Sunday 8 December 2019

जानकाची गोष्ट

जानका, वय २५. सध्या लातूर जिल्ह्यातील कलम इथं राहते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. जानका १६ वर्षांची असातना कलम या गावाच्या ग्राम पंचायतीद्वारे तिची ‘दीपशिखा’साठी निवड झाली होती.
जानकाच्या कुटुंबामध्ये आठ बहिणी, एक भाऊ आणि तिचे आई-वडील आहेत. त्यांच्याकडे फक्त एक एकर जमीन आहे. त्यामुळे जानका आणि तिच्या बहिणी लोकांच्या घरी, शेतावर वगैरे मजुरीची कामे करत असत. शिक्षणाच्या ज्वलंत इच्छेबरोबर एकीकडे कठोर कष्ट हे तिचं अनेक दिवस वेळापत्रक होतं.
दीपशिखासाठी निवड झाल्यानंतर, जानकाला युनिसेफद्वारे आयोजित करण्यात आलेलं १० दिवसांचं प्रशिक्षण मिळालं. यात जीवनकौशल्ये, निर्णय घेण्याच्या क्षमता, संशोधनाचा कल, संभाषण कौशल्यं आणि तणावाचं व्यवस्थापन यावरील धड्यांचा समावेश होता. प्रशिक्षणामुळे जानकाचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. तिला स्वतःची किंमत समजली आणि इतर मुलींसंबंधीचे प्रश्न तिच्या लक्षात येऊ लागले.
प्रशिक्षणानंतर तिने तिच्या गावातील सर्व मुलींना एकत्र केलं. तिने त्यांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती दिली. तिला प्रशिक्षणादरम्यान मिळालेले ज्ञान तिने इतर मुलींना दिलं. तसंच तिने अनेक गोष्टींना सुरुवात केली, उदाहरणार्थ; तिने मुलींसाठी बचतगट सुरू केला. पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्यानेदेखील त्यासाठी २००० रुपये दिले. 
अंगणवाडी ताईंच्या मदतीने सर्व मुलींच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. बऱ्याच मुलींचे हिमोग्लोबिन ७.५-९ यादरम्यान होते, तेव्हा त्यांना सकस आहाराविषयी सांगण्यात आलं आणि त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी गोळ्या लिहून देण्यात आल्या. जानकाने मुलींमध्येच समित्या स्थापन केल्या. 
शाळेची तक्रार निवारण समिती आणि पर्यावरण समितीसारख्या समित्या स्थापन करण्यात आल्या, त्यासाठी जानकाला मुलींचा पाठिंबा मिळाला. 
जानकाने स्वतःच्या आणि बहिणींच्या बालविवाहाला आक्षेप घेतला आणि बालविवाहाचे अवगुण त्यांना समजावून सांगत त्याविरोधात पालकांचं मन वळवलं. तिने बालविवाहाविरोधात लढा दिला आणि पालकांना स्वतःचं शिक्षण पुढे सुरू ठेवू देण्यासाठी राजी केलं. तिचं हे सर्वात ठळक यश होतं आणि आता ती “बालविवाहाविरोधातील लढवय्यी” म्हणून ओळखली जाते. 
तिने तिच्या गावाच्या ग्रामसभेत सहभाग घेतला आणि महिला व मुलींविषयी संबंधित मुद्द्यांवर निर्भयपणे प्रश्न विचारले.
गरिबीमुळे जानकाच्या शिक्षणात दहावीनंतर ४ वर्षांचा खंड पडला. त्यानंतर तिने बीए केले आणि पॅरागॉन या एका युरोपीयन नागरिकाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या आधारावर एमपीएससी परीक्षांसाठी तयारी करत आहे. त्याच मदतीतून जानका पोलीस पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करत आहे. ही दीपशिखा अशीच सतत तळपत राहो.

- सुजाता शिर्के
#नवीउमेद #नकोलगीनघाई

No comments:

Post a Comment