Friday 31 August 2018

पोरक्या लेकराचं जग :भाग 7


आ...ई, या दोनच अक्षरांत मी अनेक वर्षे वेगवेगळ्या विचारांनी अडकले होते. अजूनही अडकले आहे. आई या नात्याचा खरा लळा लागला तो माझ्या एका मैत्रिणीच्या आईमुळे! ती भरभरून प्रेम करायची. पण कुठंतरी काहीतरी हातच राखून आहे असंही वाटत राहायचं.
हे हातचं राखणं म्हणजे नेमकं काय, ते काही कुमारी मातांच्या अनुभवामुळे कळत गेलं. कुमारी मातांमधलं ममत्व कोरडं असतं, हे मी लहानपणापासून अनुभवत आले. ज्या माता स्वतःच्या पोटच्या गोळ्याला ममत्व देऊ शकत नाहीत त्या दुसऱ्याला काय देतील? हा विचार एकीकडे. पण दुसरीकडे वर्षाची आई, जना, श्रीरंगची आई यांच्या अनुभवामुळे आई काय चीज असते हे कायमचं कोरलं गेलं.
वर्षाची आई. सातव्या महिन्याचं पोट घेऊन संस्थेत आली होती. तिचं घराणं घरंदाज, राजकीय प्रस्थवालं ! बयो शिकत होती कॉलेजला. मामाच्या मित्रावर तिचं प्रेम. बऱ्याचशा माता निराश मनानं इथं 'रिकामं' व्हायला यायच्या. पण हिला तसं 'रिकामं' व्हावं असं, वाटत नव्हतं. गरोदरपण एन्जॉय करायची ती. तिला भेटायला आलेल्यांसमोर, आता बाळ इथं सोडणारच आहे, तर किमान सोडताना पोटातल्या बाळाचे लाड तरी पुरवा म्हणून 'मला हे खावंसं वाटतंय , ते खावंसं वाटतंय' म्हणून काहीबाही पालकांकडे मागत राहायची. पालकही मग खाण्यातले सगळे लाड पुरवायचे. संस्थेच्या लायब्ररीत दासबोध होता, हे तिनेच शोधून काढलं. रोज रात्री झोपताना न चुकता तो वाचायची. चिंचा, कैऱ्या तर तिच्या उशाशी असायच्याच. ते ती आम्हालाही द्यायची. खारीक, बदाम, काजू असेही श्रीमंती पदार्थही तिच्याकडे असायचे. मग काय 'खाण्यापूर्ती गट्टी' आमच्यात होतीच की!! तिच्या एकूण वागण्याबोलण्यात कसलाच गिल्ट नसायचा. संस्थेतल्या कामावरच्या बायका तिला 'रांडेला सवय दिसतेय कूस उजवायची, बघा किती बिनधास्त खिदळतेय कशी. लाज नाही कसलीच या पोरीला, घराचं नाव वेशीला टांगली आणि इथंही मजा करतेय.' वगैरे बोलून तिला इतर जास्तीची कामं सांगायच्या. पण बयो या सगळ्याकडे दुर्लक्षच करायची. कुणाचं लक्ष नसताना एकटीच कोपरा पकडून पोटातल्या बाळाशी बोबडं काहीतरी बोलत असायची, तासन् तास. त्या बाळाला धीर द्यायची, 'मी आहे कायम तुझ्यासोबत आहे.' एकटीच हुंदके देऊनदेऊन रडायची. त्या बाळासोबतचा सगळा संवाद कमालीचा ममतेचा.
ही आपल्या बाळाला का सोडून देणार आहे? मला प्रश्न पडायचा. 'काश मेरी भी माँ...' या वाक्यावर लगेच माझी कॅसेट अडकायची. लैच इमोशनल व्हायचे मग. एकंदरीत नको असलेलं मूल सोडतात हे एव्हाना मला कळलं होतं. पण हवी असलेली मुलंही का सोडतात, की सोडावी लागतात, हे माहीत नव्हतं.
बयो बाळंतीण झाली. छान गोंडस गोरेगोमटं बाळ. नर्सकडून स्वतःहून मागून घेत अचानकपणे तिनं इतके दिवस साठवलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. जिवाच्या आकांतानं ती धाय मोकलून रडायलाच लागली. तिची हॉस्पिटलमध्ये समजूत घालता घालता, डॉक्टर, नर्स, कामवाल्या बायकांच्या नाकी नऊ आले. शेवटी तिच्या आईवडिलांना बोलावलं.
कधीही याबाबतीत मोकळेपणाने न बोलणारी ती बयो तिच्या बाबांना एवढंच वारंवार सांगत होती. 'बाबा मी तुमच्या पायाशी राहते पण माझ्या बाळाला माझ्यापाशी राहुद्या, घरात, गावाकडच्या शेतात एका झोपडीत कुणाला दिसणार नाही असे दिवस काढेन, तुमच्या अब्रूला धक्का लागेल असं वागणार नाही पण मला याच्यापासून तोडू नका....' तिची एकेक वाक्य सर्वांच्याच काळजाला खिंडार पाडत होती आणि ते कोवळं पिल्लू आपल्या आईकडे टकमक निरागसतेनं हलकंच हसत होतं.
बयोचे हतबल आईवडील, डॉक्टर, नर्स, कामवाल्या बायका आणि हा नैतिकतेच्या कचाट्यात अडकलेला दुर्बल समाज तरी कशी आणि काय तिची समजूत घालणार होता?
(मजकुरात उल्लेखलेल्या व्यक्तींची नावं बदलली आहेत.)
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment