Monday 27 August 2018

मिसबाह आता शाळेत रमली आहे

बीडमधील गेवराई तालुक्यातील टोकाचं एक गाव, शनिचे राक्षसभुवन. या गावातील जिल्हा परिषद शाळा. शाळेला भेट दिली तेव्हा अनेक विद्यार्थी त्यांची खेळणी म्हणजेच बाहुली, बॉल, कार घेऊन आले होते नंतर शिक्षकांनी ती खेळणी एकत्र केली आणि त्या खेळण्यांच्या नावाच्या कार्डबोर्डच्या चिठ्ठ्याही एकत्रीत केल्या. मग पहिलीत नुकताच प्रवेश घेतलेले विद्यार्थी त्या ढिगातून नेमकं आपलं खेळणं उचलून आणत होते आणि सोबत त्याच्या नावाची चिठ्ठीही उचलत होते. शाळा सुरू होऊन एक महिनाही होत नाही, तोवर हे विद्यार्थी शब्द ओळखू शकतात, हे या शाळेत राबविल्या जाणाऱ्या ज्ञानरचनावादाचे आणि शिक्षकांच्या मेहनतीचे यश आहे.
जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी 2015 साली विस्ताराधिकारी प्रवीण काळम-पाटील यांच्या नेतृत्त्वात बीडमधील शिक्षकांनी सातारा जिल्ह्यातील प्रगत कुमठे बीटला भेट दिली. ज्ञानरचनावादाची संकल्पना, त्यासाठीच्या युक्त्या आणि अगदी अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांनाही कसं तयार करावं, याचे धडे या भेटीतून मिळाल्याचे राक्षसभुवन शाळेचे अशोक निकाळजे सर सांगतात. "कुमठे बीटमध्ये हे सगळं जाणून घेताना मला आमच्या शाळेतील मिसबाह आणि रोहन या दोन अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांची सारखी आठवण येत होती. राक्षसभुवनला परतताच मी पहिलीचा वर्ग अध्यापनासाठी मागून घेतला, जेणेकरून मुळापासून ज्ञानरचनावादाची पेरणी करता येईल" निकाळजे सर बोलत होते.
"मिसबाह आणि रोहन यांना पहिलीपासूनच शाळेत रमविण्याचं मुख्य ध्येय मी ठरविलं होतं. मिसबाह गतिमंद आहे तर रोहन कर्णबधीर मुलगा आहे. सुरूवातीला हे दोघं वर्गात स्थिरही बसू शकायचे नाहीत, रोहन तर सारखा रडायचा. त्यांना वर्गात किंवा वर्गाबाहेर पाहिजे तिथे जायची मुभा मी देऊन टाकली. वर्गातील ज्ञानरचनावादी साहित्याला किंवा कुठल्याही खेळण्याला हात लावायलाही परवानगी होती."
त्याचा परिणाम असा झाला की मिसबाह आणि रोहन शाळेत रमले. शिवाय निकाळजे सरांनी वर्गातल्या मित्र-मैत्रिणींनाही या दोघांची चेष्टा न करता त्यांच्याशी मैत्री करायला शिकविलं. वयानुरूप आता हे दोघं चौथीत आहेत. पहिल्यांदा वर्गातही न बसू शकणारी मिसबाह आता धूळपाटीवर मुळाक्षरे गिरविते. सांगितलेला शब्द फळ्यावर किंवा जमिनीवर लिहून दाखविते. रोहनलाही आता अंक ओळख झाली असून, त्याला आता कर्णबधीर मुलांच्या शाळेत दाखल केल्याचं निकाळजे सर सांगतात.
या शाळेचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे शिक्षकांनी तयार केलेला लमाण, वडार, पारधी आणि कहार या बोलीभाषांचा शब्दकोश. राक्षसभुवन शाळा आणि आजूबाजूच्या परिसरातील जि.प. शाळांत या समाजाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येतात. बऱ्याचदा नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांना मुलांचे अनेक शब्द समजत नाहीत आणि विद्यार्थ्यांनाही नेमके मराठी शब्द माहीत नसतात. ही अडचण सोडवून त्यांची भाषा शिक्षकांना कळावी आणि मुलांनाही मराठी शब्द कळावेत म्हणून विद्यार्थ्यांच्याच मदतीने सुमारे साडेतीन हजार शब्दांचा हा शब्दकोश राक्षसभुवन शाळेतील शिक्षकांसह गूळज केंद्रातील इतर शिक्षकांनी तयार केला आहे.

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

No comments:

Post a Comment