Sunday 8 December 2019

महाराष्ट्र १०० टक्के साक्षर व्हावा

सरकारकडून मुलांना काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेताना अर्थातच पुण्याबाहेरची मुलं काय विचार करतात, याकडे लक्ष द्यावंसं वाटलं. सोलापुरातील सरस्वती मंदिर संस्था संचालित सकुबाई हिराचंद नेमचंद (स.हि.ने.) प्रशालेतील उत्साही शिक्षक नागेश जाधव सरांच्या सहकार्याने त्यांच्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. नुकत्याच दहावीत गेलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी छान गप्पा झाल्या. त्यापैकी आज आपण नंदिनी जगदाळे आणि स्वराली पत्की या दोघींच्या मतांबद्दल जाणून घेऊया. 
दहावीत गेलेल्या नंदिनीचं स्वप्न आहे रेल्वे ड्रायव्हर होण्याचं. भारतातल्या पहिल्या लोकलच्या महिला चालक सुरेखा यादव यांच्याकडून प्रेरणा घेतली असल्याचं ती सांगते. महिला सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू शकतात, हे दाखवून देण्यासाठी नंदिनीला रेल्वे ड्रायव्हर व्हायचं आहे. त्यासाठी सोलापूरपासून दूर मुंबई किंवा इतरत्र कुठेही राहण्याची तिची तयारी आहे. नंदिनीच्या मते, तिच्यासारखी अनेक मुलं छोट्या शहरांतून मुंबई- दिल्लीसारख्या मोठ्या शहरात शिकण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी येतात. त्यापैकी काही विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. अशा गरीब परिस्थितीतील परीक्षा देणाऱ्या, होतकरू तरूण- तरूणींच्या निवास आणि भोजनाची रास्त दरात सरकारने किमान 22 व्या वर्षांपर्यंत सोय करायला हवी.
नंदिनीने आणखी एक अपेक्षा लहान मुलांच्या बाबत व्यक्त केली, ती म्हणते, "मी जेव्हा मुंबईला गेले होते, तेव्हा मी रेल्वे स्टेशनवर अनेक लहान मुलांना भीक मागताना किंवा बूटपॉलिश सारखी कामं करताना पाहिलं, मला वाईट वाटलं. शिकण्याच्या वयात असलेल्या या मुलांकडे कोण लक्ष देत असेल? त्यांना वाईट संगत लागली तर पूर्ण आयुष्याचे नुकसान होईल. त्यापेक्षा सरकार 18 वर्षे वयापर्यंतच्या अशा अनाथ मुलांसाठी निवारा, भोजन आणि शिक्षणाची व्यवस्था का करत नाही? सरकारने ते करावं, त्यातून या मुलांना बालकामगार व्हावं लागणार नाही आणि शिक्षणही मिळेल." 
त्यासोबतच नंदिनीने वयात येणाऱ्या मुलींना छेडछाडीला सामोरं जावं लागतं, याबद्दल वाईट वाटत असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, "असं काही घडलं की मुली घरी सांगायला सुद्धा घाबरतात. शाळेत जर एखाद्या चांगल्या शिक्षिकेला याबाबतचा संवाद साधण्यासाठी नेमलं तर निदान मुली मनातली व्यथा बोलून तरी दाखवतील. त्यातून त्या मुलीला काही धोका असेल तर ती वाचेल. शिवाय अशा प्रकारांना तोंड देण्यासाठी समुपदेशन तसेच स्वसंरक्षणासाठी ज्युडो-कराटे हे प्रत्येक शाळेत इयत्ता सहावीनंतर मुलींना आवर्जून शिकवले जावे."
तिची मैत्रीण स्वराली पत्की हिला भविष्यात शास्त्रीय नृत्यात करियर करायचं आहे. स्वराली सध्या भरतनाट्यम शिकत असून तिच्या चार परीक्षा झालेल्या आहेत. ती म्हणते, "मला एक गोष्ट फार खटकते, आपल्याकडे फक्त अभ्यासाच्या विषयांनाच महत्त्व आहे. नृत्य-नाट्य- अभिनय इ. कलांना आपल्या शिक्षण व्यवस्थेत पुरेसे स्थान नाही. भारताला कलांचा समृद्ध वारसा आहे, या कलांचा सुद्धा शैक्षणिक जीवनात समावेश केला तर विद्यार्थ्यांचे मन चांगल्या कलेत रमेल. माझ्यासारख्या ज्या व्क्तीला त्याच्यात करियर करायचे आहे, त्यांचा पाया पक्का होईल. मला पुढे जाऊन बंगळुरूमधील रेवा विद्यापीठात नृत्यकलेचे शिक्षण घ्यायचे आहे. सोलापुरात आजही नृत्याचे संपूर्ण प्रशिक्षण मिळेल अशी संस्था नही, त्यामुळे शिकल्यानंतर मला सोलापुरात असे एखादे गुरूकुल उभारायला आवडेल. प्रत्येक जण डॉक्टर- इंजिनिअर होऊ शकत नाही, बाकीच्या गोष्टीही आयुष्यात महत्त्वाच्या असतात, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे."
स्वरालीने आणखी एक चांगला मुद्दा मांडला तो असा की, "शाळेत आम्हांला जसा इतिहास शिकवतात, तश्याच जगात, भारतात, महाराष्ट्रात घडत असणाऱ्या चालू घडामोडींबद्दल का शिकवत नाहीत? वर्तमानकाळात काय चालू आहे, ते जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हा अभ्यासक्रमातील बदल सरकारने घडवून आणावा, असे मला वाटते. तसंच महाराष्ट्रही केरळप्रमाणे 100 टक्के साक्षर व्हावा, अशी माझी येणाऱ्या सरकारकडून अपेक्षा आहे. आई-वडील शिकलेले असतील तर मुलांच्या आयुष्यात फरक पडतो असे मला वाटते. त्यामुळे निरक्षर प्रौढांना शिकविण्याचा रात्रशाळांसारखा उपक्रम सरकारने हाती घ्यावा, अशी माझी विनंती आहे."
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे.

No comments:

Post a Comment