Sunday 8 December 2019

आधी शिक्षण; मग लग्न

ही गोष्ट आहे लातूरच्या शेवंताची. ती अवघी १५ वर्षांची असताना तिच्या कुटुंबियांनी तिचा बालविवाह करायचं ठरवलं. पण कुटुंबियांची इच्छा धुडकावून लावत तिने लग्न करण्यास चक्क नकार दिला. तिच्या या बंडखोरीमुळे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांच्या प्रचंड टीकेचीही ती धनी झाली होती. अशातच दीपशिखाने मुलींना स्वावलंबी बनविण्यासाठी घेतलेल्या एका कार्यशाळेत शेवंता गेली. तिथं तिला जाणवलं की, एक स्त्री म्हणून आपल्यालाही काही मत आहे, अधिकार आहेत. याच कार्यशाळेत तिला स्त्रियांसाठी शिक्षणाचं महत्त्व किती आहे, याचीही जाणीव झाली. आपली अवस्था मोठ्या आपल्या मोठ्या बहिणीसारखी होऊ नये, असं तिला वारंवार वाटत होतं. शेवंताच्या मोठ्या बहिणीचा अगदी लहान वयातच कुटुंबियांनी विवाह लावून दिला. त्यामुळे तिचं शिक्षण अर्धवट राहीलं. पुढे लग्न होऊन गेल्यांनतर तर ती संसारात इतकी गुरफटली की, जणू तिच्या आयुष्यावर तिचा नव्हे तर इतरांचाच अधिकार होता. मोठ्या बहिणीचे लवकर लग्न झाल्याने ती तिच्या मनासारखे आयुष्य जगू शकत नसल्याची खंत शेवंतला अस्वस्थ करीत असे. आपल्याला मोठ्या बहिणीसारखे आयुष्य नको आहे, त्यामुळे आपण खूप शिकलं पाहिजे आणि स्वत:ला निर्णय घेता यायला हवे, हे ती दीपशिखाने घेतलेल्या कार्यशाळेत शिकली. वयाच्या १७ व्या वर्षी शेवंताला लातूरमधील मुलांसाठी काम करणाऱ्या एका गटाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मुलांच्या अधिकारांसाठी काम करताना तिने आपल्या कार्याचा ठसा सामाजिक क्षेत्रात उमटवला. घरची मंडळी मात्र हे सर्व सोड आणि लग्न कर, या मतावर ठाम होती. शेवंताने कुटुंबियांची समजूत घातली आणि आपण शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच कुटुंबियांनी निवडलेल्याच मुलाशी लग्न करू, असं सांगितलं.
शेवंताच्या २० व्या वाढदिवसानंतर लगेचच तिच्या कुटुंबियांनी तिच्याकडे लग्नसाठी तगादा लावला. पालकांनी शोधलेल्या अशा मुलाशी तिचा विवाह झाला की, ज्याच्या घरातील महिलांना स्वयंपाकघराबाहेरही काही जग असते याचीही कल्पना नव्हती. घरातील महिला, सुनांनी केवळ घरकाम आणि स्वयंपाक करायचा, घरात येणाऱ्या, जाणाऱ्यांचे आदरातिथ्य करायचं आणि आपला नवरा, मुलांची काळजी घ्यायची एवढीच परिभाषा त्यांना माहिती होती. स्वयंपाकघरातील पाककृतीशिवाय महिलांची मतं तिच्या सासरी विचारातही घेतली जात नव्हती. अशा कठीण परिस्थितीशी दोन हात करून शेवंताने आपल्या पतीसह सासू, सासरे आणि दोन नणंदांनाही स्त्रियांचे हक्क, त्यांनी कुटुंबियांसाठी नोकरी, व्यवसाय करून पैसे कमावणं, पुरूषांच्या बरोबरीने काम करणं गैर नाही, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी घरातील महिलांकडूनच तिला विरोध झाला. महिलांचे विश्व ’चूल आणि मूलं’ इतकेच मर्यादित आहे, असं तिला सांगण्यात आलं. पंरतु, तिने हार मानली नाही. स्त्रियांनाही स्वत:ची ओळख आहे. स्वयंपाकघरापलिकडेही त्यांचे विश्व आहे. त्याही पुरूषांप्रमाणे चरितार्थ चालविण्यासाठी अर्थाजन करू शकतात, या विचारांवर ती ठाम होती. त्यासाठी घराबाहेर न पडताही काम करता येणं शक्य आहे, हे तिने कुटुंबियांना पटवून दिलं. तिच्या जिद्दीपुढे पतीसह कुटुंबाने जरा नमतं घेतलं आणि तिच्या इच्छेप्रमाणे तिला स्वत:च्या मालकीचं किराणा दुकान सुरू करून दिलं. आज शेवंता २१ वर्षांची आहे. पण व्यवसायातील तिची प्रगती बघून तिची सासू आणि नणंदही तिच्याबरोबर काम करण्यास राजी झाल्या. इतकंच नव्हे तर आता शेवंताचे सासरेसुद्धा या तिघींना त्यांच्या कामामध्ये मदत करतात आणि व्यवसायातील हिशेबाचं कामही बघतात. 
खरंतर कोणतंही सामाजिक बंधन झुगारून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं हे महाकठीण काम आहे. परंतु, जेव्हा मुली शिकून कौशल्य प्राप्त करतात, तेव्हा कुटुंबातील मुलींवरची बंधनं आणि परंपरांचं जोखड आपोआपच सैल होतं. मुलींच्या शिक्षणाने केवळ एकच घर नाही तर तिचं माहेर आणि सासर अशा दोन कुटुंबांचा उद्धार होतो. शेवंताच्या बाबतीतही तेच घडले. ती शिकण्याच्या निर्धारावर ठाम राहिली. मनासारखं शिक्षण घेतल्यानंतरच तिने लग्न केलं. पण तिथे आलेल्या अडचणीही स्वत: विकसित केलेल्या कौशल्याच्या बळावर सोडवून ती आज यशस्वी झाली.
#नवीउमेद #नकोलगीनघाई


- नितीन पखाले

No comments:

Post a Comment