Friday 31 August 2018

पोरक्या लेकराचं जग - भाग 8


जिजाचा काका तिला आणि बाळाला संस्थेत सोडून पसार झाला, तो कधी पुन्हा आलाच नाही. तेव्हा मी 10 वीत होते. जिजाचा चेहरा फारच काळवंडलेला होता, पण एकूण जिजा दिसायला फटाका होती. आम्ही तिचा अवतार नीट करत असू. संस्थेतली मोठी वयात आलेली मुलं तिच्याभोवती पिंगा घालायची. मग आम्ही मुली तिच्या संरक्षणासाठी तयार व्हायचो, ढाल म्हणून. काय तिची उंची, गोरा रंग. नाकेडोळी मस्त. नुकतीच बाळंत झाली असली तरी तिचा कमनीय बांधा सॉलिड होता. त्यात तिने साडी नेसली की विचारता सोय नाही. पण तिच्या एकूण चेहऱ्यावरील हालचाली वेडसरपणाकडे झुकलेल्या होत्या. ती असंबद्ध बडबडत असायची. मधूनच शून्यात जायची.
''हनम्या हाजीर हो... गणप्या हाजीर हो.... नाग्या हाजीर हो.... '' अशी अनेकांची ती नावे घ्यायची. जणू ती कोर्टात आहे, असं तिला वाटत राहायचं.
''हवालदार सायेब हा नाग्या .... रक्त निगेपर्यंत ओठ चावलं रें रांडच्या...'' म्हणून रडत स्वतःच्या योनीवर, छातीवर मारून घ्यायची. तिचं हे रूप बघून आम्ही खूप घाबरायचो.
मग तिची रवानगी अनाथालयातल्या तळघरात झाली. आता तळघरात ती आणि तिचं बाळ असं दोघेच. तिला एकटीला असं संस्थाचालकांनी कोंडून ठेवल्यामुळे आम्ही अस्वस्थ व्हायचो. बाळाशी तिचं असलेलं नातं कधी अतीव ममतेचं असायचं तर कधी भयानक क्रूर असायचं. तळघरात ठेवल्यावर तिसऱ्याच दिवशी बाळाच्या अंगावर नखांनी ओरबडल्याचे व्रण दिसले. बाळाच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. बाळाच्या तोंडावर ती काजळ फेसायची. स्वतःवर लादलेल्या या बाळंतपणाचा निषेध व्यक्त करायला ते एक बाळच हातात होतं तिच्याकडे. बाळाच्या अंगावर झालेल्या जखमा, तिने बाळाचं केलेलं काळ तोंड पाहून आम्ही पुरत्या हादरून गेलो होतो. तिचं बाळ तिच्याकडून काढून घेतलं.
बाळंत झाल्यापासून तिने बाळाला दूधच पाजलं नव्हतं. अवघ्या 4 दिवसात त्या जीवाने प्राण सोडला. ती त्याच ठिकाणी शून्यात नजर हरवून बसलेली मला आजही दिसते.
अशा रस्त्यावरच्या अनेक मनोरुग्ण स्त्रिया आहेत, ज्या दरवर्षाला प्रेग्नंट राहतात आणि संस्थेत येऊन बाळ दाखल करतात. काहींचा यात मृत्यूही होतो .
(मजकुरात उल्लेखलेल्या व्यक्तींची नावं बदलली आहेत.)
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment