Sunday 8 December 2019

शेतकऱ्यांनाही हवी पेन्शन (जरा माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या...)

पुणे आणि पिंपरी- चिंचवडला जोडणाऱ्या औंधच्या पुलाजवळ 'फक्त 25 रुपयांत शहाळे' अशी पाटी घेऊन एखादा मुलगा कायम उभा असतो. पूल संपला की डाव्या बाजूला फुटपाथवर त्यांचा शहाळ्याचा स्टॉल आहे. सकाळी 11 पासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत शहाळ्यांची विक्री चालूच असते. या शहाळ्याच्या स्टॉलवर दोन शाळकरी वाटतीलशी मुलं उन्हातान्हात शहाळी विकत बसलेली असतात. ही मुलं नेमकी कुठून आली असतील? यांचं शिक्षण झालं असेल का? असे प्रश्न डोक्यात घेऊन मी त्यांच्या स्टॉलवर पोहोचले. 
शहाळं घेतलं आणि मग जरा गिऱ्हाईक कमी झालं की, त्यांच्याशी बोलणं सुरू केलं. ही दोघं मुलं मूळची लातूरची आहेत. शंकर बिराजदारची बारावी झालीये आणि नागेश बिराजदारची दहावी झालीये. सुट्टीत चार पैसे कमवावे म्हणून आपल्या दूरच्या मामाच्या, शहाळ्याच्या स्टॉलवर ही मुलं कामासाठी आली आहेत. दोघांची वयं साधारण 15-16 ते 17-18 असावीत. शंकरच्या घरी शेती आहे, नागेशचे वडील दुसऱ्याच्या शेतावर कामाला जातात. लातूरच्या निलंगा तालुक्यातून हे आलेले आहेत. 
"तुम्हांला पुढं शिकावंसं वाटत नाही का? सुट्टी संपली आता पुढे काय करणार?" शंकरनं उत्तर दिलं, "ताई मला आयटीआयला जायचंय, बारावीला 56 टक्के पडलेत. आता परत लातूरला जाणार, पण इकडे पैसा मिळतो, ते बरं वाटतं." नागेशला पुढं शिकण्याची फारशी उत्सुकता नव्हती. "दहावी पास झालो, लय झालं. आता पैसा कमवायचा फकस्त. शहाळ्याचा स्टॉल टाकेन स्वत:चा किंवा मग नीरा- लिंबू सरबत असं काहीतरी. मला अभ्यास आवडत नाही, गरिबाला शिकून परवडतंय कुठे? जगायला पैसा लागतो, असा काही उद्योग सुरू करायला सरकार पैसा पुरवेल का?" त्याने मलाच प्रश्न विचारला. घरची शेती पुढे करायची इच्छा आहे का असं विचारल्यावर शंकर म्हणाला, "कुठल्याच बापाला आजकाल वाटत नाही की, आपल्या पोरानं शेती करावी, शेतीची हालत लय बेकार झालीया. लातुरात पाणी नाही. घरचं शेत टाकवणार नाही, कधी ना कधी शेती करावीच लागंल, पण सरकारने मराठवाड्यासाठी पाण्याची काहीतरी व्यवस्था करावी. पाण्याविना माणसं आणि जित्राबं दोन्ही मरायलेत."
तिथून मी पुढे आले वाकडला, वाकडच्या माऊली चौकाजवळ एक छोटीशी चौपाटी आहे. तिथं श्रेयस नावाचा एक चायनिज आणि कबाबचा स्टॉल आहे. तिथल्या मुलाशी मी संवाद साधायला सुरूवात केली. त्याचं नाव राजेश मंडल, मूळचा झारखंडमधल्या देवघर जिल्ह्यातला आहे. गेल्या वर्षभरापासून तो पुण्यात आहे. त्याच्याही घरची झारखंडमध्ये थोडीशी शेती आहे. आई-वडील अशिक्षित आहे, शेती पाहतात. त्याला दोन लहान भाऊ आहेत. शेतीच्या उत्पन्नात भागेना म्हणून तो वर्षभरापूर्वी पुण्यात आला. इथल्या त्याच्या तळेगावच्या नातलगांकडे राहून चायनिज, कबाब बनवायला शिकला. आता एका मराठी मालकाच्या स्टॉलवर राजेश काम करतो.
मी त्याला विचारलं, "पुणे में अच्छा लगता है या गांव की याद आती है?" राजेश म्हणाला, "गांव की याद तो आती ही है, वहां पे सब घरवाले जो है, पर वहां पे पैसा नही मिलता| सिर्फ खेती में से गुजारा नही हो सकता| यहां पुणे में थोडा अच्छा पैसा कमा लेता हूं, घर को भी भेज सकता हूं, तो अच्छा लगता है|" मी त्याला विचारलं, "कितनी पढाई की है, सरकार से क्या चाहते हो?" तर राजेश म्हणाला, "दीदी, मेरी दसवी तक पढाई हुई है| गर्वन्मेंट स्कूल में पढा तो फीज नही देनी पडती थी, पर कालेज के लिए पैसा लगता है, वो पढाई करके भी नौकरी मिलने की कौनो उम्मीद नही| इसलिए मैं यहां कमाने के लिए आया हूं| पर मुझे मेरे दो छोटे भाईयों को अच्छे से पढाना है|"
पुढे तो म्हणाला, "पुणे की तरक्की देखता हूं, तो अच्छा लगता है| मैं चाहता हूं हमारा झारखंड भी तरक्की करे, वहां पे भी बहुत सारी नौकरीया और इंडस्ट्री होगी, तो हमे अपना घर छोडके इतनी दूर नही आना पडेगा| सरकार झारखंड के विकास के लिए कुछ करे, और हां खेती के लिए भी अगर किसानों को बीज अच्छा और सस्ता मिले, अच्छी खाद मिले, पानी की पाईपलाईन मुफ्त मिले तो खेती में कुछ मुनाफा हो सकता है| मुझे तो कभी-कभी खयाल आता है, जैसे नौकरी करनेवालों को पेन्शन होती है वैसे किसानों को पेन्शन क्यू नही होती? वो तो देश का पेट पालते है" आणि राजेश गप्प झाला.
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे 
#नवीउमेद #मुलांचाजाहिरनामा #विधानसभानिवडणूक19 #voteforme
Swati Mohapatra UNICEF India Snehal Bansode Sheludkar

No comments:

Post a Comment