Friday 31 August 2018

पोरक्या लेकरांचं जग: भाग 5


अनाथालयात बाळ ज्या ज्या अवस्थेत सापडतं किंवा येतं त्याचे वेगवेगळे अगम्य प्रसंग माझ्या मनात कोरत होते. हे होत असनाच ज्या मुली,बायका बाळ संस्थेत ठेवायला यायच्या त्या कुमारीमाता, विधवा, परितक्त्या याही माझ्या डोळ्यासमोरून आजही हलत नाहीत. माझ्याशी असा काही फार त्यांच्यासोबत संवाद होता अशातला भाग नव्हता. तात्पुरत्या सोयीसाठी अडगळीत जगणं त्यांनी मान्य केलं होतं. कुणाशीही न बोलणं, न मिसळणं, खाली मान घालून पश्चातापात बुडालेल्या. सुटका करून घेणं ,या एकाच विचारानं वावरायच्या. संस्थेतील कामवाल्या बायका त्यांच्याशी 'अग भवाने तू सुख भोगलीस ना आता बाळाला तरी दूध दे ' म्हणून भांडायच्या. त्यांच्यातलं हे भांडण समजायला इयत्ता 7वी गाठावी लागली मला. त्या का दूध पाजत नाहीत या कोड्याची उकल व्हायला मी सरिताच्या आईशी मैत्री कारणीभूत ठरली. (नाव बदललं आहे)आम्ही या बाळंतीण झालेल्या किंवा बाळंतपणासाठी आलेल्या मातांना त्यांच्या बाळांच्या नावाने हाक मारायचो. पण बाळंतपणाच्या आधी मावशी म्हणायचो. 
गेले 8 दिवस शाळा सुटल्यावर माझ्या पाठीमागे एक मुलगा लागला होता. तो मला शाळा ते संस्था असं सोडायला यायचा. म्हणजे न बोलता पाठीमागूनच! आज एकदम हिंमत करून त्यानं मला विचारलंच नव्हे सांगितलंच... 'आय लव यु' ,'मला तू आवडतेस गायु'
तेच्या मारी !!!मला आयुष्यात कुणीही गायु म्हणून हाक मारली नाही. गाये, म्हशे, भवाने, उंडगे.....लैच सभ्य कुणी बोललं तर गायत्री बस्स . पण हा एकदम गायु??? एकदम हृदयाची तार छेडली गेली त्याच्या त्या गायु या एका उच्चाराने!! 
म्हणून जरा ते आय लव यु समजलं नाही पण 'गायु'मुळे थेट भावनाच त्याच्या कळल्या मला. जळलं पाघळले ना मी ! आयुष्यात लाजणे काय प्रकार असतो तेव्हा कळलं. मी त्याच्याशी न बोलता घरी आले(संस्थेत) आले. पण जाम खुशीत होते. आपण कुणालातरी आवडतोय हे भावनाच फार ग्रेट होती माझ्यासाठी. 
आता ही इतकी महत्त्वाची घटना सांगू कुणाला? सरीच्या आईला येऊन 15 दिवस झाले होते. खरंतर ती माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठी म्हणजे असेल 14 वर्षाची . आठ दिवसच झाले होते तिला बाळ होऊन. त्या बाळाचं नाव आमच्या एका मोठ्या ताईने ठेवलं होतं 'सरिता'. 
तर सरीची आई मला सापडली तो आनंद सांगायला.कधी कधी शाळेतल्या मैत्रिणींच्या गप्पा तिला सांगायचे, गणित तिच्याकडूनच मी समजून घेत होते. म्हणून माझं तिचं जरा पटत होतं. मी आपलं तिला 'आय लव यु' म्हणजे काय असतं ग विचारायला सुरुवात केली. तिला काही कळेना . ही एकदम आज असं का विचारतेय. तिनं मला एकदम विचारलं, तू अशी का लाजतेय? काय झालं? मी फार आढेवेढे न घेता सरळ झालेला प्रसंग सांगितला. 
'ये आता तुही माझ्या लायनीत' म्हणत तिनं मला झाडायला सुरुवात केली . ही मुलं असंच मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि पोटूशी बनवतात. म्हणून रडायला सुरुवात केली तिनं. तो शिरप्याही तसाच त्यानंही असंच प्रेमाचं नाटक केलं , कपडे काढायला लावले आणि शरीराला चटक लावली स्पर्शाची आणि गरोदर केलं बघ. 
मी हँग!!! मला सेक्स, शरीराची चटक वगैरे काही माहीत नव्हतं. त्यात चूक कशाला आणि का म्हणायची हेही उमगत नव्हतं. 
मी आपलं बाळबोधपणानं सर्व विचारत राहिले तिला. तिनंही हुंदके देत शिरप्यानं तिला फसवल्याची कहाणी सांगितली. तेव्हा माझ्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला, शारीरिक संबंध आणि अनैतिक संबंधातील फरक. 'प्रेम हे अनैतिक संबंधाचा जन्मदाता आहे', हा चुकीचा धडाही मी पहिल्यांदा तिच्याकडूनच गिरवला. त्यानंतर कुमारीमातांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. मीही अनैतिक संबंधातून, नकारातून जन्माला आल्याची बोच मला अस्वस्थ करायला लागली. स्वतःचीच एकप्रकारे घाण वाटायला लागली. या विचारातून बाहेर पडण्यासाठी किती आणि कसा काळ गेला, हे न कळलेलेच बरं.
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment