Tuesday 4 February 2020

महिलांच्या दराऱ्यानं हातभट्ट्या बंद

दारू पिणाऱ्याला १० हजार दंड .. विक्री करणाऱ्याला २० हजार रुपये दंड ... गाव शिवारात गावठी दारू निर्मिती करणाऱ्याला ५० हजार रुपये दंड आणि जो दारू निर्मिती करणाऱ्याला पकडून देईल त्याला आकर्षक बक्षीस .. समशेरपूरमधल्या महिलांनी हा ठराव केला आहे.
समशेरपूर, आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातलं गाव. वस्ती साधारण दीड हजार. गावात २५ बचतगट. हैदराबाद घटनेनंतर या महिलांमध्येही चर्चा सुरू झाली. चकमकीत संशयित मारले गेले. पण महिलांवर होणारे अत्याचार, शोषण संपेल का? ते संपवण्यासाठी मूळ समस्येवर काम करणं आवश्यक आहे, असं या महिलांना वाटलं. महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणाचे सर्वात मोठे कारण आहे, व्यसन. मद्य आणि अंमली पदार्थांपासून मुक्त समाज घडवला तर महिलांच्या शोषणात मोठी घट होईल. बचतगटांच्या विकासातही व्यसनी लोकांकडून अडथळे येत होते. संघटित असूनही हे थांबवता येत नसेल तर काय उपयोग... या मंथनातूनच निर्धार पक्का झाला. सरपंच गीतांजली पाटील यात अग्रणी होत्या.
दारूबंदीसाठी महिलांनी ग्रामसभा घेतली. सुरुवातीला प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नव्हतं. मग महिलांनी स्वतःच आचारसंहिता तयार केली. तीन किलोमीटरच्या शिवारात दारू विक्री आणि पिणाऱ्यांना दंड. या निर्णयाची माहिती देणारे बॅनर गावात लावण्यात आले. मग महिलांनी गस्त सुरू केली. या निश्चयी आणि संघटित महिलांचा दरारा एवढा आहे की या परिसरातल्या हातभट्ट्या जवळपास बंदच झाल्या आहेत.
गावातल्या अनेक पुरुषांचा पाठिंबा त्यांना आहे आणि आता पोलिसांचीही साथ त्यांना आहे. या उपक्रमाची जिल्ह्यातही चर्चा होत आहे.

- कावेरी परदेशी, नंदुरबार

No comments:

Post a Comment