Monday 27 August 2018

पोरक्या लेकरांचं जग: भाग 2


शाळेत असताना मैत्रिणींचे मस्त डबे पाहून स्वतःचा डबा त्यांच्यासमोर खायला लाज वाटायची. चारचौघात लाज वाटण्यासारख्या तर अनेक गोष्टीचे अनुभव माझ्याकडे होते. शाळेत इस्त्री सोडाच, पण कधी धुतलेला गणवेशही नसायचा. चप्पल, आतल्या कापड्यांची वानवा, रोजचा मधल्या सुट्टीतला डबा, पुस्तकं, कंपास बॉक्स, पेन पेन्सिल याही गोष्टी कधी नसायच्या. दरवेळेस शाळेत उसनं मागायला लागायचं मैत्रिणींकडून. 
कधी कधी संस्थेत नाष्टा चांगला व्हायचा तेव्हा मी डबा न्यायचे. पण एरवी मी डबा काढत नाही म्हटल्यावर एका समजूतदार मैत्रिणीने तिच्या घरून 2 डबे आणायला सुरवात केली. जबरदस्तीने मला ती तिचा डबा खाच म्हणून मागे लागायची. तो खातानाही भयंकर लाज वाटायची स्वतःचीच स्वतःला. पण ती माझ्या इतकी प्रेमात होती की शाळा सुटल्यावर घरी चल, जेवून जा म्हणून मागे लागायची.
मग तिला वाईट नको वाटायला म्हणून मीही तिच्या मागोमाग जायचे. जसजशा तिच्या घरच्यांशी ओळख व्हायला लागली तेव्हा कुटुंब म्हणजे काय, आई-बाबाचा, बहिणीचा, भावाचा प्रत्येकाचे रोल कळू लागले. तेही पुसटसे. मैत्रीण तिच्या आईसारखी दिसते, म्हणून ती आईची लाडकी, तिची बहीण आजीसारखी दिसते, म्हणून आजीची लाडकी. माझ्या नकळत मी कुणासारखी दिसते, माझा रंग, नाक, डोळे कुणासारखे हे प्रश्न भेडसावायला लागले. इतरांसारख कुटुंब मला का नाही? का गेली असेल माझी आई मला सोडून? कुटुंबातील लाड माझ्या आयुष्यात का नाही? मी का आश्रमात?
आश्रमात येणारे देणगीदार, पाहुणे यांच्या सहानुभूतीच्या नजरा मला एव्हाना त्रास देऊ लागल्या. संस्थेत वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रम साजरा करायला येणारे पाहुणे यांनी मी खूप अस्वस्थ व्हायला लागले.
आपण असे का नाकारले गेलोय, हे कळण्याचे मार्ग मी खरं तर शोधायला लागले होते. माझ्या भोवताली असणारी लहान मुलं, मोठी मुलं, आम्ही इथं का आलोय, याची उत्तरं मग माझ्या छोट्या आजूबाजूच्या भावंडांकडून कळायला लागली. ते संस्थेत कसे दाखल होतात, तशीच मीही दाखल झाले आहे, हे एव्हाना उमगायला लागलं. शिवाय कुमारी माता, विधवा, परितक्त्या याही होत्याच. माझ्या संस्थेतल्या प्रवेशाची थोडी अंधुकशी कल्पना देणारेही अनुभव गाठीशी पडत होते.
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment