Sunday 8 December 2019

बाजूला १२ मजली इमारत उभी राहिली असताना सुरेश यांनी जोपासली आहे आपली शेती

 पुण्यातल्या पाषाणमधल्या एका इमारतीत एक माकड येई. अतिशय रागीट असं हे माकड सर्वाना त्रास देई. वनखात्याकडे तक्रार करूनही उपयोग होत नव्हता. माकडण्याच्या तिथे येण्यामागचं, वागण्यामागचं कारण केवळ एका व्यक्तीलाच समजू शकलं. सुरेश ससार यांना. बाजूला असलेल्या राष्ट्रीय संशोधन संस्थेत प्रयोगासाठी काही काळ मादी आणली होती. विणीच्या काळात माकडीण विशिष्ठ गंध सोडते. त्या गंधाकडे आकर्षित होऊन माकडही परिसरात आलं होतं मात्र माकडीण पिंजऱ्यात असल्यामुळे माकडाला तिच्याजवळ जाता येत नव्हतं. त्यामुळे ते रागीट झालं होतं. मग हळूहळू माकडाला खायला घालून, शांत करून त्याला जंगलात पाठवण्यात आलं. सुरेश ससार प्रणितज्ज्ञ नाहीत पण निसर्गाबद्दलचं प्रेम, त्यातून केलेला अभ्यास यामुळे त्यांना या गोष्टी उमजल्या. पुणे जिल्हा वन्य प्राणी आणि सर्परक्षक संघटना, या संघटनेच्या संस्थापकांपैकी सुरेश एक. सुसगाव किंवा पाषाणमध्ये कुणाच्या घरी,शाळेत,इमारतीत साप सापडला तर पहिला फोन सुरेश यांना. सापांबद्दल जागृती ते करतात.
सुरेश पुण्यातल्या सुसगावचे शेतकरी. या परिसराचंही शहरीकरण होत आहे. बाजूला १२ मजली इमारत उभी राहिली असताना सुरेश यांनी मात्र आपली बालपणापासूनची जमीन जोपासली आहे. गेली पाच वर्ष ते दोन एकर जमिनीवर झिरो बजेट नैसर्गिक शेती करत आहेत. शेताच्या आजूबाजूला जवळपास ३५ झाडं. ''ज्या झाडांच्या अंगाखांद्यावर वाढलो, त्यांना कसं तोडणार?'' सुरेश विचारतात. घरात दोन देशी गाई आणि दोन बैल. 
साधारण दहा वर्षापूर्वी कोंडवा इथं सुभाष पाळेकर गुरुजींचा नैसर्गिक शेतीवरच्या कार्यक्रमात त्यांची ‘वसुंधरा स्वच्छता अभियान’ गटाशी ओळख झाली. हा गट बाणेर-पाषाण इथल्या टेकड्यांवर झाडं लावतो. .सुरेश आठवड्यातून अनेकदा पाणी घालण्यासाठी सकाळी या टेकड्यांवर जातात. अतिक्रमणातून आग लावण्याचे प्रकार घडतात तेव्हा संरक्षक पोशाख न घालता,कुठल्याही वेळी सुरेश आग विझवण्यासाठी एकटे जातात आणि झाडं वाचवतात. 
आपले किल्ले हा आपला वारसा. त्यांच्या संवर्धनासाठी शिखर फाउंडेशन संस्थेत सभासद म्हणून काम पाहात ते अनेक ट्रेक्सला जातात,मार्गदर्शन करतात.

-संतोष बोबडे

No comments:

Post a Comment