Friday 3 August 2018

..आणि त्याने डोळे उघडले

सकाळी साडेसहाची वेळ. बारा वर्षाच्या अमितला शाळेत जाण्यासाठी आई उठवायला गेली. डोळे उघडणे दूरच... पण तो आवाजाला प्रतिसादही देईना. आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने तडक नांदगाव ग्रामीण रुग्णालय गाठलं. डॉ. रोहन बोरसे यांनी त्या मुलाची अवस्था पाहिली. त्याला विषारी साप चावल्याचं लक्षात आलं. तातडीने त्याच्यावर उपचार सुरू झाले. व्हेंटीलेटर नसल्याने व्हेंटीलेटरची ट्युब नाकात घालून कृत्रीम उपचार सुरू केले. दुसरीकडे सर्पदंशाशी संबधित इंजेक्शन देण्यास सुरूवात केली. औषधांचा मारा सुरू राहिला. तीन तासात २७ इंजेक्शनं घेतल्यानंतर त्या मुलाने डोळे उघडले. प्रतिसाद देण्यास सुरूवात केली. हे पाहताच डॉ. बोरसे आणि मुलाच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, पुढील उपचारासाठी त्याला मालेगावला पाठविण्यात आलं. दोनच दिवसात अमित हसत खेळत घरी परतला. शुभवार्ता कळवण्यासाठी अमितचं सर्व कुटुंब नांदगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या भेटीसाठी आलं.
आधीही, एक सर्पदंशाची केस आली तेव्हा डॉ. बोरसे यांनी पेशंटला जिल्हा रुग्णालय किंवा अन्य ठिकाणी पाठविण्यापेक्षा त्याच्यावर स्वतःच उपचार करण्याचं ठरवलं. त्यांनी फोन करून डॉ. हिंमतराव बावीस्कर यांची मदत घेतली. त्यांच्या सांगण्यावरून उपचार सुरू केले. उपचारानंतर तो पेशंट धोक्यातून बाहेर आला.

प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment