Friday 3 August 2018

आणि शाळेत जाण्याची पायपीट वाचली

''गेल्या वर्षी आम्हाला चालत शाळेत जावं लागायचं. शाळा दोन किलोमीटरवर मोहखेडला. यंदा मात्र हा त्रास वाचला आहे. उन्हा-पावसाचीही आता चिंता नाही ''. सहावीतली अलका व्हरकटे सांगत होती. अलकाप्रमाणेच दीपाली, राजकन्या आणि व्हरकटवाडीतली ४४ मुलं पायपीट वाचल्यामुळे खूष आहेत.




बीड जिल्ह्यातल्या किल्लेधारूर तालुक्यातलं व्हरकटवाडी. लोकसंख्या साधारण ८००. गेल्या वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्री ग्राम सामाजिक विकास परिवर्तन अभियानात गावाची निवड झाली. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच शाश्वत विकासासह गावं सक्षम करणं, हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. अभियानाअंतर्गत गावात अनेक कामं सुरू झाली खरी, पण गावात अजूनही एस टी नसल्याची खंत ग्रामस्थांना होती. विशेषतः, मुलांना शाळेत जा - ये करायला पायपीट करावी लागायची. गावातली शाळा चौथीपर्यंत. वरच्या इयत्तांची शाळा मोहखेडलाच. 
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तक दीपक पवळ, सरपंच ललिता राम व्हरकटे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यात मोलाचं सहकार्य लाभलं माजलगाव एस टी आगाराचे व्यवस्थापक दत्ता काळव पाटील यांचं. जूनपासून सुरू झालेली माजलगाव आगाराची माजलगाव - अंबाजोगाई बस या गावातून जाते. यामुळे व्हरकटवाडीच्या मुलामुलींची शिक्षणाची गाडी चालू झाली आहे. गावकऱ्यांनासुद्धा थेट अंबाजोगाईला जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. गावात पहिल्यांदाच आगमन झालेल्या एस टीचं गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केलं. 
- राजेश राऊत.

No comments:

Post a Comment