Friday 31 August 2018

पोरक्या लेकरांचं जग : भाग 10


खंड्या(खंडेराव), बारक्या(बाळकृष्ण), पोपट्या(पोपट) आणि गाई म्हणजे मी गायत्री! तर अशा चौंघांची आमची लहानपणी लै गट्टी. खंड्या म्होरक्या. त्याच्या उग्र, हिंस्र स्वभावाला सगळेच घाबरायचे. त्याला एखादी वस्तू मिळाली नाही की मारहाण ठरलेली, अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत. बरं, याला कोणी मोठी लोकं मारायला धावली की हा पठ्ठया हात, तोंड वेडंवाकडं करून फिट्स आल्याचं नाटक करायचा. तेव्हा मारणं बाजूला राहून त्याला कांदा, चप्पल दाखवून मूळ पदावर आणेपर्यंत मुख्य हाणामाराची घटना विसरलेली असायची. दुसऱ्याच्या हातातलं हिसकावून घेणे, कोणत्याही खेळात त्याच्यावर राज्य कधीच येणार नाही असा खेळ खेळणे, बॅटिंगला नेहमीच पहिलं, किमान 5 वेळा आऊट झाल्याशिवाय ऑफिशियल आऊट म्हणून डिक्लेर करायचं नाही, अशा कितीतरी गोष्टी खंड्यासाठी आम्ही भावंड (मी सोडून) करत असू.
पोपट्या नावाप्रमाणेच बोबडं बोलणारा. बनेल, एक पायाने अधू, सतत सहानुभूती मिळवणारा, खंड्यापेक्षा स्वभावाने सौम्य पण बुद्धीने हुशार, चिडला की कुणाचंच न ऐकणारा. कुणी त्याच्या वाटेला लागलं की शिस्तीत सगळ्यांची धुलाई करणारा. बारक्या सगळ्या खेळात प्रवीण व्हायचा प्रयत्न करायचा. शाळेत 35 टक्यांवर पास होत असला तरी आपलं अक्षर सुंदर असावं, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारा. विशेषतः खंड्याचा सख्खा धाकटा भाऊ असल्याने खंड्याला घाबरून कुणी त्याच्या नादाला लागायचं नाही.
मी. 'आप तो मुझे जानतेही हो!!!' खुद की क्या तारीफ करू?? तर आम्ही सगळे अगदी लंगोट मित्र बरंका! (बाळ असल्यापासून) त्यांच्याबरोबर तालमीत खेळताना मीही लंगोट घालायचे ना! आम्हा चौघांना इतर भावंडं जॅम टरकून असायची. आम्ही इतरांशी खूप भांडायचो, खोड्या, हाणामाऱ्या करायचो पण आपापसात एकमेकांना टरकून असल्यानं चौघेही एकमेकांच्या नादी लागण्यापेक्षा मित्र होणं जास्त पसंत करायचो. एकदा गोट्या खेळताना मी जास्त गोट्या जिंकल्या म्हणून खंड्या, पोपट्या आणि माझ्यामध्ये वादावादी झाली. तेव्हा ही पोरगी, सहज मारून गोट्या काढून घेऊ म्हणून दोघं अंगावर धावून आले. मीही तेव्हा कराटेच्या क्लासला जायचे. किक, साइड किक कशी मारायची हे शिकवल्यामुळे मस्त दोघांच्या गोट्यांवर लाथ मारली होती. तेव्हापासून ते माझ्या वाटेल लागले नाहीत कधी.
मोठे झालो तसं खरंच सगळे विखुरलो. 18 वर्षांनंतर अनाथ आश्रमातून बाहेर पडायला लागल्याने या तिघांचंही शिक्षण अपूर्ण राहिले. खंड्या-बारक्याची आई त्यांना घेऊन गेली त्याच्या गावी. पोपटराव कुठं उडताहेत पत्ता नाही. आता माग काढतेय जुन्या मित्रांचा. प्रत्येकाचा संस्था सोडल्यावरचा प्रवास निराळा, संघर्ष निराळा पण अनाथपणाचं ओझं मात्र तेवढ्याच वजनाचं आहे. मी शोधतेय हे अनाकलनीय वजन कसं उतरवता येईल माझ्यासकट यांच्या खांद्यावरूनही...
