Sunday 8 December 2019

विमानातून जाताना असं वाटत होतं जणू मीच हवेत पंख पसरून उडतेय...


“खाली अथांग सागर आणि वर निळं आकाश, विमानातून जाताना असं वाटत होतं जणू मीच हवेत पंख पसरून उडतेय", बीड जिल्ह्यातील कडा गावच्या सोनाबाई रामचंद्र खंदारे आपल्या परदेश सफरीबद्दल सांगत होत्या.
परदेशात जाणं आता तशी नाविन्याची गोष्ट राहिलेली नाही. पण सोनाबाई खंदारे यांचा हा परदेश प्रवास मात्र नाविन्याचा होता. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या पायलट असलेल्या नातीने त्यांची ही सफर घडवून आणली होती. विशेष म्हणजे नात जे विमान चालवत होती त्याच विमानातून आजीचा हा प्रवास सुरू होता.
सोनाबाई खंदारे या कडा गावच्या रहिवाशी. त्यांची मोठी मुलगी प्रा.आशा इंगळे या मुंबईत असतात. साहित्यिक भगवान इंगळे हे त्यांचे जावई. त्यांचीच मुलगी नीलम इंगळे उर्फ लोबो पायलट आहे. तिनेच आजी सोनाबाई खंदारे यांना दुबई, ओमान, शारजा असा परदेश प्रवास मार्च महिन्यात घडवला. आजीला सोबत असावी म्हणून नीलमच्या आई प्रा.आशा इंगळे या देखील त्यांच्या समवेत होत्या. नऊवारी साडीतील सोनाबाई खंदारे यांचं एअर इंडियातील नीलमच्या सहकाऱ्यांनी स्वागत तर केलंच पण मुंबई विमानतळ ते संपूर्ण परदेश प्रवासात अनेक देशी विदेशी पर्यटक, तेथील रहिवासी यांनीही कौतुक केलं. त्यांच्यासोबत फोटोही काढले.
दुबईतील बुर्ज खलिफा, गोल्डन सुकसारखा भव्य बाजार यासह अनेक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. विशेष म्हणजे सोनाबाई निरक्षर आहेत. आपली मुलगी शिकली, तिनेही तिच्या मुलीला शिकवून पायलट बनवलं. त्यामुळे मला केवळ फोटोत दिसणारं जग प्रत्यक्ष तिथं जाऊन पाहता आलं हे सांगताना सोनाबाई खंदारे यांच्या चेहऱ्यावर पायलट नातीचं कौतुक ओसंडून वाहत होतं.

- राजेश राऊत, बीड

No comments:

Post a Comment