Monday 27 August 2018

पोरक्या लेकरांचं जग : भाग 1


'फॉर्म नीट वाचता येत नाही का? पूर्ण नाव लिहायला काय धाड भरलीय का?' कॉलेजच्या क्लार्कने जोरात मला फायरिंग करायला सुरुवात केली.
मी कशीबशी स्वतःला सावरत 'मी असंच नाव लिहतेय. मधलं नाव नाही लिहीत'.
माझा बुध्यांक तपासण्याची मला नितांत गरज असल्याचा कटाक्ष टाकत आणि तिने मला पुन्हा डाफरत 'बापाचं नाव लावायला लाज वाटते का?' असा सरळ निशाणा माझ्यावर रोखला. 
मी आपली खाली मान घालून, काय सांगू न कसं सांगू असा विचार करत, तोंडातल्या तोंडात इतकंच म्हणाले, 'मॅडम मी अनाथ आहे.'
मॅडमचा सूर जरा खाली आला पुन्हा म्हणाली, 'अग पण वडिलांचे नाव असेल की काहीतरी?'
मी पुन्हा, जोर देऊन म्हणाले, 'मॅडम, मला माझे वडील माहीत नाहीत, त्यामुळे त्यांचे नाव माहीत नाही.' तिच्या चेहऱ्यावर एव्हाना अनेक प्रश्नांच्या गोंधळाचे रंग चढले होते. तिने पुन्हा हळू आवाजात विचारले, 'तुझ्या आईचे नाव काय मग?'
मी पुन्हा, 'मला माहित नाही.'
तिला काय विचारू ते कळेना.
मग मी आवंढा गिळत म्हणाले, 'मॅडम मी अनाथ आश्रमातील मुलगी आहे. मला तिथं आडनाव पाठक लावलं म्हणून मी ते लावते. पण बाकी काही माहीत नसल्याने मी ते काही सांगू शकत नाही.' कॉलेजच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आई-बाप सांगणं इतकं महत्वाचं आहे, हे मला माहीत नव्हते. मला हे कुणाला सांगायचं नव्हतं. कारण लगेच माझ्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलणार आहे. पण माझा नाईलाज झाला. कारण मला कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी आहे.
क्लार्कने लगेच 10 मिनिटं थांब म्हणत, प्राचार्यांच्या केबिनकडे मोर्चा वळवला. 15 मिनीटांनी बाहेर आली आणि म्हणाली, तुला पूर्ण फी भरावी लागेल. पण मॅडम मी कुठं म्हणाले की मला फी अर्धी भरायची आहे किंवा माफ करा म्हणून? क्लार्क थोडी वरमली आणि फॉर्मवर शिक्के मारायला लागली.
कॉलेजमधला ऍडमिशन फॉर्म असो किंवा बँकेतील खातं काढायचा फॉर्म असो. मला आता याबाबत काहीच वाटेनासे झालेय. हो...नाही मला माहित माझं पूर्ण नाव, गाव, पत्ता, आईबाप, कूळ, धर्म, जात, वंशावळ. काय म्हणणं आहे तुमचं? साध्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत म्हणून उद्वेग होतो खरा. पण, जखमांवर मीठ चोळतेय की काय ही व्यवस्था?
इतरांसारखं बालपण माझं नक्की गेलं नाही पण भरपूर मित्र मैत्रिणी आणि काहीसे वेगळे अनुभव मिळाल्याने प्रत्येक अनुभवांकडे जरा वेगळ्या नजरेने पाहता येतेय. माझं बालपण एका अनाथ आश्रमातल्या चार भिंतीत गेलं. आजूबाजूला जसे खोडकर, टारगट, सवंगडी होते तसेच कुमारी माता, विधवा माता, निराश्रित आजी आजोबा हेही माझं वेगळं बालपण सार्थ करायला सहभागी होते. आपल्याला आई-बाबा नाही, कुटुंब नाही याची जाणीव तसं पहायला गेलं तर खूपच उशीरा झाली.
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment