Friday 31 August 2018

पोरक्या लेकरांचं जग : भाग 3


आजही तो प्रसंग आठवतो. पाच-सहा वर्षाची मुलं खेळत होती अंगणात. आभाळाकडे बघत ‘विमान, विमान चिठ्ठी दे’चा नुसता गजर चालू होता. का तर म्हणे, असं डोक्यावरून विमान गेलं आणि त्याला आपली नखं दाखवली तर नखांवर लगेच पांढरे डाग पडतात. आणि ते डाग त्या विमानाची चिठ्ठी असते. ती चिठ्ठी त्यांच्या प्रिय आई-बाबांची असते म्हणे! हा खेळ नुकताच त्यांना शिकवला होता एका देणगीदाराने. त्यामुळे डोक्यावरुन जाणा-या विमानाला त्या चिल्लर पार्टीने बरोब्बर हेरलं होतं. आता चिठ्ठी नक्की आपल्याला वाचायला मिळणार, या आशेने ते बेंबीच्या देठापासून ओरडत सुटले होते. 
अंगण काही फार मोठं नव्हतं. लहानग्यांबरोबरच १० ते १४ वर्षांची मुले-मुलीसुध्दा खेळायला आली होती अंगणात. त्या आम्हा मोठ्या मुला-मुलींच्या घोळक्यात ‘आईचं पत्र हरवलं’ हा खेळ रमला होता. 
पण लहानग्यांच्या आरडा-ओरडीमुळे ते पत्रं नक्की कुणाच्या मागे पडणार हे कळेनासं झालं. जिच्यावर राज्यं होतं तिचा आवाजही येत नव्हता. म्हणून त्यातल्याच एका दांडग्या मुलानं उठून या लहानग्यांवर रुबाब दाखवायला सुरवात केली. एका चिमुकल्यानं त्या दादाचा धपाटाही खाल्ला. तेव्हा थोडा गलका कमी झाला. पुन्हा दहा मिनिटांनी ही चिल्लर पार्टी ओरडायला लागली. ‘विमान विमान चिठ्ठी दे’, ‘विमान विमान चिठ्ठी दे’, मग या मोठ्यांनाही चेव चढला. ‘आईचं पत्रं हरवलं ते मल्ला सापडलं’. दोन्हीत सरमिसळ झाली. ‘चिठ्ठी’ हरवली की ‘पत्रं दे’ असा काहीसा गोंधळ ही त्यांच्यात निर्माण झाला. 
तेवढ्यात आकाशातून एका चिमणीच्या चोचीतून तिचं पिल्लू त्या लहान मुलांच्या घोळक्यात पडलं. चिठ्ठीचा आवाज एकदम बंद झाला. ते पिल्लू फार उंचावरुन पडलं नसल्याने, थोडीशी हालचाल करत होतं. चोचीतून थोडं रक्तही येतं होतं त्याच्या. ‘पिल्लू पडलं, पिल्लू पडलं’ म्हणत ही चिल्लर पार्टी घाबरली. त्यांच्या चेह-यावर कमालीचं आश्चर्य होतं. त्या पिल्लाची आई, अशी कशी चोचीतून त्याला ढकलून निघून गेली? आता पत्रं आणि चिठ्ठीचा गलका थांबला. सगळे त्या पिल्लाकडे धावले. एका मोठया मुलीनं त्या पिल्लाला स्वत:च्या मांडीवर ठेवलं. ती त्या पिल्लाला कुरवाळायला लागली. ‘आई येईल हं तुझी न्यायला’ म्हणून त्याला समजावायला लागली. त्यातल्याच एका चिमुकल्यानं अंगणात असलेल्या हंड्यातलं पाणी ओंजळीतून पाजायला सुरवात केली. सगळे जण त्याची तासभर देखभाल करत होते. कुणी हात लावून पहात होतं, कुणी त्याला वारा घालत होतं. 
तेव्हढ्यात अंगणात या मुलांवर लक्ष ठेवणा-या बाईंनी फर्मान सोडलं. ‘चला खेळायची वेळ संपली, जेवायला चला’. मुलं तिथून हालत नव्हती. सगळे जण तिला गलका करत सांगायला गेले की, आम्हाला एक पिल्लू सापडलंय. त्याला खूप लागलं आहे. थोडं रक्तही येतंय. त्याला आपण थोडा वरण-भात देऊया का? बाईंनाही फार काही विचार करायला वेळ नव्हता. संस्थेच्या आवारात प्राणी-पक्षी आणायचे नाहीत. माहितीये नं तुम्हाला?’ झालं....मुलं काही आत जायला तयार नव्हती. ती म्हणाली, ‘त्या पिल्लाला आत घ्यायचंय आम्हाला. त्याची आई थोड्या वेळाने येईल आणि घेऊन जाईल. तोपर्यंत आपण किमान त्याला बलं कलून खायला तली घालू!' बाईंनी फार न लक्ष देता त्या सगळ्यांना आत नेलं. पिल्लासकट!!
मुलांच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की, पिल्लू मलूल होऊन पडलंय. प्रतिसाद देत नाहीये. पाणीही पित नाहीये. एकाच्या डोळ्यात पाणी यायला सुरुवात झाली. तो जोरात रडायला लागला. 'अरे पिल्लू मेलंय ते...! ' त्याबरोबर प्रत्येकाने पिल्लाला हात लावून पाहत खरंच ते मेलंय का खात्री करायला सुरुवात केली. काहींच्या डोळ्यातून पाणी आलं तर काही एकदम गप्पं बसले. काही कावरे बावरे झाले. 
आता या पिल्लाचं करायचं काय?
त्यातल्याच एका दादाने सांगितलं. ‘मी टिव्हीत बघितलंय. मेलेल्या माणसाचे आई-बाबा, ताई-दादा, आज्जी-आजोबा असे सगळे जण मेलेल्या माणसाला जमिनीत पुरतात. तेव्हा डोक्यावर फडकं लावलेला एक माणूस काहीतरी श्लोक म्हणतो. मग आपणही या पिल्लाचे खोटे खोटे आई- बाबा, आजी- आजोबा, ताई-दादा होऊया. अंगणात खड्डा खणू, त्यात त्याला पुरुया. 
सगळ्यांनी आपापला रोल ठरवला. त्यातलाच एक चिमुकला पुढं आला. डोक्यावर रुमाल बांधला. त्या मुलांकडे बघून श्लोक कुठला म्हणू असं विचारायला लागला. तेव्हा एक मुलगी त्याच्या अंगावर खेकसली, ‘अरे आपल्याला शिकवलेली प्रार्थना म्हण नं! तो म्हणायला लागला, ‘इतनी शक्ती हमे देना दाता.. मन का विश्वास कमजोर हो ना...’
आईच्या चोचीतून पडलेल्या पिलाची शोकसभा आणि ‘इतनी शक्ती हमे दे नं दाता’. कोण कुणाला धीर देत होतं ते मला आजतागायत समजेना. 
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment