Sunday 8 December 2019

परिस्थितीच्या ‘अडथळ्यांची’ शर्यत ‘ऑलिम्पिक’ पर्यंत

 “खरं तर मला उच्चशिक्षण घ्यायचं होतं; पण जेमतेम आर्थिक परिस्थितीने ते शक्य झालं नाही. त्यामुळे मी बारावीनंतर सैन्यात भरती झालो. तिथं माझ्यातल्या धावपटूला चालना मिळाली. आज देशासाठी खेळण्याचा आनंद शब्दांत सांगता येणारा नाही. ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकं जिंकणं हेच एक ध्येय आता डोळ्यांसमोर आहे.” मांडवा (ता. आष्टी) येथील अविनाश साबळे सांगत होता. ३ हजार मीटर अडथळा शर्यतीत अविनाश भारताकडून ऑलिम्पिकासाठी पात्र ठरला आहे. सन १९५२ नंतर तब्बल ६७ वर्षांनी भारताला या क्रीडा प्रकारात पुरुष गटात प्रतिनिधित्व करण्याची संधी अविनाशच्या रुपाने मिळाली आहे. 
जेमतेम आर्थिक परिस्थिती, चार खडकाळ एकर शेती, उदरनिर्वाहासाठी २० वर्षं वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करणारे वडील अन् इच्छा असूनही उच्च शिक्षण न घेता आल्याने सैन्य दलाची स्वीकारलेली नोकरी.. परिस्थितीने उभे केलेल्या ‘अडथळ्यांना’ पार करून अविनाशने ‘अडथळा शर्यती’त थेट टोकिओ ऑम्लिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. 
सैन्य दलांतर्गत होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेत सन २०१५ मध्ये पहिल्यांदा त्याने सहभाग नोंदवला. धावण्याच्या वेगाने त्याने लक्ष वेधून घेतलं. प्रशिक्षक अमिरश कुमार यांनी त्याच्यातील गुणवत्ता हेरली आणि त्याला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. २५ वर्षीय अविनाशने अवघ्या ३ वर्षांतच ३ हजार मिटर अडथळ्यांची शर्यत (स्टीपलचेस) या प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत गुणवत्ता सिद्ध केली. 
अविनाशने कठोर परिश्रम घेत प्रत्येक स्पर्धेत छाप सोडली. सप्टेंबर २०१८ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत त्याने ८ मिनिटे २९.८० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला. त्यानंतर मार्च २०१९ फेडरेशन कपमध्ये त्याने ८ मिनिटे २८.९४ सेकंद अशी वेळ नोंदवली. दोहा इथं झालेल्या स्पर्धेत पहिल्या फेरीत त्याने ८ मिनिटे २५.२३ सेकंद वेळ नोंदवून आपला रेकॉर्ड मोडला. त्यानंतर दोनच दिवसांत दुसऱ्या फेरीत ८ मिनिट २१.३७ सेकंद अशी वेळ नोंदवून वर्षांत चौथ्यांदा नवा रेकॉर्ड स्थापन केला आणि ऑलिम्पिक प्रवेशही पक्का केला. 
त्याचे वडिल मुकुंद साबळे म्हणतात, “पोरांनं कष्टाचं चिज केलं. पहिल्यांदा सैन्य दलात भरतीला गेला तेव्हा निवड झाली पण काही कागदपत्रं कमी पडले. अधिकाऱ्यांनी ३ तासांचा वेळ दिला. बायकोच्या गळ्यातील सोनं मोडून ३ हजार रुपये उपलब्ध केले अन् कागदपत्र आणली. पण यात वेळ आणि संधी हुकली पुन्हा चार महिन्यांनी भरती निघाली अन् अविनाश भरती झाला त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
#नवीउमेद
- अमोल मुळे, बीड

No comments:

Post a Comment