Sunday 8 December 2019

मुली पुन्हा शाळेकडे वळल्या...

‘दीपशिखा’च्या या प्रेरणेचा प्रसार करणार्‍या कार्यकर्त्यांना तयार करण्याच्या मुख्य काम शारदा करते. ‘दीपशिखा’ या उपक्रमात किशोरवयीन मुलींच्या जीवन कौशल्यांवर लक्ष केंद्रित केलं जातं. तसंच स्त्रियांप्रती असलेला समाजातला सनातनी व नकारात्मक दृष्टिकोन दूर करण्याचे काम करते. शारदा अशोक साकरे ही याच ‘दीपशिखा’चं प्रेरणा स्थान.
तिच्या या ध्यासाने 2008 साला पासून जास्त जोर धरला. आपापल्या गावातल्या मुलींचे जीवन घडविण्याची तळमळ आणि धडपड करायची ईच्छा असणार्‍या स्त्रियांना ती सतत शोधत असते. त्यांना प्रेरीका म्हणून निवडण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी ती अथक प्रयत्न करत आहे. या प्रेरीकांच्या प्रशिक्षणात विविध क्षेत्रांचा समावेश आहे. जीवन कौशल्यांबद्दल प्रशिक्षण, शिक्षणाचे महत्त्व, पैशाची बचत करणं का आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे स्वावलंबी का व्हायला हवं हा विषय.
या प्रेरीका पहिल्यांदा पंचायत सदस्यांची भेट घेतात आणि मुलींसाठी किंवा 'किशोरीं'साठी उपलब्ध असणारी विविध सरकारी धोरणे व योजना समजून घेतात. त्या नंतर त्या आपापल्या गावी जाऊन तिथल्या तरुण मुलींमध्ये या योजनांविषयी जनजागृती करतात, त्या सोबतच त्यांना या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी मदत करतात.
बालविवाह ही लातूर आणि आसपासच्या परिसरातील एक गंभीर समस्या आहे. बहुतेक वेळा मुलींचे लग्न ११ किंवा १२ व्या वर्षी केलं जातं. मुलींचं लवकर लग्न केलं जाण्याचं एक मुख्य कारण म्हणजे आई वडीलांना सोबत काम मिळवता येते. ऊस तोडणी मजूर म्हणून पती-पत्नी यांना एकत्रित काम मिळतं आणि चांगले पैसेही मिळतात. अशावेळी त्यांच्या मुलींची सुरक्षा हा मोठा काळजीचा विषय असतो. मुलीला घरी एकटं किंवा इतर कुणाकडे सोडण्यापेक्षा मुलींची लवकर लग्न करणे हाच एकमेव आणि उत्तम पर्याय असल्याचं पालकांचं मत आहे. अजून एक कारण म्हणजे इयत्ता चौथी नंतरच्या शैक्षणिक सुविधांचा अभाव. शाळा खूप दूर असल्याने पालक आपल्या मुलांना सुमारे 3-10 किमी अंतरावर असलेल्या शाळांमध्ये पाठविण्याचा धोका पत्करत नाहीत.
मुलांना स्वत: च्या कमी, जास्त क्षमता आणि मर्यादा हाताळण्याची शिकवण एसडब्ल्यूओटी विश्लेषणाद्वारे शिकवून ‘दीपशिखा’ त्यांचा विकास घडवून आणते. त्यामुळे मुलींना त्यांचे स्वतःचे विशेष ओळखता येतात. आपल्यातल्या कमकुवतपणाबद्दल त्यांना जाणीव होते. आणि त्यावर मात करता येते.

ते मुलींना कामाचे मूल्य शिकवतात आणि स्वतःची उपजीविका मिळवायला शिकवतात. मुलींमध्ये आरोग्य आणि आरोग्याची काळजी घेणे यासारख्या महत्वाच्या गोष्टींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मुलींना प्रशिक्षण दिलं जातं. ते मुलींना सेनेटरी नॅपकिन्स का वापरावे यावर आणि स्वच्छता कशी ठेवावी हे समजाऊन सांगतात. यामुळे दोन उद्दीष्टे साधली जातात. मुलींना स्वावलंबी होण्यास बळकटी देणे आणि आरोग्य व स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे.
बहुतेक वेळा मुली सातवी, आठवीत असतानाच शिक्षणातून बाहेर पडतात. शारदा आणि तिचे सहकारी या मुलींच्या घरी भेट देतात आणि पालकांच्या अडचणी जाणून घेतात. पुन्हा त्यांचं शिक्षण चालू होईल असं मार्गदर्शन आणि मदत करतात. काही पालक आरोग्य आणि स्वच्छता जागरूकता कार्यक्रमांबद्दल खूप विरोध ही करतात. त्यांना वाटते की मासिक पाळी किंवा कुटुंब नियोजन सारख्या गोष्टींची माहिती मुलींना लग्नाआधी किंवा एकूण माहिती होणे चांगलं नाही. त्यामुळे त्या भरकटू शकतात. आणि ते त्यांच्या मुलांच्या हिताचं नाही. अशावेळी विरोध होत असतो. तरीही या सर्व समस्यांशी दोन हात करत शारदा आणि तिची टीम खेड्यात, आणि या कामगार लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची पोचपावती म्हणजे, गेल्या वर्षी 292 मुली पुन्हा शाळांमध्ये जाऊन शिकू लागल्या.
#नवीउमेद #नकोलगीनघाई



- गीतांजली रणशूर

No comments:

Post a Comment