Sunday 8 December 2019

उत्खनन (इतिहासात डोकावताना भाग ७)

हडप्पा म्हणजे कुठलीतरी जुनी संस्कृती ह्या पलीकडे मुलांना त्यातून विशेष काही अर्थबोध होत नसल्याचं आपण मागच्या एका लेखात बघितलं. एखादं गाव जमिनीखाली गाडलं जातं म्हणजे नेमकं काय होतं, कशामुळे होतं, ते आपल्याला चालू काळात कसं समजतं, पुरातत्त्व शास्त्रज्ञ ते कसं शोधून काढतात ह्यापैकी काहीच माहीत होत नसल्यामुळे मुलं फक्त बावचळून जातात. मग आता ही जमिनीखालची गावं मुलांना कशी बरं दाखवता येतील, त्यांना तो अनुभव कसा देता येईल असा विचार करताना मला एक कल्पना सुचली. ती अशी की जर आपणच एखादं लुटुपुटुचं उत्खनन मुलांसाठी घडवून आणलं तर काय मजा येईल! 
ही कल्पना डोक्यात यायला आणि ती प्रत्यक्षात घडायला मात्र बराच काळ जायला लागला. काही शाळांना ही कल्पना आवडली तरी ती प्रत्यक्षात आणायला मात्र नानाविध अडचणी यायच्या. आणि ती कल्पना नुसतीच कल्पना म्हणून डोक्यात होती. ती प्रत्यक्षात यायला २०१८ उजाडावं लागलं. साधारण दीड एक वर्षापूर्वी मी ‘सकल ललित कलाघर’ या पुण्यातील संस्थेशी जोडली गेले. ही संस्था ललित कलेसंदर्भात अनेक उपक्रम करते. त्यातलाच एक म्हणजे शालेय मुलं आणि शिक्षक ह्यांच्यासाठी विविध कार्यशाळा घेणे. ह्या कार्यशाळांचं वैशिष्ट्य असं की, ह्या कार्यशाळा विविध ललित कला आणि इतिहास, भूगोल, गणित अशा विषयांना एकमेकांशी जोडून तयार केलेल्या असतात. कार्यशाळांचा हा सगळा पसारा माधुरी पुरंदरे सांभाळतात. तर गेल्या वर्षी कधीतरी मी माधुरी ताईंना ही उत्खननाची कल्पना बोलून दाखवली आणि ती त्यांनी त्वरित उचलून धरली. मग काय, लागलो आम्ही दोघी कामाला. आमच्या बरोबर डॉ अभिजित दांडेकर हे पुरातत्वशास्त्रज्ञ देखील सामील झाले. 
संस्थेच्या आवारातील एक जागा आम्ही ह्या उत्खननानासाठी निश्चित केली. मग जेसीबी बोलावून त्या जागेवर पाच फूट लांब, पाच फूट रुंद आणि दहा फूट खोल असा एक खड्डा खणून घेतला. मी आणि माधुरी ताईंनी मिळून हडप्पा आणि मोहंजोदारो येथील उत्खननामध्ये मिळालेल्या वस्तूंच्या प्रतिकृती मातीमध्ये बनवल्या. मणी, भांडी, लहान लहान शिल्पं!! मग हे सगळं आम्ही त्या खड्ड्यात पुरलं. अभिजित दांडेकर ह्यांनी त्या खड्ड्यात एक विटांची भिंत तयार केली. कोपऱ्यात एक चूल तयार केली आणि मग ह्या सगळ्यावर आम्ही एक मातीचा थर पसरवून टाकला. आणि झाली आमची उत्खननाची साईट तयार. 
सगळीच मुलं ह्या कार्यशाळेची कमालीची उत्सुकतेने वर्षभर वाट बघत होती आणि शेवटी तो दिवस उजाडला. मुलं ठरलेल्या वेळी कलाघरात हजर झाली. 
सुरवातीला अभिजित सरांनी त्यांना गाव जमिनीखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, उत्खनन कसं करतात, उत्खननात काय काय सापडतं ह्या सगळ्याबद्दल सचित्र माहिती सांगितली. आणि मग मुलं सरांबरोबर खड्डय्यात उतरली. सुरवातीला नुसती गडबड आणि गलका सुरू होता. जरा एखादा मणी, एखादं खापर दिसलं की मुलं ते खेचून बाहेर काढत होती. परंतु मग हे असं घाई घाई करून जमिनीतून काही काढायचं नसतं, ते तसं का काढायचं नसतं हे सांगितल्यावर मात्र सगळीच मुलं जपून आणि नाजूक हातानी काम करायला लागली. आणि मग जश्या एक एक वस्तू त्यांना उत्खननात सापडायला लागल्या तसतसा त्यांचा आनंद आणि उत्साह वाढत चालला होता. काही वेळानंतर मग मी त्यांना उत्खननात मिळालेल्या गोष्टींचं वर्गीकरण करायला शिकवलं. ते तसं का करायचं, मिळालेल्या वस्तूंचा अभ्यास कसा करायचा, इतर कोणकोणते शास्त्रज्ञ त्या कामात सहभागी होतात अशा अनेक मुद्य्यांवर आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्या. उत्खननाच्या जागेजवळ आम्ही दोन छोटे तंबू लावले होते. तिथं बसून काही मुलांनी उत्खननात मिळालेल्या खापरांना चिकटवून त्यांचं एक अखंड भांडं बनवलं. काहींनी मिळालेल्या गोष्टींना पिशवीत भरून त्यावर नीट नोंदी केल्या. 
कार्यशाळेचे तीन तास ह्या सगळ्यामध्ये कसे संपले कोणालाच कळलं नाही. एकूण खूपच मस्त अनुभव होता. ह्या मुलांसाठी तर होताच परंतु आमच्यासाठी देखील होता. मुलांचे भन्नाट प्रश्न, कुतूहल आणि त्यांचा उत्साह बघून आम्ही पुढच्या कार्यशाळेसाठी अधिक जोमाने सज्ज झालो. 
- डॉ. अनघा भट

No comments:

Post a Comment