Monday 27 August 2018

सृजनाचे हात

सेनापती बापट रस्ता. इथूनच थोडं आतल्या भागात गेलं की चतुर्श्रुंगी डोंगरापर्यंत जनवाडी, वैदूवाडी, वडारवाडी, लाल चाळ, गोखले नगर अशा वसाहती दिसतात. काही पानशेतच्या पुरानंतर इथं स्थायिक झालेले. तर बरेचसे बाहेरच्या गावांतून, राज्यांतून स्थलांतरित. चिकटून असलेल्या बैठ्या चाळी. चिंचोळे रस्ते. याच गल्लीबोळांत सुरू असते लहानग्या मुलांना घडवण्याचे काम... अंगणवाड्यांमधून.
नुकतंच या अंगणवाड्यांत जायला मिळालं. तेव्हा तिथली सर्जनशीलता आणि सृजनशीलता दोन्ही जाणवली. अतिशय कमी वेतन, तेही कधी दोन तर कधी सहा महिन्यांनी मिळणारे. तरीही जीव ओतून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनीस पाहिल्या की आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. अंगणवाडीत साधारण अडीच ते पाच वर्षांची मुलं पटावर असतात. पण यांच्या सर्व्हेत वस्तीतील शून्य ते सहा वर्षांची बालकेही असतात. त्यामुळे बऱ्याचदा दीड वर्षांपासूनची मुलं इथं दिसतात. कुणाला नाही न म्हणता सर्वांना त्या सांभाळतात. इथले पालक रोजंदारीवर काम करणारे. घरी दुसरं कुणी नाही. त्यामुळे एक-दीड वर्षांची बाळं पाळणाघराप्रमाणे इथं सोडली जातात. त्यांनाही पोषक आहार दिला जातो. खेळात-गाण्यात सामावून घेतलं जातं. 
१९८५ मध्ये भूक आणि कुपोषणाचा सामना करण्यासाठी अंगणवाड्या सुरू झाल्या. पुढं त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण जोडलं गेलं. साधारण १००० घरांमागे एक अंगणवाडी असते. पुणे जिल्ह्यात साधारण ६००० अंगणवाड्या आहेत. आजूबाजूला नव्याने सुरू झालेल्या बालवाड्या, खाजगी शाळा यांचं आव्हान आता निर्माण झालं आहे. पालक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असले तरी त्यांना आपलं मूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवावं असं वाटतं. त्यामुळे बऱ्याचदा तीन–साडे तीन वर्षांपर्यंत अंगणवाडीत मोफत आणि नंतर फी भरून खाजगी शाळेत, असं सध्याचं चित्र असल्याचं या सेविका सांगतात. तरीही अंगणवाडी सेविका त्यांचं काम मनापासून करत आहेत. 
वस्तीतल्या कुठल्याशा समाज मंदिरात, एखाद्या संस्थेच्या भाड्याच्या टिचभर जागेत अंगणवाड्या चालतात. ऐसपैस जागा, नवी करकरीत खेळणी आणि फॅन्सी शालेयसाहित्य नसले तरी या वयात मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक गोष्टी अंगणवाडी सेविका स्वत: तयार करतात. टाकून दिलेला पुठ्ठा, बॉक्स, वर्तमानपत्राचा कागद, दोऱ्यांचे रिळ. कधी लोकसहभागातून आलेली जुनी-नवी खेळणी, रंगीत खडू आणि इतर साहित्य अशा अगदी मिळेल त्या वस्तूपासून या सेविका खेळणी तयार करतात. मुलांची हजेरी घ्यायची इथली पद्धतही आगळी आहे. एका काठीवर मुलाचा फोटो चिकटवून ठेवलेला असतो. हा हजेरी पट. मूल शाळेत आलं की त्याने आपला फोटो असलेली काठी उचलून टेबलवर ठेवायची. 
सकाळी दहा वाजता मुलं येऊ लागतात. एखादं मूल सतत रडत असतं आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस त्यांना उचलून घेत, त्यांचे शेंबडं नाक पुसत, खेळवत त्यांना शांत करतात. मग खेळत खेळत शिकायचे. कधी शरीराला व्यायाम होणारा खेळ, कधी हाताच्या स्नायुंना बळकटी देणारा, कधी नजर उत्तम करणारा...सर्व खेळ एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाला अनुसरून बनवलेले. अंगणवाडी सेविका नाचून, अभिनय, आवाजात चढउतार करून गाणी-गोष्टी सांगतात तेव्हा मुलंही मस्त रंगून जातात. खाजगी शाळेपेक्षा फरक पडतो तो जागेचा, परिसराचा, सुविधांचा. मुलं तीच. शिकवणारेही तितकेच प्रेमळ. किंबहुना काकणभर सरसच. यांच्या हाताखाली मुलांचा सांभाळ होतो, ती खेळतात, अक्षरओळख होते, पोषक खाऊ मिळतो. पण एवढंच त्यांचं काम नाही. गरोदर मातांचा सर्व्हे, त्यांचं समुपदेशन, सरकारी योजनांची माहिती देणं, त्यासाठी आवश्यक कागदपत्रं जमवण्यात मदत करणं, लसीकरण, बाळंतपणानंतर गृहभेटी, बाळांचं लसीकरण, शिक्षणाच्या अधिकाराखाली सहा वर्षानंतर या मुलांना जवळच्या मोठ्या शाळेत प्रवेश मिळवून देणं अशी एक ना अनेक कामंही अंगणवाडी सेविका करतात. या सर्वांची नोंद रोजच्या रोज ठेवावी लागते. 
इथल्या एका अंगणवाडीत काम करणाऱ्या सुजाता रेड्डी. त्यांच्या मुली उच्चशिक्षित, नोकरी करणाऱ्या. तरी या मुलांना घडवण्याचा ध्यास म्हणून त्या आजही मुलात मूल होऊन बागडतात. बीए, बीएड असणाऱ्या स्मिता धिवार खाजगी शाळेतील संधी नाकारून याच मुलांसाठी काम करायचं ठरवून अडचणींवर मात करत इथं रमतात. वंदना इंगळे शिलाई काम करत असल्यामुळे अंगणवाडीसाठी कापडी खेळणी स्वत: शिवतात. त्यांनी कल्पकतेने हवामानाचा तक्ता शिवला आहे. रोज मुलं बाहेर जशी हवा असेल तशा चित्राचा कापडी तुकडा निवडून बोर्डवर लावतात. एकूण सृजनशीलता इथं काहीच कमी नाही. म्हणूनच या अंगणवाडी ‘सेविका’ नसून मुलांना घडवणारे ‘सृजनाचे हात’ आहेत.
- सुप्रिया शेलार.

No comments:

Post a Comment