Sunday 8 December 2019

खोक्यातील उत्खनन (इतिहासात डोकावताना)

मागच्या लेखात आपण मुलांनी केलेल्या उत्खननाविषयी बोललो. तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी मला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. तो म्हणजे, आम्ही घडवून आणलेलं लुटूपुटूचं उत्खनन हे तसं खर्चिक आहे. त्यासाठी तेवढी जागा उपलब्ध असणं देखील गरजेचं आहे. प्रत्येक शाळेकडे किंवा संस्थेकडे ती असेलच असं नाही. आमची उत्खननाची कार्यशाळा झाल्यानंतर अगदी हाच विचार माझ्यादेखील डोक्यात आला होता. एखाद्या शाळेत तेवढी जागा आणि आर्थिक पाठबळ हे उपलब्ध असेलच असं नाही. मग अशा वेळेस काय करता येईल. हा झाला एक प्रश्न आणि दुसरा एक प्रश्न डोक्यात होता तो म्हणजे, दर वेळेस आम्हाला शाळांमध्ये स्वतः प्रत्यक्ष जाऊन हा उपक्रम करणं शक्य नाही. 
ह्या दोन्ही अडचणींचा विचार करत असताना त्यावर मिळालेला उपाय मात्र एकच होता. मग त्या कल्पनेची पडताळणी करून बघण्यासाठी आम्ही पुण्याच्या वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र ह्या संस्थेच्या शिक्षिकांबरोबर तो प्रयोग करून बघायचं ठरवलं. वनस्थळी ही संस्था ग्रामीण भागामधील बालशिक्षण आणि स्त्रियांच्या सबलीकरणासाठी काम करते. ह्यात मुलांना शिक्षण देण्याबरोबरच ग्रामीण भागातच शिक्षिका घडवायचं मोठं काम ही संस्था साधारण १९८० पासून करते आहे. 
तर, प्रयोगाचं नाव होतं 'खोक्यातील उत्खनन'. ही कार्यशाळा फक्त उत्खनन कसं करतात ह्या विषयी नसून उत्खनन शिकवताना ते मुलांपर्यंत कसं पोहचवायचं ह्या बद्दल देखील होती. कार्यशाळा घेण्यामध्ये एकमेकात गुंतलेले अनेक मुद्दे होते. इतिहास आणि भूगोल असे विषय मुलांना आपलेसे वाटावेत अशा पद्धतीने शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये कलेचा अंतर्भाव कसा करता येऊ शकतो, उपलब्ध साहित्यामधून रंजक आणि रोचक शैक्षणिक साहित्य कसं बनवता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा कल्पना सुचण्यासाठी आजूबाजूला बघणं, अनुभवणं, वाचणं आणि व्यक्त होणं किती गरजेचं आहे हे ह्या कार्यशाळेमधून शिक्षकांपर्यंत पोहचवायचं होतं. 
तर, ठरलेल्या दिवशी आम्ही कलाघरात जमलो. सुरवातीला उत्खननबद्दल सचित्र माहिती दिली. नंतर उत्खननाचं खोकं कसं बनवायचं, मातीचे वेगवेगळ्या रंगांचे थर कसे टाकायचे, त्यात कुठल्या वस्तू पुरायच्या, त्या कुठे आणि कशा पुरायच्या, त्या काढायच्या कशा, त्यांची नोंद कशी करायची ह्याचं एक प्रात्यक्षिक दिलं. ह्या कार्यशाळेसाठी एकूण तीस शिक्षिका होत्या. मग पाच शिक्षिकांचा एक असे सहा गट केले. प्रत्येक गटात एक खोकं, माती, विविध रंगांची माती बनवण्यासाठी रांगोळीचे रंग, पुरण्यासाठी काही खापरं, थापी, ब्रश असं साहित्य दिलं होतं. साधारण तासाभरात सगळ्या गटांनी खोकी उत्खननासाठी तयार केली. मग पुढचा तासभर प्रत्यक्ष उत्खननाचा कार्यक्रम पार पडला. 
ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिक्षिकांनी अनेक प्रश्न विचारले, आपल्या गटातील खोक्याला गावांची नावं दिली, त्या खोक्यातलं गाव जमिनीखाली का गाडलं गेलं असेल त्याविषयी गोष्टी रचल्या आणि उत्खननात मिळालेल्या गोष्टी वापरून मुलांना आणखी कायकाय शिकवता येईल ह्याविषयी चर्चा केली. हे सगळं होईपर्यंत कार्यशाळेची वेळ संपली होती. शिक्षिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी बस गाठायला निघायचं होतं. मग, आपापल्या शाळेत मुलांबरोर उत्खननाची कार्यशाळा घेतली की फोटो पाठवायचा वायदा करत आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. ll8ll 
- डॉ. अनघा भट
#नवीउमेद

No comments:

Post a Comment