Sunday 8 December 2019

आईची साथ, मुलगी झाली सहायक नगररचनाकार

निकिता दयानंद निर्मळे. सहायक नगररचनाकार गट -अ राजपत्रित अधिकारी त्या झाल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2018 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल याच महिन्यात जाहीर झाला. त्यात निकिता उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या यशामागे त्यांच्या मेहनतीबरोबरच त्यांच्या आई कविता यांचे अपार कष्टही आहेत. 
निकिता तुळजापूर तालुक्यातल्या सलगरा इथल्या. त्या चार वर्षांच्या आणि भाऊ प्रतीक अवघा दहा महिन्यांचा असताना वडिलांचं कर्करोगानं निधन झालं. पतीच्या निधनानंतर 2004 मध्ये कविता जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर लिपिक पदावर काम करू लागल्या. मुलांना उत्तम शिक्षण द्यायचं होतं.
निकिता यांचं उस्मानाबादमधल्या छत्रपती शिवाजी प्रशालेत 10 वी पर्यंत शिक्षण, दहावीला 95.45 टक्के. त्यानंतर 12 वी पर्यंत शिक्षण लातूरला दयानंद महाविद्यालयातून. स्थापत्य जलअभियांत्रिकी (बी.टेक) 2015 मध्ये नांदेडमधल्या गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयातून. बी.टेकला 60 टक्के. तोवर एमपीएससी करण्याचा निर्णय पक्का झाला होता. त्यासाठी पुणे गाठलं. 2016 पासून प्रयत्न सुरू केले. यात अनेक आव्हानं होती पण आईची भक्कम साथ होती. अखंडपणे सातत्यपूर्ण नियोजनरित्या केलेला अभ्यास प्रतिवर्षी काहीतरी शिकवत होता. यश खुणावत होतं पण मिळत नव्हत. 2016 च्या एमपीएससी पूर्वपरीक्षेत अपयश आलं. पुन्हा चिकाटीनं तयारी सुरू केली. निकिता 2017 साली पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्या . पण मुख्य परीक्षेत अपयश आलं. 
2018 ला मात्र अभियांत्रिकी आणि नगररचनाकार अशा दोन परीक्षा उत्तीर्ण. एकाच ठिकाणी मुलाखतीसाठी जावं लागणार होतं . नगररचनाकारसाठी प्रथम बोलावणं आलं. आईचे कष्ट डोळ्यासमोर होते. समोर आलेली संधी हातची जाऊ न देण्याचा निश्चय झाला. मुलाखत यशस्वी झाली. 
"आजवर केलेल्या परिश्रमाचं फलित मिळालं''. कविताताई सांगतात. ''कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर समाजात यशस्वी पालक होण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. पण जिद्ध,मेहनत आणि प्रामाणिकपणा यांच्या बळावर अपेक्षित ध्येय साधता येतं. ''


-अनिल आगलावे, उस्मानाबाद

No comments:

Post a Comment