Tuesday 7 January 2020

ब्रह्मेपीडियातील आणखी एक नोंद (आखुडबुद्धी बहुशिंगी)


आर्टीफिशियल स्टुपीडिटी (कृत्रिम मूर्खपणा)
यंत्रयुगात जसजसे यंत्रांना कृत्रिम बुद्धिमत्ता देणे जमू लागले तसे मानवजातीला कृत्रिम मूर्खपणा देण्याची गरज ठळक होऊ लागली. रोबोट (यंत्रमानव) जितके लवकर बुद्धिमान बनू लागले तितक्या वेगांत मनुष्यांना मूर्ख बनवण्याची प्रगती काही साध्य होईना. म्हणून काही हुशार शास्त्रज्ञांनी कृत्रिम मूर्खपणाची यंत्रे बनवण्यास सुरुवात केली. टेलिव्हिजन हे असेच एक प्राथमिक स्तरावरचे यंत्र होते. सुरुवातीस याचे नाव वेडपट खोके (इडियट बाक्स) असे होते. पण यांवर क्यूंकीसासभीकभीबहूथी सारख्या टीव्ही सिरीयल, बातम्यांच्या चर्चा, चित्रहार वगैरे मनोरंजक आणि उद्बोधक कार्यक्रम दिसू लागले तसे ते मूळ लक्ष्यापासून दूर गेले. यानंतर कम्प्युटर, वाकीटाकी, व्हिडीओगेम यांसम काही अभिनव प्रकार शोधले गेले. परंतु हे प्रकार मूळ उद्देशापासून भरकटत राहिले.
मनुष्यांच्या मूर्खपणाची वाढ रूजावी यासाठी खास अभ्यासक्रमाची रचना करावी असा प्रयत्न काही शास्त्रज्ञांनी केला. यासाठी काही चिंपाझींना मानवाइतपत हुशार बनवून मग उलट्या पद्धतीने त्यांना पुन्हा मर्कट बनवावे असा विचार होता. ही प्रक्रिया बरीच दीर्घ चालणार असल्याने, शिवाय चिंपाझी शास्त्रज्ञांच्या सहवासात राहिल्याने शास्त्रज्ञ त्यांच्यासारखे वागण्याचा धोका असल्याने ही योजना गुंडाळली गेली.
भारतातील प्रसिद्ध संशोधक व्लादिमीर ब्रह्मे यांना काडेपेटीचा फोन करून खेळताना पाहून काही शास्त्रज्ञांनी यावरून स्फूर्ती घेतली आणि काडेपेटीच्या आकाराचा दोरीशिवाय चालणारा फोन बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्यात यश मिळून मोबाईल फोन (भ्रमणध्वनी)ची निर्मिती झाली. मोबाईल फोनचे तंत्रज्ञान शोधल्यावर सुरुवातीस प्रायोगिक तत्वावर प्रयोग करण्यात आले. पहिल्या पिढीचे फोन अवाढव्य आकाराचे असले तरी ते कमी अश्वशक्तीचे असत. कालांतराने फोनचा आकार वाढत गेला तसे त्याच प्रमाणात शक्तीही वाढवता येऊ लागली. फोनचा आकार जसा वाढला त्याच्या व्यस्त प्रमाणात वापरकर्त्याच्या मेंदूचा वापर होतो हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. फोनवर कॅल्क्युलेटर आल्याने पाढे-गणिते विसरली जाऊ लागली, फोनबुक आल्याने कुणाचा फोन नंबर लक्षात ठेवणे संपले, कॅलेंडर असल्याने कसल्याही तारखा ध्यानात राहण्याची गरज संपली- थोडक्यात माणसांच्या मेंदूंची जमीन मूर्खपणाची लागवड करण्याइतपत भुसभुशीत झाली.
नेमके याच वेळेस व्हॉटसॲप आणि फेसबुक यांनी बाळसे धरले. यांवर येणारे 'आग की तरह फैला दो' टाईप मेसेज वाचून रोज कृत्रिम मूर्खपणाच्या लाटेत लाखांनी लोक सामील होऊ लागले. कमेंटमध्ये नऊ टाईप केल्यावर काहीतरी चमत्कार घडणार, हा मेसेज दहा ग्रूपमध्ये फॉरवर्ड केल्यावर संध्याकाळपर्यंत काही चांगली बातमी ऐकायला मिळणार, कतरीना कैफसारखी दिसणारी काठेवाडची भोळी अश्विनी ही मुलगी खरोखरची असून ती आपल्याला 'कटलीय' असे एकेक अक्कलहुशारीचे नमुने दिसू लागले.
या सगळ्यात खरी पंचाईत झाली ती ज्यांच्याकडे नैसर्गिक मूर्खपणा होता त्यांची. आपण हार्डकोअर मूर्ख आहोत हे सिद्ध करायला न जमल्यानं त्यांना थोडक्यात मूर्खांत काढलं गेलं. मानवजात आणि रोबोट यांच्यात परस्परविरोधी असा समतोल असायला हवा, तो असा आर्टिफिशियल स्टुपीडिटीने साधला गेला.
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment