Friday 3 August 2018

मानवता झाली 'साकार'


राजस आणि तेजस जुळी भावंडं. छान गोलमटोल दिसतात. कुणाला खरं तरी वाटेल का की, ५ वर्षांपूर्वी औरंगाबादमधल्या साकार अनाथाश्रमात ती दाखल झाली, तेव्हा ७०० आणि ८०० ग्रॅम वजनाची होती. अपघातानं किंवा असहाय्यतेतून जन्माला आलेलीे. साकारच्या वर्षभराच्या अथक प्रयत्नांमुळेच आणि त्यांच्या स्वतःच्या जगण्याच्या झगड्यानं ती जगली आणि पुढल्या ६ महिन्यातच त्यांच्या नवीन मातापित्यांची लाडकी बनून त्यांच्या हक्काच्या घरी गेली.
शून्य ते ६ वयापर्यंतच्या बेघर, अनाथ मुलांना चांगले पालक आणि मूल नसणाऱ्या पालकांना बाळ मिळवून द्यायला झटणारी 'साकार'. १९९९ मध्ये डॉ. सविता पानट आणि इतर अनेक जणांच्या, स्वयंसेवी भावनेतून आकाराला आली. स्वयंसेवी संस्था आणि स्पेशलाईज्ड अडॉप्शन एजन्सी SAA. साकारच्या टीमला मुलांच्या सर्वांगीण विकासाचा, पारदर्शक कार्यपद्धतीचा ध्यास आहे. त्यापोटी ते लागेल ती पदरमोड करतात.
"सहा वर्षांपर्यंत मुलांना दत्तक पालक मिळाले नाहीत तर त्यांना सहा वर्षांपुढच्या मुलांसाठी असलेल्या आश्रमात पाठवावं लागतं. आमच्यासाठीच ते जास्त कठीण असतं." नीलिमा सुभेदार सांगत होत्या.
"मुलांना त्यांच्या हक्काचं घर मिळणं, यासारखा दुसरा आनंद नाही. पण गतिमंद, दिव्यांग मुलांना स्वीकारायला पटकन कोणी तयार होत नाहीत, याचं दु:ख आहे. त्यांच्यासाठी विशेष सोयीसुविधा असलेले आश्रम अभावाने आढळतात." याबाबतीत सरकारी पातळीवरून लक्ष देण्याची गरज नीलिमाताई व्यक्त करतात.
साकारच्या टीममध्ये आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्टही आहेत. प्रत्येक बाळाच्या तब्येतीच्या गरजेनुसार त्याचा पोषक आहार ठरवून दिलेला असतो. निरीक्षणांची नोंद, या नोंदींचा आढावा, त्यानुसार कार्यवाही. कामाच्या सर्व टप्प्यातली विश्वसनीयता, स्वच्छता, सुसूत्र काम, टीममध्ये प्रेमळ, सहकार्याची, समर्पित भावना हे खासच.
साकारमध्ये २० मुलांच्या राहण्यासाठी शासकीय मंजुरी आणि सोय आहे.
मुलांच्या कपड्यांचा, खाऊचा, इतर संगोपनाचा, आणि इतर असा महिन्याला ४ लाख रुपये खर्च येतो. शासनाकडून मिळणारी मदत या खर्चाच्या तुलनेत जेमतेम १५ ते २० टक्के. अगदी छोटी बाळं असल्यामुळे त्यांना बाहेरचं दूध देणं जिकिरीचं. त्यासाठी लॅक्टोजन नं १ ही दुधाची पावडरच महिन्याला १२० डबे लागते, शिवाय सेरेलेक पावडर, मालीशसाठी खोबरेल तेल, डेटॉल, औषधं आणि जेवणाचं सामान यासाठी मदतीची गरज आहेच. शिवाय दिव्यांग मुलांना बाहेर नेणं-आणणं,खेळणं यासाठी स्वयंसेवकांची, पालकांची आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या छोट्या सवंगड्यांची साथ 'साकार'ला मुलांना हवी आहे. 
-गीतांजली रणशूर.

No comments:

Post a Comment