Wednesday 8 August 2018

'लाख’ मोलाची बचत



बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातलं तीन-चार हजार लोकसंख्येचं वारणी गाव. कायम दुष्काळी शिरुरमध्ये शेतीतून प्रगती साधणं म्हणजे दिवास्वप्नचं! सततच्या दुष्काळानं प्रत्येक कुटुंबाचाच आर्थिक गाडा दारिद्र्याच्या चिखलात फसलेला. सन २०१३. पंधरा महिलांनी सावित्रीबाई फुले बचतगट सुरू केला. महिन्याला शंभर रुपयांची बचत. 
2014 मध्ये चंचला बडे, तारामती केदार, जयश्री घुले, सीता केदार यांना गटाची प्रत्येकी पंधरा हजारांची मदत. चौघींनीही शिवणयंत्र घेऊन व्यवसाय सुरू केला. मुमताज शेख यांनी बचतगटाचं १५ हजार रुपये कर्ज आणि स्वत:ची बचत यातून पिठाची गिरणी घेतली. आज हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. तारामती केदार यांनीही पिठाची गिरणी सुरू केली. काशीबाई खेडकर यांचे पती दिव्यांग. संसाराचा गाडा काशीबाईच ओढतात. बचतगटाकडून २० हजारांचं कर्ज घेऊन काशीबाईंनी पतीला पानटपरी सुरू करून दिली. आज ही पानटपरी त्यांच्या जगण्याचं साधन आहे. तर शेतीला दुधाचा जोडधंदा म्हणून पुष्पा गिरी यांनी ३० हजार रुपयांच्या मदतीतून म्हैस घेतली. शोभा केदार आणि जयश्री गिरी यांनी प्रत्येकी दोन शेळ्यांसाठी दहा हजार रुपये घेतले. त्यांनाही यामुळे आर्थिक आधार मिळला आहे. 
कौशल्या केदार यांनी मुलाला संगणक घेऊन् देत फोटो स्टुडीओसाठी तर चंचला बडे यांनी मुलाला ऑटोगॅरेजसाठी मदत केली . सुशीला जाधव यांनी अभियांत्रिकीसाठी तर मीरा यांनी बीएस्सी कृषीसाठी मुलांचं शुल्क भरलं आहे. जयश्री घुले आणि शोभा केदार यांनी आपल्या मुलामुलींना स्पर्धा परीक्षेची शिकवणी लावली आहे. नुकताच गटाने पाच लाखांच्या कर्जातून स्वत:चा पापड व्यवसायही सुरू केला आहे.
या महिलांच्या कामाची दखल घेत केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच देण्यात आला. गटामुळे आम्ही आत्मनिर्भर होऊ शकलो, असं अध्यक्ष मीरा गिरी सांगतात.

-अमोल मुळे, बीड

No comments:

Post a Comment