Sunday 8 December 2019

मसणजोगी वस्तीतली सावित्री

सोलापूर शहरालगत मुळेगाव रोडजवळ मसणजोगी समाजाची वस्ती आहे. पालावर 35 कुटुंब राहतात. वास्तव्य स, स्मशानात. तेलुगू, कन्नड, मराठी अशी त्यांची मिश्र भाषा. पोटासाठी भटकंती करणारा हा समाज शिक्षणापासून कोसो मैल दूर.
याच समाजातल्या रमा अल्लम. १२ वीपर्यंत शिकलेल्या. शिक्षणाचं महत्त्व पटलेल्या. आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे, या विचारानं झपाटलेल्या. आदर्श सावित्रीबाई फुलेंचा. 
त्यांनी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या साहाय्यानं पालावर शाळा सुरू केली. वेळ संध्याकाळी चार ते सहा. शाळेत पाच ते १४ या वयोगटातली मुलं. आरोग्य, स्वच्छता, स्वावलंबनाचे धडे रमा देतात. मनोरंजन आणि खेळ यांचा आधार त्या घेतात, वस्तीतल्या भाषेनुसार त्या शिकवतात. त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे. पूर्वी उनाडक्या करणाऱ्या मुलांपैकी काही आता प्रमाण शाळेतही जाऊ लागली आहेत. अभ्यासात रुची असलेल्या मुलांना पाचवी सहावीनंतर त्यांच्या पालकांची परवानगी घेतली जाते. त्यांना यमगरवाडीच्या भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रमशाळेत पुढील शिक्षणासाठी पाठवले जाते.
पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेत २८ मुलं आहेत. त्यात अठरा मुलं आणि दहा मुली. ''वस्तीतल्या लोकांचं मुलांच्या शिक्षणासाठी पाठबळ मिळतंय. पण शिक्षणाचा प्रसार चांगल्या पद्धतीनं होईपर्यंत काम सुरूच राहील.'' असं रमा सांगतात.

- अमोल सीताफळे,सोलापूर

No comments:

Post a Comment