Sunday 8 December 2019

मराठी माणूस उद्योगात पुढं का?- भाग एक (आखुडबुद्धी बहुशिंगी)


मराठी माणसाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी सर्वात ठळक म्हणजे त्याची उद्यमशीलता. जसे पंजाबी लोक रागदारी सुरावट गाण्यासाठी किंवा बंगाली लोक मल्लविद्येत किंवा उत्तरेकडचे लोक जातपात न मानण्यासाठी किंवा मद्रासी लोक सर्वांत मिळून मिसळून राहण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तसेच हे. याचं कारण काय असावं हा प्रश्न अनेक वर्षं मला सतावत होता. परवाच त्याचं उत्तर आमच्या घराशेजारच्या केशकर्तनालयात मिळालं.
निसर्गनियमांनुसार केस वाढले असल्यानं मी एका सकाळी त्या सलूनमध्ये शिरलो. नाभिकदादा गालफडात तंबाखूची गोळी ठेवून एका कटींगच्या खुर्चीवर पेपर वाचत बसले होते. मला बघताच खुर्चीतून अजिबात न हलता त्यांनी हातानं दरवाज्यातून बाजूला व्हायचा इशारा केला आणि एक जोरदार पिंक टाकून विचारलं, "काय? कटींग?"
"हो." मी इथं कबड्डी खेळायला आलोय का रे हा प्रश्न मी मनातच गिळून टाकतो. 
"तुमचं?"
मी सोबत एखादा बकरा घेऊन आलोय आणि फावला वेळ असल्यानं स्वतःच त्याची हजामत करणार आहे अशी काहीशी या न्हावीदादांची समजूत असावी. किंवा मी कात्री घेऊन खुद्द त्यांची कटींग करावं अशी अपेक्षा असावी. यावर मी काही बोललो नाही. मालक माजी कबड्डीपटू होते भिंतीवर टांगलेल्या फोटोवरून कळलं होतं. क्षणभर विचार आला की नुसती बोनस लाईन शिवून परत जावं. पण मी यांत्रिकपणे बावळटासारखी मान डोलावली. 
"चला मग." असं म्हणून मालकांनी खुर्चीवरून न उठता टीव्ही लावला. पूर्वीच्या सलूनमालकांना रेडीओची जशी सवय होती तसं हल्ली टीव्ही नसला तर यांचे हात थरथरत असावेत. मी उभाच आहे हे बघून नाईलाजानं मालक खुर्चीवरून उठले. त्यांचा विचार बदलायच्या आधी मी सुळ्ळकन खुर्चीवर चढून बसलो. शाळेत तीन वर्षं संगीतखुर्चीचा चॅंपियन असल्याचा अनुभव असा उपयोगी पडला. 
मालकांनी मोठ्या कष्टानं खाली वाकून कपाटातून एक कापड काढलं. इतक्यात, जेम्स बाँडच्या बापालाही जमणार नाही अशी टेक्नॉलॉजी सलूनमधल्या खुर्चीत बसवलेली असते याची मला जाणीव होते. कारण, मी खुर्चीत बसताक्षणी मालकांना कुणाचातरी फोन येतो. एका हातात कापड, दुसऱ्या हातात कंगवा, वाकड्या मानेत अडकवलेला मोबाईल आणि तोंडात तोबरा अशा अवस्थेत मालक त्या कुणाशीतरी फोनवर बोलू लागतात. फार काही महत्त्वाचा विषय नसल्यानं माझ्या गळ्याभोवती कापड गुंडाळत मालक फोनवर बोलतात. "त्येला चांगला टाईट क्येला पायजेल." असं म्हणत समेवर माझ्या नरड्याशी कापड आवळलं जातं. यानंतर गाडी कुठल्यातरी जमिनीच्या डीलकडं किंवा कुणाच्यातरी शिर्डीवारीसाठी भाड्यानं गाडी जोडून देण्याकडं वळल्यानं मालक मला जिवंत सोडून पाचेक मिनीटं बोलत राहतात. मात्र हा संपूर्ण वेळ ते वाया न घालवता सगळी आयुधं टेबलवर मांडण्यासाठी वापरतात. शेवटी, मालकांनाच कंटाळा येतो म्हणा की सगळी हत्यारं रचून संपतात ते माहीत नाही, पण मालक त्या समोरच्याला "अरे, गिराईक बसलंय केवाधरनं समोर. नंतर बोलतो." असं म्हणून फोन ठेवतात. 
यानंतरचं पुढचं काम म्हणून ते टीव्हीचा व्हॉल्यूम फुल्ल करून त्यावर बरोबर अजय देवगण-सुनील शेट्टीची गाणी लावणारं ते कोणतंतरी चॅनल आहे, ते लावतात. त्यावर सातों जनम मै तेरे चालू झालंय याची खात्री करून ते माझ्याकडं वळतात आणि विचारतात, "हं? कसे कापू?"
"कात्रीनं कापा." मला केस कापण्यातला दुसरा कोणता प्रकार ठाऊक नसतो.
"म्हंजे किती? बारीक ठीऊ की कशे?"
"मध्यम ठेवा." हे उत्तर यासाठीच द्यायचं असतं की मध्यम म्हणजे मालकांना आपल्या मगदुराप्रमाणं आणि सवडीनुसार कात्री चालवता येते. काही न्हावीदादांना भलताच उत्साह असतो. ते आपल्या डोईवर सव्वा सेंटीमीटर केस असले तरी कंगव्यानं ते ओढओढून कापत असतात. तर काहीजण समोरची झुलपं जरा उगीच कापतात आणि झालं म्हणून सांगतात. अशावेळी 'मध्यम कापा' असं सांगितलं तर दोघांनाही आपल्या कलेत कसर राहीली नाही याचं समाधान वाटतं.
"मध्यम? मशीन मारू?" मालकांच्या मनात शॉर्टकट असावा. 
मी निग्रहानं नकारार्थी मान हलवायला जातो. तितक्यात बगलेत कोंबडी पकडावी तसं मालक डाव्या हातात माझं मुंडकं पकडतात आणि उजव्या हातानं हातानं कंगवा फिरवणार, तोच पुन्हा फोन येतो. शिर्डीवाल्याला भोलेरो हवी असताना ट्र्याक्स मिळाली म्हणून तो नाराज असतो. माझी मानगूट आणि मुद्दा अजिबात न सोडता मालक ट्र्याक्स कशी भारी गाडी आहे हे पटवून सांगतात. हे ऐकून खुद्द माझ्या मनात आपली गाडी विकून ट्रॅक्स घ्यावी हा विचार येतो. मराठी माणसाच्या उद्यमशीलतेतला पहिला पैलू- समोरच्याला आपलं म्हणणं पटवून सांगणं हा मला इथं दिसतो.
(बाकी मुद्दे पुढच्या भागात.)



- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment