Saturday 25 January 2020

जानेवारी (ब्रह्मेपीडीयातील माहीती) आखुडबुध्दी बहुशिंगी

ग्रेगरियन पंचांगानुसार पहिला महिना. अर्थात, या नावाचा उगम भारतीय असून कालौघात हे नाव युरपमध्ये प्रचलित झाले. इ०स०पूर्व ८२३ च्या सुमारास यानवीर्य (ऊर्फ जानवीर) या महापराक्रमी योद्ध्याने हूण आणि शक आक्रमक टोळ्यांचा बीमोड केला. त्याच्या या कृतीमुळे मद्रदेशात सूचीध्वनी शांतता नांदू लागली आणि हूण टोळ्या सैरभैर झाल्या. हूण लोकांनी या ऐतिहासिक पराभवाचे स्मरण म्हणून 'शंखनाद'' नावाचा सण साजरा करणे सुरु केले. कालांतराने, हा सण भारतीय लोकांत संक्रांत म्हणून साजरा केला जाऊ लागला. यानवीर्याने हूणांवर काटेरी गोलिकास्त्रांचा मारा करुन त्यांना हवालदील केले, त्याचे प्रतिक म्हणून आजही संक्रांतीला शर्करावगुंठीत काटेरी हलवा (हवाल शब्दाचा थारेपालट होत तो हलवा बनला.) मित्रांना व आप्तेष्टांना दिला जातो. आपल्या मित्रांत कुणी हूण दडून बसला आहे का हे पाहण्याची ही एक युक्ती असावी. संक्रांतीच्या महिन्यास यानवीर्याचा मास असे म्हटले जाऊ लागले. हे नाव युरपिय संस्कृतीत जातेवेळी जानवीर्य असे झाले. 
(आय आणि जे दोन्हींसाठी रोमन लिपीत एकच अक्षर असल्याने य चा ज होण्याची बरीच उदाहरणे आहेत. भारतीयांनी युरोपीयनांना 'जा' म्हणून सांगितले तर लिपीच्या गोंधळामुळे ते 'या' असे समजून युरोपीय लोकांनी भारतात येऊन ठाण मांडले. यापुढील सर्व इतिहास सर्वश्रुत आहेच. यानवीर्यचे जानवीर होणे ही त्यापेक्षा मोठी गफलत असावी.)
जानेवारी महिना हा साधारणतः डिसेंबरनंतर आणि बहुशः फेब्रुवारीच्या आधी येतो. या महिन्यात ३१ दिवस असतात. परंतु इ०स० १६२२ मध्ये पोपच्या कॅलेंडरची काही पाने फाटल्याने जानेवारी महिना २८ दिवसांचा झाला होता. अर्थात, या काळात लोकांना एकतीस दिवसांची कामे अठ्ठावीस दिवसात संपवावी लागली तरी पगार २८ दिवसांचाच मिळाला. काही भोळसट युरपियन खेडूतांनी तीन दिवस जेवण करणेही टाळले, तर अतिउत्साही मंडळींनी व्हॉट्सॲपवरचे मेसेज वाचून श्वास घेणे टाळण्याचाही प्रयत्न केला.
जानेवारीत एक जानेवारी (नववर्षदिन), १४ जानेवारी (संक्रांत), २२ जानेवारी (ब्रह्मेचतुर्थी) हे महत्त्वाचे सण सहसा येतात. प्लेगच्या काळात (इस १३४९) एक जानेवारी मार्चमध्ये साजरा केला गेला होता तर इ०स० १७५४मध्ये मॉडर्न शाळेच्या मुलांनी जी दिनदर्शिका तयार केली त्यात जानेवारीत मे महिन्याची सुट्टी दाखवली होती.
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment