Friday, 10 January 2020

ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे


उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातलं मंगरूळ . सप्टेंबर महिन्यातली 9 तारीख. सरडे कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा दिवस. सरडे कुटुंबातल्या संदीप आणि पूजा यांना मुलगी झाली होती .
स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गोष्टी होत असल्या तरी अजूनही अनेक ठिकाणी दोघांच्या जन्माचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळअंतर्गत येणाऱ्या २५ गावांमधलं २०१८-१९ मधलं लिंग गुणोत्तराचं प्रमाण ८६१. वर्ष २०१६-१७ मधलं ८९५ तर २०१५-१६ मधलं १२५७.
मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचा संदेश आपण आपल्या घरापासून देऊया असं नंदिनी सरडे आणि त्यांचा मुलगा संदीप यांनी ठरवलं . नंदिनीताई माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे पती प्रतापसिंह उपसरपंच. संदीप यांनी नेदरलँडमधून प्लॅन्ट सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली असून तिथल्या कृषी संशोधन केंद्रात ते कार्यरत आहेत. पत्नी पूजा मूळच्या कळंबमधल्या. त्या एम एससी झाल्या आहेत. मुलगा असो व मुलगी, ते मूल आपलं आहे, हा सरडे कुटुंबातल्या सर्वांचा विचार. तो परिसरात पोहोचावा, स्त्री-भ्रूण हत्या थांबाव्यात यासाठी मुलीचं स्वागतही समारंभाकपूर्वक.
मुलीला गावात आणलं. बसस्थानक ते घरापर्यंत रांगोळी. रस्त्यावर पुष्पवृष्टी. बॅण्डपथक आणि फटाक्यांची आतषबाजी. पेढ्यांचं वाटप. या स्वागताची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा आहे. मुलीच्या जन्माचंही स्वागत झालं पाहिजे अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. 


- अनिल आगलावे, उस्मानाबाद

ज्योत से ज्योत जगाते चलो

 गोष्ट गेल्या बुधवारची. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या पर्वतरांगांमधली. तोरणमाळ आणि आसपासच्या दुर्गम पर्वतरांगांमधल्या गरीब आदिवासींना दिवाळी साजरी करता यावी यासाठीच्या प्रयत्नांची.
तोरणमाळ, महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण. मात्र विकासापासून वंचितच. डोंगरावरील पारंपरिक शेतीशिवाय उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही.
सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये दिवाळी साजरी व्हावी यासाठी काही युवक प्रयत्न करतात. मूळचे शहाद्याचे पण नोकरीव्यवसायानिमित्त परराज्यात, परदेशात स्थायिक झालेले हे युवक. सर्वसामान्य कुटुंबातले. सात वर्षांपूर्वी समर्पण या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेले. २२६ जण. त्यासाठी पुढाकार घेतला,ग्रुपला आकार दिला, दिवंगत महेश पाटील यांनी. 

महेश व्यवसायासाठी पुण्यात स्थायिक झालेले. रक्तदान शिबीर, सातपुड्यात दिवाळी मदत, माणुसकीची भिंत या माध्यमातून गरजूंना हात देणारे. गेल्या वर्षी त्यांचा अचानक मृत्यू झाला. महेश यांना साथ लाभली सौरभ जहागिरदार आणि प्रशांत पाटील यांची.
सहा वर्षांपासून सुरू असलेला दिवाळी मदतीचा उपक्रम यंदा ३० ऑक्टोबरला थाटात झाला. यावेळी १५० किलो चिवडा,३० किलो सोनपापडी, ८००बिस्कीटपुडे, १२०० कैडबरी चौकलेट, ३५० चप्पल जोड, १७५ ब्लैंकेटस, ३५० मुलांचे ड्रेस, ४५ साल, २५५ मोठ्या मुलांचे ड्रेस, २५५ लहान मुलींचे ड्रेस, ३५ लहान मुलांचे स्वेटर, १५५ मोठ्या मुलांचे स्वेटर, ४५ कानटोप्या, ६५ मोठ्या माणसांचे ड्रेस, ६५ साड्या व २५० फरसाण पाकीट आणि २३०० चॉकलेट्सचे बॉक्स यामुळे पाड्यांवर आनंदाच्या ज्योती उजळल्या होत्या. 

- रुपेश जाधव, नंदुरबार

Thursday, 9 January 2020

स्वतःच्या अडचणींची जाणीव, वंचितांसाठी सुरू केला मदतयज्ञ


 वडिलांचे छत्र हरपले अन‌् आर्थिक अडचणींमुळे अवघे बालपण करपले. अभ्यासात पुढे असूनही एक वही घेणंही शक्य होत नसायचं. दारिद्र्याची ही बोचरी जाणीव प्रेरणा बनवून बीड येथील सीमा मनोज ओस्तवाल यांनी सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकले. गुरु आनंद महिला प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सीमा या गेल्या नऊ वर्षांपासून ११ झेडपी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रूग्णांसाठी आरोग्य शिबिरं, वंचितांना किराणा साहित्य, महिलांसाठी कौशल्य विकास शिबिर घेतात. त्यांच्या या प्रयत्नांतून अनेकांच्या दुखा:वर फुंकर देण्याचे काम होत आहे.
बीड येथील सीमा ओस्तवाल यांनी वंचित, दुर्बलांसाठी कार्य करण्याच्या उद्देशातून सन २०१० मध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सेवाकार्याचा श्रीगणेशा केला. दुष्काळाच्या दिवसांत पेंडगाव येथे सप्ताह घेत भुकेल्यांसाठी अन्नछत्र सुरु केले. या पहिल्याच उपक्रमातून मनस्वी आनंद मिळाला. त्यानंतर दरवर्षी ११ झेडपी शाळेतील गरजू मुलांसाठी वह्या, पेन, पेन्सिल असे साहित्य उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली. या व्यतिरिक्त १४० रूग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया व बाराशे रूग्णांची मोफत नेत्र तपासणी केली. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व्हाव्यात, यासाठी अडीचशे जणींना ब्युटीपार्लर, शिवण काम व इतर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले. यातून अनेक महिला, युवती आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. यासह दरवर्षी दिवाळीचे औचित्य साधून शंभरावर कुटुंबांना किराणा साहित्य देत त्यांचा सण गोड केला. यंदाच्या दिवाळीत तर ही मदत २०० कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात आली. अशा सातत्यपूर्ण उपक्रमांतून गुरु आनंद महिला प्रतिष्ठा सामाजिक दायित्व निभावण्याचे कार्य करतेय. सामाजिक कार्याचा परीघ उत्तरोत्तर विस्तारण्याच्या गुरू आनंद महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा मनोदय आहे.

- अनंत वैद्य

महिला बचतगटांनी जपले समाजभान दहा वर्षांपासून अनाथांना नवे कपडे, फराळ


पै-पैची बचत करत स्वतःच्या संसाराला सावरण्यासाठी धडपडणाऱ्या मुंबई येथील बचतगटांच्या महिला. अनाथाश्रमातील मुलांचे दुःख पाहिले अन् या महिलांना त्यांच्यासाठी काही तरी योगदान द्यावे वाटले. यातूनच सुरू झाली मदत. दहा वर्षांपासून मुंबईतील 'संकल्प विद्यार्थी संघ' हा बचतगटांचा समूह सहारा अनाथालयात (गेवराई, जि.बीड) दिवाळी साजरा करतो. येथील १०७ चिमुकल्यांना नवे कपडे, फराळ, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो.
मुंबई येथील शुभा बेनुरवार. त्या महापालिकेच्या निवृत्त कर्मचारी. महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शुभा यांनी सहकाऱ्यांसह कुर्ला व घाटकोपर येथे एक हजारांच्यावर महिला बचतगट व साडेचारशेंच्या वर उत्पादक गटांचे जाळे उभारले. सन २००८ मध्ये एका कार्यक्रमात त्यांची संतोष गर्जे यांच्याशी भेट घडली. संतोष पत्नी प्रीती यांच्यासह गेवराई शहरानजीक गोविंदपूर येथे सहारा अनाथालयाच्या माध्यमातून वंचित, उपेक्षित, अनाथ अशा १०७ मुलांचा सांभाळ करतो. ही माहिती मिळाल्यानंतर शुभा यांनी संकल्प विद्यार्थी संघाची एक सहल काढली व सहारा अनाथालयास भेट दिली. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या या चिमुकल्यांचे दुःख पाहिल्यानंतर त्यांच्यासाठी दर दिवाळीत फराळ, नवे कपडे, शैक्षणिक साहित्य देण्याचे महिलांनी ठरवले. तेव्हापासून आजपर्यंत न चुकता दरवर्षी चिमुकल्यांची दिवाळी गोड करण्याचे काम 'संकल्प विद्यार्थी संघ' या संस्थेच्या माध्यमातून हे बचतगट करताहेत. दोन वर्षांपासून श्री कुलस्वामिनी माता ट्रस्टच्या विजुताई महाले, कांचन महाले या देखील या कामात मोलाचे योगदान देत आहेत.
- अनंत वैद्य

इंदिरा गांधींच्या आठवणी.

