Friday 3 August 2018

ला माझ्याबरोबर, या रुग्णालयात...

सायंकाळची वेळ. मंद स्वरात सुरू असलेलं संगीत. प्रसन्न वातावरण. औषधी वनस्पतींचं उद्यान. प्रसुती झालेल्या महिलांना आराम करण्यासाठी खास व्यवस्था. ॠृतूमानानुसार घ्यायची काळजी, आहार याचं ध्वनिक्षेपकावरून केलं जाणारं मार्गदर्शन. श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या नावांचे कक्ष, रुग्णांची माहिती देणारा फलक. हे आहे, नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव इथलं सरकारी ग्रामीण रुग्णालय. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या आठ वर्षाच्या अथक प्रयत्नांतून कायापालट केलेलं. सलग दोन वर्ष डॉ. आनंदीबाई जोशी
पुरस्कारावर आपली मोहर उमटवणारं. एरवी, सरकारी रुग्णालय म्हटलं की डॉक्टरांची वाट बघणारी रुग्णांची गर्दी, अस्वच्छता, दुर्गंधीयुक्त दर्प हे सवयीचं झालेलं. नांदगाव ग्रामीण रुग्णालय याहून वेगळं नव्हतं. २०१०-११ मध्ये डॉ. बोरसे यांनी रुग्णालयाचा कारभार हाती घेतला आणि चित्र पालटू लागलं. डॉ. बोरसे स्त्रीरोग-प्रसूती तज्ञ असल्याने त्यांनी सरकारी रुग्णालयातील प्रसूतीसंख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले. तेव्हा वर्षाला ७०-८० बाळंतपणं होत असत. त्यांनी जोखमीच्या बाळंतपणासाठी पीपीच किट (पोस्ट पार्टम हॅमरेज) तयार केलं. बाळंतपणात मोठा रक्तस्त्राव झाल्यास, तातडीने द्यायची औषधं आणि गरजेचं सामान याचा हा बटवाच जणू! गरोदर मातांचा रक्तदाब वाढला, तर त्यांना काही वेळा झटके येतात. यामुळे तिच्या जीविताला धोका निर्माण होतो. अशा जोखीमीच्या मातांना त्यांची शारिरीक स्थिती लक्षात घेऊन प्राथमिक उपचार करत नाशिक जिल्हा रुग्णालय किंवा मालेगाव इथे पाठवण्यात येतं. अर्थात अशी वेळ आता खूप कमी वेळा येते. कारण इथं 24 तास आणि 7 ही दिवस डॉक्टर आणि त्यांचे सहकारी हजर राहून पेशंटवर उपचार करत असतात. यामुळे आज रुग्णालयात जोखीमसह होणाऱ्या बाळंतपणाची संख्या एक हजारावर पोचली आहे.
डॉ. बोरसे म्हणतात, “आजवरचा हा प्रवास सोपा नव्हता. मी काम करतो म्हणून मला पगार मिळतो अशीच भावना कर्मचारी किंवा अन्य अधिकाऱ्यांची आहे. पण मला वाटतं, मला देशसेवा करायची संधी मिळते यासाठी मी काम करतो, हा विचार मी माझ्या सर्व सहकाऱ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचा विश्वास संपादन करता यावा यासाठी त्यांना जास्तीतजास्त चांगली सेवा कशा देता येईल, याकडे आम्ही लक्ष दिलं."
रुग्णालयाच्या आवारातील साईबाबा मंदिरात ग्रामस्थांसाठी योगवर्ग सुरू केला आहे. त्याच ठिकाणी ११ आयुर्वेदिक औषधी झाडं लावली आहेत. झाडांच्या गुणधर्मांची माहिती देणारे फलकही आहेत. रुग्णालयपरिसरात स्वच्छता राहील याकडे सर्वांचं बारकाईने लक्ष असतं. रुग्णालयात आता टोकन सिस्टीम आणि सर्व कामाचं संगणकीकरण करणार असल्याचंही डॉ रोहन बोरसे म्हणाले.
- प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment