Wednesday 8 August 2018

'लोकांनी, लोकांसाठी चालविलेले रूग्णालय’

आपल्या खिशाला परवडेल अशी चांगली आरोग्य सेवा आपल्याला कुठं मिळू शकेल का? या प्रश्नाला, ‘होय, मिळू शकेल’, असं उत्तर नांदेड येथील रयत आरोग्य मंडळाने दिलं आहे. माफक दरात योग्य व समाधानकारक रूग्ण सेवा देता येऊ शकते, हे गेल्या 13 वर्षाच्या अथक रूग्ण सेवेनंतर त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश खुरसाळे हे रयत आरोग्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. 21 सदस्यांची कार्यकारिणी रयत रूग्णालयाचा कारभार चालवते. प्रत्येक सदस्याकडून 25 हजार रूपये देणगी घेऊन रूग्णालय सुरू करण्यात आलं. डॉ. खुरसाळे म्हणतात, “समाजाला दवाखान्याची गरज असते. त्यामुळे समाजातील विविध स्तरातील व्यक्तींनी एकत्र येऊन, भांडवली खर्च करून दवाखाना उभा करायला हवा. तसंच रूग्णांकडून रास्त शुल्क घेऊन तो चालवला पाहिजे. या विचाराने माझ्यासह नांदेडमधील सुप्रसिद्ध डॉक्टर, प्रतिष्ठीत व्यक्ती, व्यापारी आम्ही एकत्र येऊन हे हॉस्पीटल सुरू केलं.” ‘लोकांनी, लोकांसाठी चालविलेले रूग्णालय’ हे या हॉस्पीटलचं वैशिष्टयं आणि तत्त्वं. 
नांदेड येथील कला मंदिर भागात राजेश लॉजच्या तीन मजली इमारतीत एक लाख रूपये मासिक भाड्याचा करार करून, 3 जुलै 2005 रोजी रयत रूग्णालय सुरू झालं. पुढे 2008 मध्ये ही जागा विक्रीस निघाली. भाड्यापोटी वर्षाला 12 लाख रूपये जात होतेच. म्हणून मग जागाचं विकत घेण्याचा निर्णय संस्थेने घेतला. या जागेची किंमत 1 कोटी 5 लाख रूपये सांगण्यात आली. जागा घ्यायची ठरवली. पण रयत आरोग्य मंडळाकडे एवढी रक्कम नव्हतीच. संस्थेने समाजातील 100 दानशूर व्यक्तीकडून एक लाख रूपये बिन व्याजी ठेवीच्या स्वरुपात गोळा करायचं ठरवलं, आणि बघता बघता फक्त महिन्याभरात दीड कोटी रूपये जमा झाले. त्यातील एक कोटी रूपये घेऊन उर्वरित रक्कम कार्यकारी मंडळाने लोकांना परत केले. तर उर्वरित एक कोटी रूपये दरमहा दोन व्यक्ती असा लकी ड्रा काढून ठेवीदारांना परत केले. आता रयत रूग्णालयाची हक्काची जागा झाली.
अनेक ठेवीदारांनी आपली रक्कम परत न घेता रयतलाच आग्रहाने देणगी म्हणून दिली. हा समाजाने रयत आरोग्य मंडळ करत असलेल्या कार्याला दिलेला मोठा पाठिंबाच होता.
रयत कार्यकारिणीने आरोग्य सेवांचे दर पत्रक रूग्णालयातील प्रत्येक विभागात सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी लावण्याची व्यवस्था केली. त्यामुळे रयतमध्ये येणार्‍या प्रत्येक रूग्णाला तेथे लावलेल्या दर पत्रकाप्रमाणे फी देणं व डॉक्टरांना ती घेणे बंधन कारक आहे.
2005 मध्ये रूग्णांच्या प्रथम तपासणीचा दर होता 30 रूपये व फेरतपासणी दर 20 रूपये होता. तर आज 2018 मध्ये रयत रूग्णालयातील प्रथम तपासणीचा दर आहे 50 रूपये आणि फेरतपासणी दर आहे 40 रूपये. पॅथालॉजीतील तपासण्याचे दर शहरातील खाजगी पॅथालॉजी पेक्षा 40 टक्के कमी आहेत. तर रूग्णालयात राहून उपचार करून घेण्यासाठी प्रतीबेड 130 तर स्पेशल रूम 400 रूपये भाडे आकारण्यात येतं. यामध्ये डॉक्टर व्हिजिट, नर्सिंग अशा सर्व सेवा अंतर्भूत आहेत, कुठल्याही प्रकारचे छुपे दर घेतले जात नाहीत. हे रयतचं वैशिष्ट्य.
