Sunday 8 December 2019

गुहा आणि चित्रे (इतिहासात डोकावताना)

मागच्या एका लेखात आपण मुलांनी गुहाचित्रं वाचून त्यावर गोष्टी लिहिल्याचं बघितलं. चित्रांच्या मार्फत इतिहास शिकता येईल का हे बघण्याचा तो एक लहानसा प्रयोग होता. सकल ललित कलाघराशी जोडलं गेल्यानंतर गुहाचित्रं हाच विषय घेऊन माधुरी ताई आणि मी एक थोडासा वेगळा प्रयोग करून बघायचं ठरवलं. मुलांना इतिहासामार्फत चित्रकलेचा अनुभव घेता येईल का असा विचार त्यामागे होता. हजारो वर्षांपूर्वी गुहेत चित्रं काढताना आजच्यासारखे दिवे नसायचे, आज आपण सहज वापरतो ते विविध प्रकारचे रंग नसायचे आणि तरी देखील ही चित्रं हजारो वर्ष टिकून राहिलीयेत हे मुलांपर्यंत पोहचवायचा हा एक छोटासा प्रयत्न होता 
पुण्यातील खेळघर ह्या संस्थेमधील काही मुलांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. ही संस्था झोपडवस्तीमधील मुलांसाठी काम करते. विविध रंजक पद्धतींनी विविध विषयांची ओळख ह्या मुलांना करून देणं, जेणेकरून ही मुलं शिक्षणापासून दूर पळणार नाहीत हा ह्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. 
कार्यशाळेची सुरवात करताना मी मुलांशी गुहाचित्रं ह्या विषयावर खूप गप्पा मारल्या. त्यांना जगभरात गुहेत सापडणारी अनेक चित्रं दाखवली. माणसाने चित्रं का काढली असावीत , कशी काढली असावीत, कशाकशाची काढली आहेत ह्या सगळ्याबद्दल एक मस्त चर्चा झाली. भिमबेटका ह्या मध्यप्रदेशमधील गुहांमधली चित्रं दाखवली. ती गुहा सापडली कशी, तिथे विविध अभ्यासकांनी कसा आणि काय अभ्यास केला, तिथे कोणती चित्रं आहेत, चित्रांचे विषय काय काय आहेत अशा असंख्य मुद्य्यांवर आम्ही बोलत होतो. काही चित्रं मुलांनी एकत्र वाचायचा प्रयत्न केला. चित्रात दाखवलेले प्राणी ओळखण्याचा एक कार्यक्रम झाला. आणि मग, मुलांना आम्ही घेऊन गेलो त्यांच्यासाठी बनवलेल्या खास गुहेमध्ये! गुहा म्हणजे काय तर, कलाघरात एक कमी उंचीचं गोडाऊन आहे. तिथली जागा स्वच्छ करून घेऊन तिथे आम्ही मेणबत्त्या, छोटे दिवे लावले होते. मुलांना गेरू आणि कोळशाची भुकटी हे साहित्य दिलं होतं. माधुरी ताईंनी मग मुलांना गुहेच्या भिंतींवर चित्रं काढायला सांगितली. मुलांना स्वतःला काय काढावंसं वाटतंय त्या विषयांवर. कोणताही ठोस असा विषय नव्हता सांगितला आम्ही मुलांना. माधुरी ताई मुलांना चित्र रंगवायच्या विविध पद्धती समजावून सांगत होत्या, करून दाखवत होत्या. मुलं देखील असंख्य प्रश्न विचारत होती. अडेल तिथे माधुरी ताईंची आणि माझी मदत घेत होती. जोरदार कामाला लागली होती सगळी मुलं आणि मग थोड्याच वेळात विविध चित्रांनी आमचं गोडाऊनच्या भिंती भरून गेल्या! ll9ll
- डॉ.अनघा भट

No comments:

Post a Comment