Sunday 8 December 2019

एका हेडमास्तरांची गोष्ट

नागपूर जिल्हा. इथल्या काटोल तालुक्यातील कारल्याची जिल्हा परिषद शाळा. इथले हेडमास्तर मोहन रामचंद्रराव डांगोरे यांची ही गोष्ट. २०१३ साली डांगोरे सरांची इथं बदली झाली. ४ थी पर्यंतच्या या शाळेत अवघे १८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डांगोरे सर विद्यार्थ्यांना आपल्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. सरांच्या निवृत्तीला खरंतर एकच वर्ष बाकी होतं. तरीही सरांनी शाळेला नवीन ओळख मिळवून द्यायचं ठरवलं. 
शाळेच्या सभोवताली २५० पेक्षा अधिक झाडांची लागवड करून शाळेला ऑक्सिजनपार्क म्हणून ओळख निर्माण करुन दिली आहे. यात जास्वंद, गुलाब, मोगरा, चांफा, शेवंती, कन्हेरी, लिली आदी फूलझाडे तसेच पपई, केळी, पेरु, चिकू, बोरी, आवळा, जांभूळ, बदाम इत्यादी फळझाडे तर परसबागेमध्ये भेंडी, पालक, मेथी, कोथींबीर, वांगी, टमाटर, वाल, कोहळं, दोडकी, शेवगा, काकडी, तूर, मका, यांची लागवड केली आहे. या शिवाय पाम, गुलमोहर, अशोका, विद्या, शतपर्णी, ख्रिसमस ट्री अशी विविध वृक्षांचीही लागवड केली आहे. यातील भाजीपाला व फळांचा शाळेच्या पोषण आहारात वापर केला जातो. उत्पादन मुबलक प्रमाणात होत असल्याने विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठीही याचा वापर होतो. विद्यार्थ्यांना झाडांचं महत्त्व पटावं म्हणून सर त्यांना प्रत्यक्षपणे या कार्यात सहभागी करुन घेतात.
इथली लोकवस्ती जेमतेम ४००. तरीही गावकऱ्यांनी आणि सरांनी मिळून ३ लाख रुपयाची लोकवर्गणी गोळा करून शाळेसाठी एक लाउडस्पीकर, हार्मोनियम, तबला घेतला. शिवाय या पैशातून विजभरणा व ऑक्सीजन पार्कची निर्मीती सुद्धा केली आहे.
गावक-यांना लाऊडस्पीकरच्या माध्यमातून रोज राष्ट्रगीत, पसायदान, परिपाठ, गीत गायन ऐकविण्यात येतं. याच लोकवर्गणीतून शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. संपूर्ण साक्षरता अभियानाच्या जिल्हास्तरीय कला पथकातून जगजागृती, व्यसनमूक्ती, अंधश्रद्धा, निर्मूलन शिबीराचे ठिकठिकाणी आयोजन करुन समाज प्रबोधन व कुटूंबनियोजनाचा प्रचार करुन पूरोगामी महाराष्ट्राच्या जडण घडणीत खारीचा वाटा उचलला आहे.
या उपक्रमासाठी मोहन डांगोरे सरांना २ वेळा आदर्श शिक्षक तसंच उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळाला असून त्यांचं राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे. डांगोरे सरांचं “गुरुजींच्या गोष्टी” हे पुस्तक प्रसिद्धी मार्गावर आहे. 
शैक्षणिक कार्यासोबतच डांगोरे सर सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांनी आधार संस्था स्थापन करुन बाहेरील गुणवत्ता प्राप्त गरीब, गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना आर्थीक, शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून मदत व मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचे शिक्षणाप्रती मनोबल टिकवून ठेवत असतात. 


- निता सोनवणे, नागपूर 

No comments:

Post a Comment