 ३१ ऑक्टोबर हा इंदिरा गांधी यांचा मृत्यूदिन. त्या निमित्ताने कुटुंबातल्या इंदिरा गांधींच्या आठवणी.
१. इंदिरा आणि सोनिया यांची पहिली भेट.
राजीवच्या भरपूर धक्केधपाटे खाल्लेल्या, जुन्यापान्या वॉक्सवॅगनमधून ते लंडनला आले. भारतीय दूतावासातल्या स्वागत समारंभाला हजेरी लावणं आणि नंतर अनोळखी वातावरणात राजीवच्या आईला भेटणं ह्या कल्पनेनंच तिला खूप घाबरायला झालं. मी तिथं जाऊन काय करणार? तिच्या डोक्यात प्रश्नांचे भोवरे गरगरू लागले. त्यातले काही प्रश्न गंभीर होते तर काही क्षुल्लक होते. मी इंदिरा गांधींना काय हाक मारू? मी घातलेले कपडे बरे आहेत का? मी त्यांच्याशी काय बोलू? त्यांनी माझ्याकडे तुच्छतेनं पाहिलं तर? त्या जर माझ्याशी तो-यानं वागल्या तर?
‘’अग बाई, काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस,’’ राजीव तिला सतत सांगत राहिला.
राजीवच्या संगतीत व्यतीत केलेला काळ अचानकपणे तिला स्वप्नवत् वाटू लागला. जणू ते स्वप्न थोड्याच काळात भंगणार होतं. त्याच्या आईला भेटण्याची आपली मनोमन तयारी झालेलीच नाही असं तिला वाटू लागलं. त्याशिवाय असं भेटायला जाणं म्हणजे त्या नात्यात आणखी खोल गुंतण्यासारखं नाही का होत? जिथं आपले स्वतःचे आईवडीलच ह्या नात्याच्या एवढे विरूद्ध आहेत, तर ती त्याच्या आईला कशी काय भेटणार?
‘’अग, पण, असं काय करतेस सोनिया? त्यांना माहिती आहे ते. तुझ्या बाबांनी दिली आहे ना परवानगी.. ...शेवटल्या क्षणी कशी तू माघार घेतेस ? सोनिया, अग आपणच दोघांनी मिळून ठरवलंय ना सारं? अग, लोक आपली वाट पाहाताहेत.’’
‘’मला माफ कर. मी नाही येणार. मला नाही जमत रे...’’
सोनिया घाबरली होती आणि तिला शांत करण्याचे राजीवचे सगळे प्रयत्न थिटे पडत होते. शेवटी त्याला आईला फोन करून सांगावं लागलं आणि ती भेट रद्द करण्यासाठी काहीतरी कारण शोधून काढावं लागलं.
सोनियाचा गेलेला आत्मविश्वास परत येईपर्यंत त्यांनी ती भेट काही दिवसांसाठी पुढे ढकलली. अर्थात् तेव्हासुद्धा प्रसंग सोनियासाठी कठीणच असणार होता. परंतु जे करणं योग्य आहे ते करायचं आणि चांगलंच करायचं असा तिनं मनाचा निर्धार केला. ह्या वेळी भारतीय राजदूताच्या निवासाच्या पाय-या चढताना तिचे पाय थरथर कापत होते.
इंदिराजींनी त्यांच्या खोलीत दोघांचं स्वागत केलं. समोर उभ्या असलेल्या, सुंदर रेशमी साडीतल्या स्त्रीसमोर सोनिया आली तेव्हा तिच्या गडद, बदामाकृती डोळ्यांत सोनियाला राजीवचे डोळे दिसले. इंदिराजींनी केसांचा अंबाडा घातला होता. त्या अवघ्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या होत्या तरीही पांढ-या केसांची एक जाडसर बट त्यांच्या भाळावर दिसत होती. काळजीपूर्वक विंचरून बसवलेली ती पांढरी बट त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जणू भागच होती. त्यामुळे त्यांना अधिकच राजबिंडेपणा लाभत होता. त्यांचं हास्य लाघवी होतं, वागणं नाजूक होतं, त्यांचं नाक तर अगदी धरधरीत लांब होतं.
सोनिया नंतर म्हणाली की, चारचौंघीसारख्या, साध्यासुध्या स्त्रीसमोर मी आले आहे अशीच तेव्हा माझी भावना झाली. अगदी आपुलकीनं स्वागत केलं त्यांनी आमचं. मला तिथं घरच्यासारखं वाटावं म्हणून शक्य असेल तेवढं सारं केलं त्यांनी. इंग्रजीपेक्षा मी फ्रेंचमध्ये अधिक चांगलं बोलू शकेन म्हणून त्या माझ्याशी फ्रेंचमध्येच बोलल्या. त्यांना माझ्याबद्दल- माझ्या अभ्यासाबद्दल जाणून घ्यायचं होतं.’’ सोनिया किती बावरली होती ह्याबद्दल राजीवनं आईला सांगितलं असावं कारण इंदिराजी तिला म्हणाल्या, ’’अग, मीसुद्धा एके काळी तरूण होते, खूप लाजाळू होते, प्रेमात पडले होते. त्यामुळे मी तुझ्या भावना समजू शकते.’’
मनावरचा ताण गेल्यामुळे सोनियाला मोकळंमोकळं वाटलं. तिला त्या पहिल्या भेटीचा आनंद घेता आला. भेट संपली तेव्हा वातावरण अगदी छान, मोकळं झालं होतं. दोघांना नंतर त्यांच्या वर्गात शिकणा-या मित्रांच्या पार्टीला जायचं होतं. म्हणून मग सोनियानं विचारलं की मी इथल्याच खोलीत, पार्टीसाठी आणलेला इव्हिनिंग ड्रेस बदलू का? ड्रेस बदलून ती खोलीबाहेर पडली मात्र, तिचा पाय सटकला आणि तिच्याच चपलेची टाच ड्रेसमध्ये अडकून ड्रेसची हेम उसवली. सोनियानं नंतर ती आठवण सांगितली की, राजीवच्या आईनं अगदी शांतपणे (हा त्यांचा स्वभाव मला नंतरच्या काळात खूप जवळून बघायला मिळणार होता.) सुई-दोरा बाहेर काढला आणि अगदी सहजपणे त्या ती उसवलेली हेम शिवू लागल्या. अशा वेळी माझ्या आईनंही तेच नसतं का केलं? माझ्या मनातल्या उरल्यासुरल्या शंका निदान त्या क्षणापुरत्या तरी निमाल्या.’’
खरं तर त्या दोघी एकमेकींपेक्षा किती वेगळ्या होत्या! राजीववरचं प्रेम ही एकमेव गोष्ट त्या दोघींत समान होती. इंदिराजी राजीवजवळ बोलल्या नसल्या तरी एक परदेशी सून आपल्या घरी येणार ह्या कल्पनेनं त्याही थोड्याशा बिचकल्या होत्या. तथापि, सोनियाला प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्या सर्व शंका फिटल्या. त्यांनी आपली अमेरिकन मैत्रीण डोरोथी नॉर्मनला लिहिलेल्या पत्रात लिहिलं की, ‘’ ही मुलगी सुंदर आहेच, पण त्याचबरोबर ती सुदृढ, निरोगी आणि स्वभावाने सरळसाधीही वाटते आहे.’’
२. राजीव-सोनिया यांच्या विवाहानंतरचा प्रसंग
सोनियावर कुटुंबीयांना निरोप देण्याची वेळ आली तेव्हा सोनिया त्यांच्यासोबत विमानतळावर गेली. आईला मिठी मारली मात्र, एकदम बांध फुटल्यासारखा झाला. तिच्या आईच्या दृष्टीनं तो खरोखरच कायमचा निरोप होता कारण ते सर्वजण आपल्या घरी जात होते, फक्त सोनिया मात्र ह्या विचित्र देशात राहाणार होती... त्यांच्याशिवाय.....एकटीच राहाणार होती. त्या क्षणी सत्य जेवढं निष्ठूर वाटलं तेवढं त्यापूर्वी कधीही वाटलं नव्हतं. सर्वांसमोर भावनांचं प्रदर्शन करण्याची सवय दोघींनाही नव्हती त्यामुळं तर तो प्रसंग अधिकच ह्रदयद्रावक होत होता.
‘’ मला पुष्कळ पत्रं लिही ग, बाळ, फोन करीत जा वारंवार.’’
‘’ होय मम्मा, नक्की. मी वचन देते..’’
नव्या घरी परत जाताना गाडीत सोनियाने चेहरा पुसुन कोरडा केला तेव्हा (इटलीतल्या) ल्युसियाना येथल्या आनंदी बालपणाच्या आठवणी तिच्या मनात चमकून उठल्या. ती आईवडिलांसोबत गाईचं दूध काढायला जात असे ते तिला आठवलं. वाढदिवस साजरे करण्यासाठी मित्रमैत्रिणी आणि चुलत-मावस-आते-मामेभावंडं पुष्कळ पुष्कळ भेटी घेऊन येत तेही तिला आठवलं. ते जीवन आता किती दूर गेलं होतं. लग्नाच्या ताणामुळे आणि दगदगीमुळे तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं. त्यातच एक प्रकारचं नैराश्यही तिच्या मनात भरून आलं होतं. तिला शक्य तितक्या लौकर राजीवला भेटायचं होतं. केवळ तो... तोच तिला धीर देऊ शकत होता.
पण राजीव तर घरी नव्हता. तो फ्लाइंग क्लबवर विमानोड्डाणाच्या वर्गाला गेला होता. सोनिया खोलीत गेली तेव्हा त्या भिंती अंगावर चालून आल्यासारख्या वाटल्या तिला . ....आता राजीव घरी येईपर्यंत तिला अगदी एकटीलाच राहायचं होतं. पण खोलीचं दार उघडताक्षणी पलंगावर ठेवलेला एक लिफाफा तिच्या नजरेस पडला. त्यात इंदिराजींनी लिहिलेली एक चिठ्ठी होती.
त्यात लिहिलं होतं,’’ सोनिया, तू आम्हा सगळ्यांना खूप खूप आवडतेस.’’ ते वाचून तिचा चेहरा एकदम उजळला. त्या लहानशा कृतीमुळे तिला मनोमन भरून आलं. अचानक जादू व्हावी तशी तिची दुःखी मनस्थिती एकदम पालटून गेली. मग ती हसली आणि तिनं खोलीबाहेर पाऊल टाकलं.
काही काळानं तिला इंदिराजींच्या आवडीनिवडी कळू लागल्या. त्यांना फुलं खूप आवडत म्हणून टेबलावर कायम सुंदर पुष्परचना असेल ह्याकडे ती जातीनं लक्ष देऊ लागली. दोघींनाही लीलीचा सुगंध खूप आवडत असे, तो सुगंध एखाद्या मलमासारखा सा-या घराच्या कानाकोप-यात पसरे. त्यांचं घर उत्तम अभिरूचीनं सजवलेलं असलं तरी त्यात काटकसरी साधेपणाही होता. साधे पडदे आणि तसेच साधे गालिचे वगळता तिथं आदिवासी कलाकुसर, भारतीय चित्रकारांनी रेखाटलेली चित्रं, काही पुरातन कलावस्तू आणि ब्रिटिशकालीन फर्निचर अशा वस्तू होत्या. आपल्या सासूच्या व्यक्तिमत्वाची गुरूकिल्ली साधेपणात आणि पैशांच्या बचतीत आहे हे सोनियाला दिसून आलं. इंदिराजींना काहीही फेकून द्यायला आवडत नसे. प्लॅस्टिकच्या पिशव्यासुद्धा पुन्हा वापरता याव्यात म्हणून त्या व्यवस्थित घडी घालून ठेवत. इंदिराजींना हव्या तशा त्यांच्या सूटकेसेस भरायला सोनिया शिकली. सूटकेसमधील इंचही जागा न फुकट घालवता, अगदी छोटासा कोपराही उपयोगात आणायला त्यांना आवडत असे. इंदिराजींना घरात एखादी वस्तू हवी असं वाटलं तर ती वस्तू आणण्याची जबाबदारी सोनिया स्वतःच्या शिरावर घेत असे.
(सोनिया गांधी- ललित चरित्र या पुस्तकातून साभार/ मूळ स्पॅनिश लेखक- जावियर मोरा / इंग्रजी अनुवाद- ज्युल हर्न
मराठी अनुवाद- सविता दामले / प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे)

