Sunday 8 December 2019

मदतीचा एक व्हॉट्स अप संदेश

नाशिकमधलं रचना विद्यालय. विद्यालयाचा कबड्डी क्लब आहे. अक्सा हबीब सय्यद या क्लबकडून खेळते. अक्सा याच विद्यालयातून नुकतीच १० वी उत्तीर्ण झाली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात क्लबच्या मैदानावर तिचा सराव सुरू होता. त्यावेळी विरोधी गटातल्या खेळाडूचा पाय तिच्या नाकाला लागला. नाकाला गंभीर दुखापत झाली. डोळ्याखालचे स्नायू जखडले. अक्सा नाक आणि डोळ्याच्या दुखण्यानं बेजार झाली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यासाठी खर्च होता ५० हजार. 
अक्साच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बेताची. वडील फिरत्या गॅरेजमध्ये काम करतात तर आई गृहिणी. त्यांनी मदतीसाठी क्लबला विचारलं. क्रीडा शिक्षिका कीर्ती सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्साला मदत करण्याचं ठरवलं. 
कीर्ती मॅडमनी रचना विद्याालय माजी विद्याार्थी संस्थेला अक्साविषयी सांगितलं. शाळेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जमलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपूर्वी ही संस्था स्थापन केली. वर्ष १९७५ ते २०१८ पर्यंतचे १०४ विद्यार्थी संस्थेचे आजीव सदस्य आहेत. 
संस्थेचे पदाधिकारी साहेबराव हेंबाडे यांनी संस्थेसमोर अक्साला मदत करण्याचा विषय बैठकीत मांडला. मात्र संस्थेने जमा केलेला निधी सामाजिक उपक्रम किंवा संस्थेच्या कामासाठी आहे. त्यामुळे संस्थेचा निधी वापरण्यापेक्षा प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचं ठरलं. २८ सप्टेंबरच्या शनिवारी दुपारी संस्थेच्या व्हॉट्स अप ग्रुपवर यासंदर्भात संदेश प्रसारित झाला. तातडीच्या मदतीची आवश्यकता लक्षात घेऊन ओघ सुरू झाला. संध्याकाळी १५ जणांकडून अवघ्या साडे पाच वाजेपर्यंत ३२ हजार रुपयांची मदत जमाही झाली. आवश्यक रक्कम जमा झाली. त्यामुळे आता मदत नको, असा संदेश टाकण्यात आला.  वेळेत आर्थिक मदत मिळाल्यामुळे अक्सावर वेळेत उपचार झाले.
-प्राची उन्मेष, नाशिक

No comments:

Post a Comment