Tuesday 4 February 2020

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेलं सेवा किचन


बुलडाण्यातलं राजर्षी शाहू औषध निर्माण महाविद्यालय. या महाविद्यालयात अंतिम वर्षाला असलेले पवन, ऋषिकेष, राजेश, शाहदान,सोहेल, हर्षदा, किशोर आणि त्यांचे इतर मित्रमैत्रिणी. ग्रामीण भागातून आलेली ही मुलं. त्यांना इनोस्पायर या विभागीय स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. या रकमेतून काही तरी चांगलं करावं, विशेषतः गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं असं वाटत होतं. त्यातून तीन महिन्यांपूर्वी सुरू झालं सेवा किचन.
चिखली रोडवर हे हॉटेल आहे. सुट्टीच्या दिवशी म्हणजे दर रविवारी इथं विद्यार्थ्यांना पोटभर जेवण दिलं जातं. इथं मेन्यू आणि रेट कार्ड नाही. बेत ठरलेला. फ्रुट कस्टर्ड, पालकपुरी, छोले आणि कढीखिचडी. विशेष म्हणजे इथं पैसे द्यायची सक्ती नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही मदत करू शकता. मुलांना यातून गरजू मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची तरतूद करायची आहे. या हॉटेलमध्ये सुविचारांबरोबर एक पाटी आहे . त्यावरच लिहिलं आहे , 'सेवा किचन'मध्ये या.. अन् मोफत पोटभर जेवा!
किचनमध्ये अनेक विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. हॉटेलमधे काम करणारी मुलं विविध जातीधर्माची आहेत. सर्वांनी आपले आडनाव हे भारतीय ठेवलं आहे. त्यामुळे हे कुण्या एकाचं नाही, सर्वांचं आहे असा संदेश दिला जात आहे. जास्तीत जास्त ग्राहक येतील आणि त्यातून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. 


-दिनेश मुडे, बुलडाणा 

No comments:

Post a Comment