Sunday 8 December 2019

शाळेपासूनच स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत, जरा माझं म्हणण्याकडे लक्ष द्या (भाग २)

तेव्हा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागलेला होता. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आगामी सरकारकडून काय अपेक्षा असतील, या उत्सुकतेने मी पुण्यातील शिवाजी नगरच्या बोर्डाच्या ऑफिसच्या आवारात शिरले. पास- नापास झालेले अनेक विद्यार्थी तिथे हिंडत होते, कुणी पालकांसोबत होतं तर कुणी मित्र-मैत्रिणींसोबत. एका पार्क केलेल्या दुचाकीवर दोन मुलगे आणि एक मुलगी गप्पा मारत बसली होती. मी तिथं गेले, माझी ओळख वगैरे सांगितली आणि नुकतीच दहावीची परीक्षा पास झालेले आणि आता कॉलेजात प्रवेश करणारे तरूण म्हणून तुमच्या सरकारकडून अपेक्षा काय आहेत असं विचारलं. माझा प्रश्न ऐकून त्यांच्यातल्या मुलीला हसूच फुटलं, "आम्हांला आत्तापर्यंत कुणी असले प्रश्न वगैरे विचारले नाहीत, आमच्यापर्यंत कुणी पत्रकार येईल वगैरे असं वाटलं नव्हतं, आम्ही तर लहान आहोत अजून." मी तिला मनसोक्त हसू दिलं आणि म्हणाले, "तू पहिल्यांदा असा अनुभव घेते आहेस. म्हणून गंमत वाटत असेल कदाचित, पण आता तुम्ही लहान-मोठेपणाच्या उंबरठ्यावर उभे आहात. दोनेक वर्षात तुम्हांला मतदानाचा अधिकार मिळेल, त्यामुळे सरकार काय असतं, त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा असाव्यात यावर आता विचार सुरू करायला हवा अशी ही वेळ आहे."
मग हळूहळू या मुलांना माझं म्हणणं पटलं. दापोडीत राहणारे भालचिम कुटुंबातील हे भाऊ आणि बहीण. केतकी आणि केतन सख्खे बहीण-भाऊ तर दीपक भालचिम त्यांचा चुलत भाऊ. या तिघांनीही नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून, केतकी आणि दीपक पास झाले आहेत, तर केतन मात्र नापास झालेला आहे. मी गेल्यापासून केतन तसा शांत-शांतच होता. मला असंही कळलं, की केतकी आणि केतनच्या वडिलांचे पाच महिन्यांपूर्वी अचानक निधन झालं आहे. त्यांचे वडील बोपखेलच्या अॅम्युनिशन फॅक्टरीत कामगार म्हणून कामाला होते. केतन गणितात नापास झालेला असून तो पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज द्यायला बोर्ड ऑफिसमध्ये आलेला होता. 
मी केतनपासूनच बोलायला सुरूवात केली, म्हणलं "नापास झालास तर निराश नको होऊस, नापास झाल्यानं आयुष्य संपत नसतं. ऑक्टोबरमध्ये पुन्हा पेपर दे, चार महिन्यात पास होशील तू. आता पुढं काय करायचं ठरवलं आहेस?" मग केतन बोलायला लागला, "छ्या, निराश बिराश काही नाही झालो मी. रिचेकिंगला पेपर देतोय, पास झालो तर ठीक नाहीतर ऑक्टोबरचा फॉर्म. आता वडिलांच्या जागी कामाला लागणार आणि बाहेरुन अकरावी बारावीची परीक्षा देणार." मला त्याचं बोलणं ऐकून बरं वाटलं, "तुझ्यासारख्या कुटुंबातील मुलांवर अशी अकाली जबाबदारी पडते, अशा आर्थिकदृष्ट्या थोड्या मागे असलेल्या कुटुंबाबाबत सरकारने काय करावं असं वाटतं?" यावर "छ्या आपल्याला नको मदत-बिदत. मी एकटा पुरेसा आहे माझं कुटुंब चालवायला. माझ्यात तेवढी ताकद आहे." असं म्हणून केतन आतल्या ऑफिसमध्ये निघूनच गेला.
त्याची बहीण केतकी म्हणाली, "ताई, वाईट वाटून घेऊ नका, कधी-कधी तो असं वागतो डोक्यात वारं गेल्यासारखं. आमच्या कुटुंबाची परिस्थिती तशी खाऊन-पिऊन ठीकठाक आहे. माझ्या एका बहिणीचं आयटीआय झालंय, ती नोकरीला जाते. आता केतनलाही नोकरीत घेणार आहेत, त्यामुळे असं बोलला तो. पण ज्यांच्या कुटुंबात कमावती व्यक्ती नाही, अशा एकट्या बाईला आणि तिच्या पोरांना सरकारने थोडी तरी मदत द्यायला हवी, असं मला वाटतं." ती पुढे बोलत होती, "पण मला सरकारकडून जी अपेक्षा आहे, ती वेगळीच आहे. मला पुढं शिकायचं आहे, कामही करायचं आहे. रात्री-बेरात्री घराबाहेर जावं लागेल. कुणी कधी छेड काढली, त्रास दिला तर त्याच्याशी कसं लढायचं हे आम्हांला शाळेपासूनच शिकवायला हवं. स्वसंरक्षणाचे धडे, ज्युडो-कराटे हे गणित- मराठीइतकंच कंपल्सरी असायला हवं. शिवाय आजकाल लहान मुलींसोबत बलात्काराच्या घटना फार ऐकू येतात, त्यांना लवकर न्याय मिळावा आणि दोषींना फाशीचीच शिक्षा सरकारने द्यावी असं मला वाटतं." 
त्यानंतर दीपक म्हणाला, "मलापण पुढं शिकायचं आहे. सगळ्यात मोठी काळजी नोकरीची वाटते. आजकाल लोक भरपूर शिकतात, मी काही जास्त हुशार नाही, खूप पैसेवाला पण नाही त्यामुळे फारफार पंधरावीपर्यंत शिकेन. पण सरकारने जर व्यावसायिक कौशल्ये विकसित करणारा अभ्यासक्रम आणला तर बरं होईल. एवढ्या मोठ्या देशात प्रत्येकाला नोकरी नाही मिळू शकत, जगायला तर पैसा लागतोच. पैसा मिळवायचा असेल तर असं काहीतरी कौशल्य शिकवा, ज्यातून कमी भांडवलात माझ्यासारखी मुलं व्यवसाय सुरू करू शकतील. गरज पडल्यास अशा नवीन व्यावसायिकांना सरकारने बिनव्याजी कर्जही द्यावं." एवढे बोलून केतकी आणि दीपकही केतनला भेटायला आत ऑफिसमध्ये गेले. पण या मुलांनी स्वत:चा फोटो घेऊ देण्यास मात्र नकार दिला.
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे.
#नवीउमेद #voteforme #विधानसभानिवडणूक19 #मुलांचाजाहिरनामा
Swati Mohapatra UNICEF India Snehal Bansode Sheludkar

No comments:

Post a Comment