Sunday 8 December 2019

सिंधुदुर्गमधील भिंतींना युवा चित्रकारांनी केले रंगतदार!

सिंधुदुर्गमधील कुडाळ, वेंगुर्ला, देवगड, सावंतवाडी, मालवण या तालुक्यांतली भित्तीचित्रं सध्या येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरा खिळवून ठेवत आहे. सिंधुदुर्गमध्ये भित्तीचित्र ही संकल्पना पूर्णतः नवखी होती, पण तरीही ती सिंधुदुर्गवासियांना खूप भावली आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातच महाविद्यालयात शिकून, त्याचठिकाणी आपल्या कलेद्वारे आपण शहरातच आपली एक वेगळी ओळख निर्माण करून शकतो, त्यातून रोजगार निर्माण करू शकतो, आपल्या कलेद्वारे आपण आपल्या शहराला सुशोभित करू शकतो, तसेच त्याद्वारे सामाजिक संदेशही देऊ शकतो हा दृष्टीकोन या युवकांनी दिला आहे. विशेष म्हणजे अवघ्या ३ वर्षात त्यांनी ही उंची गाठली आहे. सिंधुदुर्गमधल्या चार युवकांच्या चित्रांची ही गोष्ट. हे चौघं आहेत- गुरु कुडतरकर, दत्ताराम पवार, रविकिरण कांबळी, पंकज गोगळे. 
 
ही गोष्ट सुरू होते कुडाळमधील एका सलूनमधील भिंत रंगवण्यापासून.. ही मुलं आहे 27 वर्षांची. सिंधुदुर्गमधीलच "बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स" या महाविद्यालयातून २०१४ साली ते उत्तीर्ण झाले. आता पुढं काय? उत्तराच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली. पण यात त्यांचे मन रमेना. आपण शिकलेल्या कलेचा मिळावा तितका मोबदलाही नाही आणि आपल्या कलेचं चीजही होत नाही हे लक्षात आलं. मग यातील गुरु कुरतडकर याच्या मनात आलं की आपणच आपल्या कलेद्वारे आपल्याच गावी जाऊन यामध्ये काही केलं तर! निर्णय तसा धाडसाचा होता. मग त्याने आपल्यासोबतच शिक्षण घेतलेल्या, मुंबईतच वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत असणाऱ्या आपल्या मित्रांना ही संकल्पना सांगितली. प्रयत्न करण्यास हरकत नाही, अशा विचाराने ते पुन्हा सिंधुदुर्गात आले आणि त्यांनी "ओरीगो डिझाईन स्टुडिओ"ची कुडाळमध्ये आपल्या गावी स्थापना केली.
भित्तीचित्राद्वारे आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो, हे त्यांनी जाणलं. तशी सुरुवात करायचं ठरलं. मग त्यांनी सर्वप्रथम ज्याठिकाणी सर्व स्तरातील लोक येतात, जिथं दिवसभर अधिकाधिक चर्चा होते त्या सलूनमध्ये पहिलं भित्तीचित्र साकारले. पैसे नसल्याने कृष्ण धवल रंगात रंगविले. असं असूनही या चित्राची चर्चा होऊ लागली. मग त्यांनी येथील स्मार्ट कुडाळ फोरम या संस्थेच्या सहकार्याने कुडाळमधीलच एक २०० फुट लांब व १० फुट उंचीच्या भव्य भिंतीवर चित्र साकारलं. यामध्ये त्यांनी सिंधुदुर्गमधील दशावतार लोककला, चित्रकथी लोककलेला स्थान दिलं. या भित्तीचीत्राची अधिक चर्चा झाली. दिवसरात्र हे युवक यासाठी झटत होते. काहीतरी वेगळं आणि नवं होतं पण लोकांना कौतुक वाटत नव्हत. हळूहळू चित्र पूर्ण होऊ लागलं आणि लोकांच्या नजरा कौतुकाने चित्राकडे आणि मुलांकडे वळू लागल्या.
त्यांच्या या कौशल्याची वेंगुर्ले नगर पंचायतीचे तत्कालीन सीईओ रामदास कोकरे यांनी दखल घेतली. त्यांनी शहरात शासकीय संदेश या युवकांकडून चित्रांद्वारे रंगवून घेतले. त्यांच्या कामाची चर्चा सिंधुदुर्गमध्ये सर्वत्र होऊ लागली. नंतर देवगडमध्ये त्यांनी "द आम शहर" या शीर्षकाखाली हिरव्या, केशरी आणि पिवळ्या रंगाच्या थीममध्ये पर्यटनाचा संदेश दिला. अशाप्रकारे कामाचा आवाका वाढत गेला, तसतसे त्यांना सहकार्यही मिळत गेले, नवीन शिकणारी मुले त्यांच्याशी जोडली गेली आणि आता ही एक जणू चळवळच झाली.
रंगाच्या या दुनियेची आवड असणाऱ्या मुलांसाठी आता त्यांनी वर्ग सुरू केले आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे गोव्यात फेकून देण्यात येत असलेल्या सुला वाईन्सच्या बाटल्यांवर पेंटिंग करून त्याचे गेली २ वर्षे "लायटिंग लम्प आर्ट" प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
-अभिजित नांदगावकर

No comments:

Post a Comment