शाळा इमारत मोडकळीस, समाजमंदिराचा आधार, संघर्षातून ५९ आदिवासी विद्यार्थी काढताहेत वाट

शाळा, नीटनेटकी असली आणि भौतिक सुविधा असल्या अन् हसत-खेळत शिक्षण मिळालं की विद्यार्थ्यांचे मन रमते. ज्ञानदान प्रभावी ठरते. मात्र, यापैकी एकही घटक नसला की अडथळे वाढतात. अशीच गत झालीये आतोणे (ता.रोहा, जि.रायगड) येथील झेडपी शाळेची. ३ वर्षांपासून ही शाळा भरतेय एका समाजमंदिरात. पाऊस आला की फरशी ओली होते, वारे सुटले की वह्या, पुस्तके फाटतात. आदिवासी समाजातील मुले शिक्षण प्रवाहात येण्याचा प्रयत्न करताहेत, मात्र भौतिक असुविधा अडचण बनून येताहेत. तरीही २ शिक्षकांच्या जिद्दीमुळे ही शाळा सुरु आहे.
रोह्यापासून २३ किमी पूर्वेला सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत असणारे आतोणे हे छोटेसे गाव. या गावातील झेडपी शाळेत ५९ विद्यार्थी आहेत, तेही कातकरी आदिवासी समाजाचे.
गावात पूर्वी शाळेची इमारत होती; पण गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ती इमारत मोडली. चिंचवली तर्फे आतोणे आदिवासी वाडीवरील एका समाजमंदिरात आता ही शाळा भरतेय. ५९ विद्यार्थी इथे गमभन गिरवतात. कोकणात जवळपास ३ महिने पावसाळा असतो व या समाज मंदिरात अनेकदा पत्र्यातून व खिडक्यांना दारे नसल्याने पाणी येते व मुलांना बसण्यापासून ते दुपारचे पोषण आहार खान्या पर्यंत कसरत करावी लागते. स्वच्छतागृहाअभावी सर्व मुलांना व शिक्षकांना उघड्यावर शौचास जावे लागते आणि किचन शेड नसल्याने एका झोपडीत माध्यान्ह भोजन शिजवून दिले जाते. जिथे ३० मुलं मोकळेपणाने बसू शकत नाहीत त्या जागेत आज ५९ विद्यार्थी शिकतात, ते ही वेगवेगळ्या वर्गातील. नवीन शाळा बांधकाम व्हावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायतीने अनेकदा प्रस्ताव दिले आहेत पण अजून त्यात यश नाही. अशा अडचणीच्या स्थितीतही आदिवासी मुलांच्या शिक्षणात खंड येऊ नये, यासाठी गट शिक्षण अधिकारी साधुराम बांगारे व केंद्र प्रमुख प्रमोद चवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक गजानन जाधव, जगन्नाथ अब्दागिरे हे दोन शिक्षक जीवाचे रान करताहेत, एक एक अडथळ्यावर मात करत दिवस काढताहेत, त्यांना हक्काची शाळा मिळाली तर दुर्गम पाड्यावर ज्ञानगंगा विना अडथळा पोहोचण्यास मदत होईल अन् उद्याची पिढी सक्षमपणे घडवता येईल. अडथळे असले तरी शिक्षण सुटू द्यायचे नाही, असा निर्धारच या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलायं.

नवी उमेद प्रतिनिधी, रायगड

Tuesday, 7 January 2020

भूक भागवायला हवी (बातम्या : तुमच्या आमच्या मुलांच्या)

मैत्रीण जया हिचा फोन. 'दरवर्षीप्रमाणे आदिवासी पाड्यांमध्ये लहान मुलांकरिता फराळवाटप कार्यक्रम करण्यामध्ये खूप बिझी आहे, दिवाळीभेटीचा कार्यक्रम पुढे ढकलुया.' तिच्या कामाचा आदर करून आम्ही मैत्रिणी राजी झालो. तिचा दरवर्षीचा हा कार्यक्रम, ती नित्यनियमाने बरीच वर्ष करते. खरंच काम तसं स्तुती करण्याजोगं, पण आपलं काम फक्त एकदिवसांपुरतं नसावं असं देखील वाटत. जया करते ते काम नक्कीच छानच आहे. एका व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी पाळायलाच हवी. यात दुमत नाहीच. पण नुकत्याच देशभर असणाऱ्या कुपोषित मुलांची आकडेवारी समोर आलेय आणि ती खूपचं चिंताजनक आहे.
सर्व्हेतून असं समोर आलंय की कुपोषणामुळे २० पैकी ५ मुलं त्यांचा पाचवा वाढदिवस होण्यापूर्वीच मृत्यू पावतात. वाचून भयानक वाटतं. भारत देश अन्न उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पिकवलेलं धान्य साठवायला गोदामं अपुरी पडत आहेत. अशा आपल्या देशात हे वास्तव? नेते जगभरात भारत विकासाचा उच्चांक गाठत आहे म्हणून आरोळी ठोकत आहेत. आणि आपली भावी पिढी अन्न अन्न म्हणून तडफडत आहे. सामान्य नागरिक म्हणून देखील आपण याचा विचार करायला हवा.
अनेक सरकारी योजना असूनही कुपोषणासारखी समस्या भेडसावते. सर्व्हेतून असंही समोर आलंय की, दलित आणि आदिवासी मुलं कुपोषणाचे जास्त बळी पडत आहेत. आदिवासी भाऊ-बहिणींकरीता तर अनेक यॊजना आहेत. पण त्या कितपत त्यांच्यापर्यंत पोचतात? योजना राबवण्यात आपण कुठे न कुठे कमी पडत आहोत. साधनसामुग्री पुरेशी उपलब्ध आहे. फक्त या समस्येला प्राथमिकता देणं गरजेचं.
- लता परब
बातमीची लिंक : https://scroll.in/…/hunger-is-indias-greatest-problem-even-…