Sunday 8 December 2019

महिलांनी साधला गावाचा विकास


मंत्री, नेते, सरकारी अधिकारी सगळेच जण या ग्रामपंचायत परिसरात शिरले की इथली वृक्षसंपदा पाहून अचंबित होतात. पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत परिसरात गेल्या काही वर्षात सुमारे १२ हजार विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यापैकी ११ हजार ७०० झाडं जगली आहेत. वृक्षारोपणातून केवळ पर्यावरणाचेच संवर्धन नव्हे तर विविध वृक्षांची लागवड करुन त्यापासून मिळणारा उत्पन्नातून गावाचा विकास केला जात आहे . 
सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी शहादा तालुक्याच्या पूर्व भागातील ही पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत. लोकसंख्या २,१०७. अवघ्या तीन वर्षापूर्वी गावाला महसुली दर्जा मिळाला आणि ग्रामपंचायत स्थापन झाली. गेली १५ वर्ष गावाचा संपूर्ण कारभार महिलाच चालवत आहेत. आपण समाजाचं देणं लागतो, ही या ग्रामपंचायतीतल्या सर्वांची भावना. 
ग्रामपंचायतीकडे पडीक जागा होती. या पडीक माळरानावर ग्रामपंचायतीनं नर्सरी फुलवली. परिसरात कुपोषणाचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यासाठी तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीनं नर्सरीत शेवगा रोपांची जोपासना सुरू केली . किमान एक लाखापेक्षा अधिक रोपांची निर्मिती. गावातल्या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात शेवग्याचा समावेश. त्याचा उपयोग दिसून आल्यावर इतर ग्रामपंचायतींनाही शेवग्याची रोपं विनामूल्य देण्याचं पुरुषोत्तमनगरनं ठरवलं आहे . या वर्षापासून संपूर्ण जिल्ह्यात तर आगामी वर्षापासून सर्वाधिक कुपोषित गडचिरोली , चंद्रपूर , भंडारा आणि पालघर या जिल्हांनाही रोपं देण्याचं ग्रामपंचायतीचं ध्येय आहे . बोर, आवळा आणि इतर फळं, पालेभाज्या यांच्या लागवडीतूनही ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत आहे . गावाला लागणारा संपूर्ण भाजीपाला ग्रामपंचायतीतच सेंद्रीय पध्दतीनं पिकविला जातो . त्याची विक्री गावातच केली जाते .



ग्रामपंचयतीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. गाव कचरामुक्त. पंचायतीनं स्वखर्चानं प्रत्येक घराला ओला आणि सुका कचरा जमा करण्यासाठी डबे दिले आहेत . दररोज कचऱ्याचं वर्गीकरण. यातून ग्रामपंचायत गांडुळखत प्रकल्प राबवते. . वृक्षसंवर्धनासाठी सर्वाधिक वापर या खतांचा केला जातो . 
ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावात सीसीटीव्ही यंत्रणा. सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंदिस्त गटारी. काही मोकळ्या जागांवर कृत्रिम हौदांची निर्माती करून त्यात गप्पी मासे सोडण्यात आले आहेत . यामुळे परिसरातील डासांचे साम्राज्य अत्यल्प. अत्यल्पदरात फिल्टरपाण्याची सुविधाही. गावात तंटामुक्ती समिती कार्यरत असून गावातील किरकोळ तंटे भांडणे गावातच सोडवले जातात. सार्वजनिक सण एकोप्यानं साजरे केले जातात .
गावांत मुलगी जन्मास आल्यावर उत्सव साजरा केला जातो. गावकऱ्यांसह महिलांना दररोज व्यायामासाठी अद्यावत व्यायामशाळा. गाव १०० टक्के व्यसनमुक्त. ९२% साक्षरता. गावात विनामुल्य वाचनालय. संपूर्ण गावात मोफत वाय-फाय सुविधा. 
ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच ज्योतीबेन पांडुरंग पाटील , उपसरपंच ममता फुलसिंग जाधव, ग्रामसेवक शरद एकनाथ पाटील . ग्रा. पं. सदस्या रंजना राजेश पटेल , आरती सुनिल चौधरी , वंदना नरेश चव्हाण , संगिता शरद पाटील , मनिषा सुरेश मराठे . कल्पना भगवान चौधरी , रामाबाई बन्सीलाल पावरा, कर्मचारी अभिमन पंडीत निकुम पाहत आहेत. सातपुडा साखर कारखान्याने कार्यकारी संचालक पी.आर.पाटील यांचं मार्गदर्शन ग्रामपंचायतीला आहे . 
' निर्मलग्राम ', ' पर्यावरण विकास रत्न ', यासह अनेक पुरस्कार गावाला मिळाले आहेत.
#नवीउमेद #नंदुरबार #सातपुडा



- रुपेश जाधव, नंदुरबार

No comments:

Post a Comment