परीक्षा कधी संपते आणि मे महिन्याच्या सुट्ट्या कधी लागतात अशी आमची इतर कुटुंबातील मुलांसारखी मागणी कधीच नसायची. वाटलं तर अभ्यास कर, शाळेला जा, झोपा काढ नाही तर 'खा खीर, बोंबलत फिर' अशी काहीशी प्रेरणा आम्हाला आमच्या मोठ्या ताई दादांकडूनच मिळालेली. मोठे ताई दादा हे 7वी, 8 वी, 10 वी पलीकडे न गेल्याने त्यांच्यासारखंच कुठेतरी चपराश्याची नोकरी करू किंवा लग्न करून दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करू. 18 पूर्ण झाल्यावर संस्था दुसऱ्या महिलाश्रमात भरती करेलच, हीच मानसिकता. शिक्षणाविषयी अनास्था आणि समोर कोणतंच रोल मॉडेल नाही. त्यात संस्थेने दिलेली मोकळीक. मी तर 'अय्या, आपण 7 वीत कसे काय पास झालो? जाऊ दे, पास झालेच आहे, तर चला पुढे शिकू!' असं करत मी अखेर 10 वी गाठली. परिक्षेच्याच आधी अभ्यासाला बसायचं असतं हे आम्हाला माहिती! संस्थेत शिकवणी घ्यायला बाई यायच्या पण तिथंही शाळेसारख्याच दांड्या.
रोजचा खेळ भातुकली, क्रिकेट, गोट्या नाहीतर लगोरी, ह्याला मार त्याला मार यातच आमचा दिवस जायचा. अशा या दैनंदिनीत शाळेला रोजचं सुट्टी. अभ्यासाचा लोड कधीच घ्यायचा नसल्याने मे महिन्याचं कौतुक आम्हाला कधीच नव्हतं. पालक असलेली मुलं शाळेला सुट्ट्या लागल्या की घरी निघून जायची. मे महिन्यात खेळायला फार कुणी नाहीत, आश्रम एकदम शांत शांत व्हायचा. नव्हे, भकास वाटायचं. इतर मुलांच्या आया, मामा वगैरे त्यांना भेटायला आले तरी माझ्या मनात अनाथ असल्याची कालवाकालव व्हायची. 'यार झोपडी का असेना त्यांची, पण ती आईच्या कुशीत तरी झोपत असेल ना', या विचाराचं थैमान मनात.
जी 10-15 मुलं सुट्टीत उरायची त्यांच्यासाठी खास 4 दिवसांची ट्रिप निघायची. संस्थेकडे आम्हा मुलांचे लाड पुरवायला पैसा नव्हता. पण, संस्थाचालक त्यातल्या त्यात, मुलांना आनंद कसा मिळेल हेही पहायचे. ट्रिप गणपतीपुळे, कोकण, असं लांब निघायची. तीही एका ऍम्बुलन्स मधून! कारण तीच संस्थाचालकांच्या मालकीची असल्याने मुलांना ही चैन ते करू द्यायचे, तेही आनंदाने. कधीतरी गाडीत बसल्यामुळे उलट्यांचा त्रास होणाऱ्या आम्हा मुलांना अख्ख्या ट्रिपभर वाळीत टाकलेलं असायचं, कोपऱ्यात कुठेतरी जागा. गाडीत दाटीवाटीने बसून गाणी, मस्कऱ्या करण्यात रममाण असायची. बऱ्याचदा गाडी धुतलेली नसल्याने ऍम्बुलन्सचा तो भयंकर वास! या ट्रिपमध्येही संस्थेतील मुलं कमी आणि संस्थेतील अधीक्षकांची मुलं, बायका, नातेवाईकांच्या मुलांचाही भरणा जास्त. मग खिडकीजवळची सीट यांच्या मुलांना आधी द्या असा प्रघात असायचा.
संस्थेचा अधीक्षक आणि मुलं हे एक भयंकर नातं प्रत्येक संस्थेत पहायला मिळतं. जन्माचे वैरी असंच त्याचं वर्णन करावं लागेल. क्वचित, एखाद्या संस्थेला मुलांचं खरंच हित पाहणारा चालक मिळतो. म्हणूनच, आम्हा मुलांचा भावनिक, व्यक्तिगत जो काही विकास झाला, तो संस्था सोडल्यावरच!
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment