Sunday 8 December 2019

सैका आणि तिची कथा...

सैका, सध्या वय वर्षे १९, तिचा भाऊ आरिफ, वहिनी आणि त्यांच्या मुलांसोबत राहते. सध्या तिचे पालक त्यांच्या उत्तर प्रदेशातल्या, नेपाळच्या सीमेजवळील वडिलोपार्जित गावी परत गेले आहेत. आरिफ सैकाला फारसे चांगले वागवत नाही; चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व असतं असं त्याला वाटतं. तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती तेव्हा, सैका दहावीची (एसएससी) परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तिच्या मैत्रिणींनी कॉलेजला जायचा निर्णय घेतला होता. ‘तू इतक्या कोवळ्या वयात लग्न का करत आहेस? आम्ही कॉलेजला जात आहोत. काहीतरी कर, घरी बसू नकोस, त्यामुळे त्यांना तुझं लग्न लावून देण्यासाठी बहाणा मिळेल. काहीतरी कामात स्वतःला गुंतवून घे’; तिच्या चांगल्या मैत्रिणींनी तिला सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यामुळे सैका विचार करायला लागली – तिचं लग्न ज्याच्याशी ठरलं होतं तो हातमाग कामगार होता. तिचा स्वतःचा भाऊ हातमागावर काम करत होता आणि त्याला उदरनिर्वाह करणं कठीण जात होतं. ‘मला लग्न केल्यावर त्रासच होईल’, असा तिने विचार केला. दुसरं म्हणजे तिला शिकायचं होतं आणि स्वावलंबी व्हायचं होतं. सैकाला तलाकची भीती वाटत होती, तिने तिच्या परिसरात सोडून दिलेल्या बायका पाहिल्या होत्या. अशा परितक्त्या स्त्रियांमध्ये अशिक्षित स्त्रियांना सर्वाधिक त्रास होत होता. त्या त्यांच्या कुटुंबाच्या दयेवर अवलंबून होत्या. त्यांना वाईट वागवलं जाई; रोजचे कष्ट हेच त्यांचं नशीब होतं. ‘मला त्या अवस्थेत राहायचं आहे का? – नाही’, सैका म्हणाली. सैकाच्या तिला तिच्या लग्नासाठी उतावीळ झालेल्या तिच्या मोठ्या भावाशी, आरिफशी बोलण्याचा सल्ला दिला. ती त्याच्याशी बोलली आणि आणखी दोन वर्षे लग्न करायचं नाही असा निर्धार त्याच्यापाशी बोलून दाखवला. आरिफला संताप येण्यासाठी इतकं पुरेसं होतं; ‘तुला समजत नाही, हा इभ्रतीचा (कुटुंबाचा सन्मान) प्रश्न आहे’. तिचा भाऊ ‘नाही’ हे उत्तर ऐकून घ्यायला तयारच नव्हता. ‘तुला शिकायचं असेल तर, तुझ्या नवऱ्याने परवानगी दिली तर लग्नानंतर शिक’. सैका अतिशय निराश झाली, पण मग तिने मदत घ्यायची ठरवले. तिने त्या भागात काम करणाऱ्या कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) या एनजीओशी संपर्क साधला. सीसीडीटीच्या पदाधिकारी बसरीन शेख यांनी हस्तक्षेप करण्याचं वचन दिलं. त्यांनी मासिक पाळी, मासिक पाळीदरम्यान स्वच्छता, लैंगिक संबंध, संततीनियमन आणि गर्भारपणातील काळजी या विषयांवर किशोरवयीन मुली आणि स्त्रियांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. आरिफला समोरासमोर आव्हान देण्याऐवजी, बसरीनने कौटुंबिक समुपदेशनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सैकाची वहिनी गरोदर होती. श्रीमती शेख यांनी गरोदरपणात कशी काळजी घ्यायला हवी यासंबंधी तिचं समुपदेशन केलं. गरोदर मातेने कोणत्या लसी घेतल्या पाहिजेत याविषयीही तिने कुटुंबाला माहिती दिली. सैकाच्या वहिनीला सल्ला दिल्यानंतर शेख यांनी तिच्या भावाशी बोलण्याचा निर्णय घेतला. ‘ती फक्त १७ वर्षांची आहे, तुला तिचं लग्न का लावून द्यायचं आहे? ती अजून लहान आहे’. आरिफ नाराज झाला, ‘हा आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, तुम्ही लोकांच्या खासगी विषयांमध्ये नाक का खुपसता?’ त्याने विचारलं. ‘म्हणजे तुम्ही आमच्या घरातील बाबी बाहेर जाऊन सांगाल? तुम्हाला काही शरम वाटत नाही का?’, आरिफने संतापाने विचारलं. पण सैका दृढनिश्चयी होती, त्याच्या संतापानंतर तिने शांतपणे त्याला सांगितले, ‘मी अजून दोन वर्षे लग्न करणार नाही’. आरिफला तिचं म्हणणं मान्य करावं लागलं, तसंही १६ वर्षांच्या मुलीचं लग्न लावून देणं बेकायदेशीर होतं. ‘ठीक आहे, मी त्या तरुणाच्या (सैकाचा भावी पती) कुटुंबाशी बोलतो. आरिफने पालकांशी संपर्क साधला; ते चिडले आणि संतप्त झाले. आरिफने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस सैकाच्या पालकांनी तिचं म्हणणं ऐकलं आणि तिला आणखी दोन वर्षं दिली. ‘दोन वर्षं तुझं शिक्षण घे, त्यानंतर आम्ही वाट पाहणार नाही’, त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. ‘लक्षात ठेव, माझ्याकडे तुझ्या शिक्षणासाठी पैसे नाहीत’, आरिफने जाहीर केले. मंगनी (एंगेजमेंट) रद्द करावी लागली. सैकाच्या नकाराबद्दल शेजारच्यांनी आणि समाजाने कुचाळक्या करायला सुरुवात केली, अनेकांनी ‘तिला डोके कमीच (घनचक्कर) आहे’ अशी अनेकांनी केली. सैकाने या शेऱ्यांकडे लक्ष दिले नाही, तिला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी शांत राहायचं होतं. तिला औषधशास्त्र शिकायचं होतं. तिच्या शेजारील कुटुंबातील १७ वर्षांची किशोरवयीन मुलगी लग्न लावून दिल्यानंतर परत आली होती. तिच्या पतीचे बाहेर दुसऱ्या स्त्रीशी प्रेमसंबंध होते. या घटनेचा सैकाच्या कुटुंबावर परिणाम झाला. सैकाला पैशांच्या अभावामुळे फार्माकॉलॉजी अभ्यासक्रमात दाखला घेता आला नाही. तिने शिवणकाम शिकायचं ठरवलं. तिने कोचिंग क्लासला जायला सुरुवात केली. ‘मी शिवणकाम शिकत आहे, कारण मला माझं उत्पन्न कमवायचं आहे. मला कोणावरही अवलंबून राहायचं नाही’, सैकाला स्वतःच्या अस्तित्त्वाच्या आव्हानांची पुरेपूर कल्पना होती. ‘पण माझ्याकडे फारसा वेळ नाही, मला तडजोड करावी लागेल. मला समजून घेणारा आणि जबाबदार पती हवा आहे, त्याला जबाबदाऱ्या माहिती असतील आणि त्या समजून घेईल’, सैकाच्या आयुष्याकडून कमीत कमी अपेक्षा होत्या. ‘आपल्याला कोणाकडे भीक मागावी लागू नये. मला लोकांकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे मागायचे नाहीत. मला मी किंवा माझ्या कुटुंबाने कोणावरही अवलंबून राहायला नको आहे’. ‘पालकांनी मुलींचं लग्न लावून देण्याची घाई करू नये. त्यांनी मुलींची स्वप्नं आणि आकांक्षा यांचा आदर करावा. मला माझं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही. पण इतर मुलींची स्वप्ने चिरडता कामा नयेत’.सैकासारख्या तरुण स्त्रिया कोणतीही गोष्ट दुसऱ्याच्या विचाराखाली दबून स्वीकारायला तयार नाहीत. त्या त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी लढायला तयार आहेत. 

- सुजाता शिर्के, अलका गाडगीळ 

#नवीउमेद #नकोलगीनघाई

No comments:

Post a Comment