रयतमध्ये मोठं ऑपरेशन केलं तर औषध गोळयासह सात ते आठ हजार रूपयांत होतं, तर फ्रॅक्चर, अ‍ॅपेंडिस्क, गर्भाशय अशा छोटया शस्त्रक्रीया फक्त चार-पाच हजार रूपयांच्या आत होतात. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर चालवले जाणारे औषध दुकान इथं आहे. यात सर्व जेनरिक औषधांची विक्री केली जाते.
रयतमध्ये 30 रूम आहेत. दोन स्पेशल रूम, दोन ऑपरेशन थिएटर, एक पॅथालॉजी, बाहयरूग्ण विभाग, अस्थि रोग विभाग, स्त्री रोग विभाग, त्वचा रोग विभाग, जनरल फिजिशिअन विभाग आहेत. या विभागात नांदेडमधील अनुभवी, तज्ज्ञ असे विविध विषयातील डॉक्टर अत्यल्प मानधनावर सेवा देतात. यात डॉ. सुरेश खुरसाळे, डॉ. केंद्रे, डॉ. अर्जून मापारे, डॉ. महाले, डॉ. मंगला देशमुख, डॉ. मनिषा खुरसाळे, निवृत्त सी.एस. डॉ. एन.जी. राठौड आदींचा समावेश आहे. तर 50 पगारी कर्मचारी रूग्णालयात कार्यरत आहेत. विविध क्षेत्रातून निवृत्त झालेले अनेक अधिकारी व कर्मचारी रयत रूग्णालयाचे प्रशासन सांभाळतात.
रयतच्या बाह्यरूग्ण विभागातून रोज 80 ते 90 पेशंट उपचार घेतात. तर रोज 25 ते 30 रूग्ण उपचारासाठी दवाखान्यात दाखल होतात. बेवारस वृद्धांना कोणीतरी रयतमध्ये दाखलं करून जातं, तेव्हा त्याचा खाण्यापिण्याचा, औषधोपचारापर्यंतचा सर्व खर्च रयत प्रशासन करतं. रयतच्या उपचारांनी बरं झाल्यानंतर एका बेवारस वृद्धाने रयतला घड्याळ भेट दिलं होतं, त्या वृद्धाचं ते घडयाळ म्हणजे रयतच्या सर्व टीमसाठी मोठा पुरस्कार होता. तर कै. इंदूताई व मनोहर काळीकर या पती-पत्नीने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व मालमत्ता रयतला दान केली आहे. त्यांची आठवण म्हणून रयतनेही त्यांच्या क्ष-किरण विभागाला त्यांचे नाव दिलं आहे. रयतच्या कार्याची दखल घेत, स्टेट बँक ऑफ इंडियाने रयतला 10 लाख रूपयांची कार्डियाक एम्बुलन्स भेट दिली. तर एलआयसी ऑफ इंडियाने 25 लाख रूपयांचे डायलीसीस युनिट दिलं आहे.
माफक दरातील आरोग्य सेवा देऊन देखील रयत आज पैशाच्या बाबतीत स्वावलंबी आहे. लोकांमुळेच रयत रूग्णालयाचे नाव आणि ‘लोकांनी,लोकांचे, लोकांसाठी चालविलेले रूग्णालय’ हे तत्त्वं सार्थक झालं आहे.
आता वर्षातून दोनदा स्माईल ट्रेनचे संचालक डॉ. गुरूप्रताप सिंघजी प्लास्टीक सर्जरीचे मोफत शिबीर घेतात. यामध्ये ज्या रूग्णांना शारिरीक व्यंगामुळे अपंगत्व आलयं, अशा रूग्णांची प्राधन्याने प्लास्टीक सर्जरी करून त्यांचे अपंगत्व दूर केलं जातं.
स्वस्त आयसीयुची व्यवस्था करण्याची रयत आरोग्य मंडळाची इच्छा आहे. परंतु आयसीयुत पूर्णवेळ काम करणारे चांगले डॉक्टर्स बाहेरची भरपूर पैसा मिळणारी प्रॅक्टीस सोडून रयतमध्ये काम करण्यास तयार नाहीत. परिणामी आज तरी रयतचं स्वस्त आय.सी.यु.ची सुविधा देण्याचं स्वप्न अपूर्ण आहे.
रयत रूग्णालय 
- उन्मेष गौरकर.

No comments:

Post a Comment