Sunday 8 December 2019

मुलगी झाली की पैसे न घेणारा डॉक्टर; १६७० प्रसूती केल्या मोफत

मुलाला आजही वंशाचा दिवा मानला जातं. मात्र, मुलीला वंशवेल मानायला कुणी तयार होत नाही. मुलगी जन्मताच अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. अनेकदा ही कळी फुलण्याआधी चिरडून तिला टाकलं जातं. स्रीभ्रूण हत्येसारखा किळसवाणा प्रकार समाजाची घडी बिघडवण्याचे काम करतोय हे डॉक्टरांनी जाणलं. आपल्या हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यास हॉस्पिटलचे बिल न घेता मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे ठरवले. 
मुलगा झाला की नातेवाईक हॉस्पिटल डोक्यावर घ्यायचे. आनंदाने पेढे वाटायचे. मात्र, मुलगी झाली की त्या मुलीला सासू, सासरे, नवरा इतर नातेवाईक बघायला देखील यायचे नाही. बिल भरताना कानकून करायचे. कधी कधी तर त्या मुलीला घेऊन देखील जात नव्हते. हे चित्र डॉ. राख यांना बऱ्याचदा आपल्या हॉस्पीटलमध्ये दिसायचं. हे पाहून त्यांनी ही मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. आपल्या हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्मल्यास हॉस्पिटलचा खर्च माफ करून मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी डॉ. राख यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली. घरातूनही विरोध झाला. मात्र, त्यांना वडिलांची साथ होती. मुलीला देखील सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्या जगल्याच पाहिजे. त्यांचा जन्मदर वाढवण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी त्यांनी हाती वसा घेतला. समाजापुढे माणुसकीचा नवा चेहरा ठेवणाऱ्या या देवदूताचं नाव आहे डॉ. गणेश राख.
डॉक्टर राख हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वंजारवाडी गावचे. या गावात दुष्काळ पाचवीला पुजलेला. हाताला काम नसल्याने त्यांच्या वडिलांनी गाव सोडलं आणि पुण्यात हमाली करून पोट भरू लागले. वडिलांनी मोठ्या कष्टाने मुलांचा सांभाळ केला. पहलवान होण्याची इच्छा बाळगलेले गणेश गरिबी विरुद्ध संघर्ष करत अभ्यास करून डॉक्टर झाले. गणेश यांनी डॉक्टर झाल्यानंतर गावाकडे जाऊन गोरगरीबांची सेवा करायचे ठरवले. मात्र गाव दुष्काळाने पूर्ण होरपळून गेलं होतं. माणसांअभावी गाव ओस पडलेले होते त्यामुळे गणेश यांना पुन्हा पुण्यात यावं लागलं. 
डॉ. राख सांगतात, “पुण्यातील हडपसर येथे २००७ साली एक हॉस्पिटल उभं केलं. चांगल्या रुग्ण सेवेमुळे ओपीडीचे रूपांतर एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये झाले. यातून चांगली कमाई देखील व्हायची. तेव्हाच एकीकडे हे मुलीच्या जन्माचं विदारक चित्र दिसत होतं.” त्यांनी ३ जानेवारी २०१२ पासून 'बेटी बचाव' या अभियानाची सुरुवात केली. हॉस्पिटलच्या उत्पन्नावर होणाऱ्या परिणामाचा विचार न करता त्यांनी हे काम चळवळ म्हणून उभारलं. देशभर फिरून डॉक्टरांना एक केलं. आज २ लाखांपेक्षा अधिक खाजगी डॉक्टर व औषध विक्रेते या चळवळीचा भाग बनले आहेत. यातील काही आर्थिक मदत करून तर काही जणांनी सक्रीय सहभाग घेत हे अभियान नेटाने पुढे नेण्यास मदत करतात.
डॉ. राख यांच्या हॉस्पिटलमध्ये १६७० मुलींचा जन्म झाला आहे. म्हणजेच १६७० प्रसूती त्यांनी मोफत केल्या आहेत. 'बेटी बचाव' हे अभियान आज जगात पोचले आहे. याचाच एक भाग म्हणजे आफ्रिका खंडातील लुसका या राजधानीच्या ठिकाणी जाऊन त्यांनी बेटी बचावचा नारा देत जनआंदोलन केलं.
डॉ. राख यांच्या कामगिरीचा पराक्रम अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोहचला. बच्चन यांनी मुंबई येथे बोलवून राख यांचा एका कार्यक्रमात सत्कार केला. राख यांच्याकडे फोर व्हिलर गाडी नसल्याचं पाहून अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी डॉक्टरांना स्वीफ्ट डिझायर ही गाडी भेट म्हणून देऊन त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. 
#नवीउमेद #internationalgirlchildday
UNICEF India Swati Mohapatra Amol Sitafale

- अमोल सीताफळे, सोलापूर

No comments:

Post a Comment