या या गुरजींना आमच्याच गावात, त्यांना कुठेच नका नेऊ!'

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

No comments:

Post a Comment