Friday 31 August 2018

फवारणी पंप घेऊन आयएएस अधिकारी शिवारात

यवतमाळ शहारानजीकचं भिसनी गाव. सुरेश पाडसेकर यांचं शेत. अंगावर फवारणी सुरक्षा कीट, पाठीवर पंप. खुद्द जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख कीटकनाशक फवारणीचं प्रात्यक्षिक देत होते. आयएएस अधिकाऱ्यानं फवारणीचं प्रात्यक्षिक दाखवण्याची ही पहिलीच घटना.कीटकनाशकांची फवारणी करताना गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेनं मृत्यू झाला. कारण केवळ योग्य खबरदारीचा अभाव. यावर्षीसुद्धा शासकीय रूग्णालयात रूग्ण दाखल होऊ लागले. त्यामुळे कृषी, आरोग्य विभागानं जागृती सुरू केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या जनजागृतीला फाटा दिला. 

गतवर्षीच्या घटनेनंतर शासनाकडून फवारणीसाठी शेतकऱ्यांना सुरक्षा कीट देण्यात येत आहे. मात्र शेतकरी अद्यापही याचा वापर करत नाहीत. सुरक्षा कीटशिवाय फवारणी करूच नये, असं जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलं. कीटकनाशक फवारणी करताना लिहिलेल्या प्रमाणातच मिश्रण तयार करावं, हवेच्या विरूद्ध दिशेनं फवारणी टाळावी, हेल्मेट, हातमोजे, मास्क, डोळ्यांवर चष्मा किंवा गॉगल वापरावा, हात धुतल्याशिवाय खाऊ नये अशा सूचना दिल्या.
कृतीतून जगजागृती केली तर विषबाधा होण्याचं प्रमाण निश्चितच घटेल, या विश्वासातून त्यांनी हे पाऊल उचललं.
देशमुख वर्षभरापूर्वी यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी रूजू झाले. शेती आणि शेतकरीविषयक प्रश्नांनी जिल्हा सतत चर्चेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन आणि त्यांच्यात समरस होऊनच त्यांच्यात प्रशासनाविषयी असलेली नकारात्मकता दूर करता येईल, हे डॉ. देशमुख यांनी हेरलं.
पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाच राष्ट्रीयकृत बँकांवर थेट कारवाई करून त्यांनी आपले अधिकार दाखवून दिले. कारवाईच्या धास्तीनं बँकांनी पीककर्ज वाटपात उत्तम कामगिरी केली. जिल्ह्यात शेततळी निर्मिती, तूती लागवड अशा कार्यक्रमांना प्राधान्य दिल्यानं बरेच बदल जाणवू लागले.
कृषी विभागावर योजनांच्या अंमलबजावणीची अधिक जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याऐवजी या विभागातील अधिकारी कायम जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकी व सादरीकरणामध्येच व्यस्त राहायचे. डॉ. राजेश देशमुख यांनी सर्वप्रथम सततच्या बैठकांची ही परंपरा खंडीत केली. आवश्यक तेवढ्याच बैठका बोलावून त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर पिटाळले आणि त्यातून शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत सकारात्मक संदेश गेला.
-नितीन पखाले.

No comments:

Post a Comment