Friday 31 August 2018

विक्रमगडचा सर्पमित्र

“सकाळची वेळ. फोन वाजला. यशवंत नगरमधील प्रमोद डंबाळी यांच्या घरावर साप दिसल्याने त्यांनी फोन केला होता. घरात सगळे घाबरले होते. मी लगेचच बाहेर पडलो. एक विषारी नाग घराच्या कौलांवर बसला होता. मी घरावर चढलो. वर कौलं असल्याने चढणं सोपं नव्हतं. तरीही मी तिथे चढलो.कधीही पाय घसरुन पडण्याची भीती वाटत होती. तरीही, तो विषारी नाग पकडला. मात्र, खाली उतरत असताना दोन वेळा पाय घसरला. मनातून थोडी भीती वाटत होती. कारण हातात विषारी साप. तोल गेला तर साप हातातून सुटेल आणि आणि आंगावर पडला तर विषारी दंशाची भीती. स्वत:ला सावरत खूपप काळजीपूर्वक खाली उतरलो.” गोपाळ दीक्षित सांगत होते. आणि आवाजातूनही त्या वेळचा थरार डोळ्यासमोर उभा राहत होता.
पालघर जिल्ह्यातलं विक्रमगड. येथील गोपाळ दीक्षित. विक्रमगड हायस्कूलमध्ये ते शिक्षक आहेत. सर्प मित्र ही सरांची दुसरी ओळख. कुठे साप दिसला की ''दीक्षित सरांना फोन करा'' हेच वाक्य अनेकांच्या तोंडी अगदी सहज येतं.
सापांविषयीच्या गैर समजामुळे साप दिसताच त्याला ठार मारण्यात येतं. वास्तविक, साप हा पर्यावरणाच्या जीवनचक्रातील महत्त्वाचा घटक. गोपाळ दीक्षित हे 19 वर्षांपासून साप वाचविण्याचे काम करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 1700 सापांना जीवनदान दिलं आहे. विशेष म्हणजे कुठंही साप पकडायला ते स्व-खर्चाने जातात. त्यासाठी काही मानधनही घेत नाहीत.
दीक्षित यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून त्यांना ‘सर्प मित्र’ म्हणून ओळखपत्र मिळालेलं आहे. आणि असं ओळखपत्र मिळवणारे ते पालघर जिल्ह्यातील ते पहिलेच आहेत. त्यांनी अनेक संस्थांसोबत पर्यावरण विषयक जनजागृतीमध्ये सहभाग घेतला आहे. विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा परिसरात वन विभागाच्या साहाय्याने वन्यजीव संवर्धनामध्ये त्यांनी मोलाचे सहकार्य केलं आहे.
नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजलं जातं. पण, साप दूध पीत नाही. सापाची शरीर रचना मांसाहारी असल्याने तो दगावतो. शेतकऱ्यांचा मित्र ही खरी सापाची ओळख.शेतीसाठी उपद्रवी ठरणाऱ्या उंदरांना साप खातो. त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान होत नाही. भारतात सापाच्या 263 जाती आहेत. यापैकी काही बिनविषारी, विषारी व काही सौम्य विषारी आहेत. मात्र, बिनविषारी सापांचे प्रमाण जास्त आहे.
नाग, मण्यार, घोणस, फुरसे, रातसर्प, पोवळा व समुद्रसाप हे विषारी आहेत. मांजऱ्या, हरणटोळ, रेतीसर्प आदी सौम्य विषारी. धामण, मांडूळ, कवड्या, गवत्या, धूळनागीण, पाणदिवड, चित्रांक, नायकूळ व डुरक्या इत्यादी बिनविषारी साप आहेत. पालघर व ठाणे जिल्ह्यात 23 प्रकारचे साप आढळतात. अशी माहिती गोपाळ दीक्षित यांनी दिली. त्यांनी आत्तापर्यंत विविध जातीचे साप पकडून विक्रमगड, जव्हार, डहाणू परीसरातील जंगलात सोडले आहेत. शाळा-काॅलेजमधील विद्यार्थी तसेच शेतकरी बांधव, दुर्गम डोंगराळ भागातील लोक यांना विषारी-बिनविषारी सापांविषयी माहिती देऊन अंधश्रध्दा, गैरसमज दूर करणे, सर्प हत्या थांबविणे, सर्प दंश झाल्यास प्रथमोपचाराची माहिती देणे आणि सापांचे महत्व समजावून देणे, मूल्यशिक्षण, पर्यावरण, परिसर, विज्ञान या विषयांशी संबधित माहिती देणे या उद्दिष्टांच्या पूर्तीकरता सर्पविषयक जनजागृतीची शिबिरे वन विभागाच्या सहकार्याने घेणार असल्याचे दीक्षित सरांनी सांगितलं.
दीक्षित सांगतात, “वन विभागाच्या सहाय्याने अनेक सापाना जीवनदान देणं शक्य झालं. दुर्गम भागात आपला जीव धोक्यात घालून निसर्गाचं, पर्यावरणाचं संतुलन राखण्यास जे सर्पमित्र मदत करतात त्यांची सुरक्षा त्यांना किमान विमा कवच वनविभाग व महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दयावं, तसंच सर्पमित्रांना मानधन देण्यात यावं. प्रत्येक तालुक्यात सर्प पकडण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यायी साधने उपलब्ध करून द्यावीत.”
- सचिन भोईर.

No comments:

Post a Comment