Sunday 8 December 2019

केमिस्टच्या दुकानात (आखुडबुद्धी बहुशिंगी)


इंग्रजी सिनेमातले डिटेक्टीव्ह घालतात तसा काळा गॉगल आणि पाऊस पडत नसतानाही पायघोळ रेनकोट घालून एकजण भर दुपारी केमिस्टच्या दुकानात येतो.
दुकानदार : बोला काय पायजे?
माणूस : तुमच्याकडं आपलं ते हे…
दुकानदार : नक्की काय ते बोला.
माणूस : (कुजबुजत्या सुरात) आपलं ते हे, म्हणजे आपलं ते औषध.
दुकानदार : कसलं ते औषध?
माणूस : आपलं ते ह्याचं, म्हणजे आपले ते हे… उंदीर मारायचं.
दुकानदार : रॅट पॉयझन?
माणूस : हो तेच. (दबक्या आवाजात) पण काय हो, हे पिल्यावर पन्नास वर्षाची बाई मरू शकते का?
दुकानदार : (संशयानं) नक्की कशासाठी वापरणार आहात?
माणूस : (सावरून घेत, गडबडीनं) नाही हो. आपलं सहज. काहीदा आपण चुकून साखर समजून हे कॉफीत टाकलं तर पन्नास वर्षांची बाई मरू शकेल ना, हे आपलं सहज विचारलं.
दुकानदार : हे रॅट पॉयझन आहे. हे खाल्ल्यानं उंदीर बिळातून बाहेर येऊन मरतात.
माणूस : (समजल्यासारखी मान डोलावत) अच्छा. म्हणजे किचनमधून हॉलमध्ये येऊन मरणार तर. काय हो, यापेक्षा जालीम औषध नाही का एखादं? आमचे उंदीर खूप मोठे आहेत, साडेपाच फूट तरी असतील…
दुकानदार : नाही, बाजारात सध्या हेच सर्वात जालीम औषध आहे.
माणूस : सायनाईड किंवा स्ट्रिकनीन नाही का तुमच्याकडं?
दुकानदार : नक्की कशाला हवंय?
माणूस : उंदरांसाठीच! त्यांच्या कॉफीत थोडंसं विष घालून त्यांना मारावं म्हणतोय. फार छळतात हो. सतत डोक्याला भुणभुण लावलीय त्यांनी. टीव्हीवरच्या सिरीयलच्या वेळा सोडल्या तर एक मिनीट शांत बसू देत नाहीत. शिवाय माझ्याविरुद्ध रोज बायकोचे कान भरत असतात. उंदरांमुळं जगणं असह्य झालंय बघा. 
दुकानदार : (कोरडेपणे) अं, यापेक्षा जालीम काही नाही आमच्याकडं.
माणूस : मग तुमच्याकडं दोरखंड मिळेल का हो?
दुकानदार : दोरखंड? तो का?
माणूस : हो, पाचसहा फूट लांब दोरखंड. म्हणजे उंदरांना पंख्यांना टांगावं काय असा विचार करतोय. का हो, उंदरांनी आत्महत्या केल्यावर घरमालकाला पकडतात का?
दुकानदार : माझ्या माहीतीप्रमाणे, नसावेत. पण आम्ही दोरखंड ठेवत नाही.
माणूस : अं, मग पिस्तूल मिळेल? छोटंसं सहाबारीही असलं तरी चालेल.
दुकानदार : नाही. 
माणूस : तुम्हांला काय वाटतं, उंदरांचा झोपेत गळा दाबून मारलं तर?
दुकानदार : अहो, पण उंदरांच्या बिळात जाऊन त्यांचा एवढासा गळा कसा दाबणार तुम्ही?
माणूस : ह्या! मग तुम्ही माझ्या सासू… आपलं, आमच्या घरातल्या उंदरांना भेटला नाहीत कधी. सतत मेंदू कुरतडत असतात. साडेपाच फूट उंच, लठ्ठ, जाड चष्मा आणि वचावचा चालणारी जीभ…
दुकानदार : इतके मोठे उंदीर असल्याचं कधी ऐकलं नव्हतं.
माणूस : लग्न झालं नसणार तुमचं. बरं, उंदीर ते उंदीर, पण आता उंदरांनी पुढच्या आठवड्यात आपल्या चिचुंद्र्याला फोन करून बोलावून घेतलंय. आता बायको म्हणणार चिचुंद्र्याला शांत झोप लागावी म्हणून तुम्ही हॉलमध्ये झोपणार का?
दुकानदार : काय प्रॉब्लेम आहे त्यात? झोपायचं हॉलमध्ये.
माणूस : काय झोपायचं? उंदरांना झोप येत नाही म्हणून ते हॉलमध्ये टीव्ही बघत बसतात उशीरापर्यंत, आणि शिवाय, जाऊदे. तुमचं लग्न झालेलं नाहीय ना…
दुकानदार : तुम्ही थोडे दिवस उंदरांच्या घरी राहून त्यांना असाच त्रास देऊन पहा मग.
माणूस : शक्य आहे का? त्या उंदरांच्या बिळात गेलं तर तिथली झुरळं मला छळछळ छळतात. मी आपला खिसाच रिकामा करायला आलो असावा असं समजून शॉपिंग, बाहेरचं खाणं सगळं माझ्या जीवावर करतात.
दुकानदार : मग आता? देऊ का रॅट पॉजझन? वापरून तर बघा…
माणूस : नको, उंदीर मेले नाहीत तर हॉस्पिटलचा खर्च माझ्याच बोकांडी बसेल.
दुकानदार : आणि मेले तर?
माणूस : मेले तर सांत्वनाला सगळे कृदंतवर्गीय प्राणी येऊन आठआठ दिवस माझ्याकडंच राहतील. नकोच ते.
दुकानदार : अहो, पण…
माणूस : (कळवळत) उंदरांच्या सगळ्या मुलींनी पटकन लग्न तर करून टाकावं. किमान हे दुःख विभागलं जाईल.
(आधारीत)



-ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment