Tuesday, 10 July 2018

गेल्या ११ वर्षात सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेच्या मार्गदर्शनाचा फायदा. तीन हजारांहून अधिक तरुणांना २१व्या वर्षीच नोकरी

2013-14 चा सुमार. एम.एड पूर्ण झालं होतं. नेट-सेट पास झालो होतो. तरी नोकरी मिळत नव्हती. घरची गरिबी. वडील लहानपणीच वारले होते. घरात आई, 3 भाऊ न बहीण. खूप निराश होतो, पण शांतपणे विचार करत गेलो न मार्ग सापडला. त्यावेळी वाटलं, वेळीच कोणाचं तरी मार्गदर्शन मिळालं असतं तर.... आजूबाजूला माझ्यासारखे अनेक होते. सोलापूर विद्यापीठात एमएड करत असताना प्रमोद कारंडे यांच्याशी मैत्री झाली होती. प्रमोदच्या घरची स्थितीही माझ्यासारखीच. दिवसभर काम आणि रात्री शिक्षण. वर्ष २००६ मध्ये छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात प्रवेश. स्वतः अनंत अडचणी भोगल्यामुळे त्यांनाही बरोबरीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणीचीही जाणीव.
साधा स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा, तो कुठे जमा करायचा, हेही काही विद्यार्थ्यांना समजायचं नाही. वर्षभराची स्कॉलरशिप जायची. त्यामुळे दरिद्रयात आणखीनच भर. कॉलेज सोडावं लागायचं. प्रमोद यांनी या विदयार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आम्ही समविचारी मित्र एकत्र आलोे. डिसेंबर 2006 मध्ये श्री साईनाथ बहुउद्देशीय संस्थेची स्थापना झाली. गेल्या ११ वर्षात सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेच्या मार्गदर्शनाचा फायदा, तीन हजारांहून अधिक तरुणांना २१व्या वर्षीच नोकरी, हे घडलं. मीही या संस्थेबरोबर काम करू लागलो. शैक्षणिक सवलती मिळवून देणं, शिकत असताना काम करून पैसे कमावण्याची सवय लावणं, त्यांचं मनोधैर्य वाढवून शिक्षणाची जिद्द निर्माण करणं ... हे काम आता फक्त रात्र महाविद्यालयातल्या मुलांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. वंचित, अपंग, गरीब मुलांसाठी १०-१२वी परीक्षांसाठी मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, स्पर्धापरीक्षा प्रोत्साहन मार्गदर्शन, रेल्वे भर्ती, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी मोफत मार्गदर्शन. स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनातून ५० हून अधिक मुलांना विविध खात्यात नोकरी मिळाली.
प्रमोद कारंडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी पेशानं शिक्षक. कारंडे सर सध्या बालकामगार प्रकल्प इथं बालकामगार मुलांना शिकवतात. त्याचबरोबर विडी कामगार, वीट कामगार, घरकाम करणार्‍या महिलांना त्यांच्यासाठीच्या सरकारी योजनांची माहिती देतात. गणेश माने, श्रीकांत सायबोळ, शिवाजी नलवडे, अतुल यादव, अतुल सोनके, रवी चव्हाण, दिनेश बंडगर संस्थेचे खंदे सदस्य. कार्याचा खर्च सदस्य स्वतःच्या मिळकतीतूनच करतात. संस्थेचं काम पाहून अनेक नागरिकांनी संस्थेला साहाय्य दिलं आहे. पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करण्याची पद्धतही आगळी. गेल्या वर्षी सचिव गणेश माने यांच्या वाढदिवसानिमित पोतराजाची दोन मुलं दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च संस्थेनं उचलला. खरंच, उत्तीर्ण मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद लाखो रुपयांपेक्षा जास्त मोलाचा वाटतो.
- तय्यब शेख.

रानभाज्या खा, आरोग्य सुधारा


खरंतर आमचं कोकण म्हणजे आंबा- काजू- फणस अशा घनदाट झाडांचं आगरच. पण गेल्या काही वर्षांपासून शहरीकरणाच्या नादात कोकणातही बेसुमार वृक्षतोडीचं पेव फुटलं आहे. याच वेगानं झाडं तोडली जाऊ लागली तर एकेकाळचं समृद्ध कोकण दुष्काळग्रस्त व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून झाडं तोडणाऱ्याला शक्य तितका विरोध करा, पण ते शक्य नसेल तर वैयक्तिक पातळीवर घराच्या आवारात किमान दोन तरी मोठी झाडं लावा, असं आवाहन मी विद्यार्थ्यांना केलं. त्यानुसार अनेक
 विद्यार्थ्यांनी आपल्या घरी नारळ, पोफळी, आंबा, फणस, काजू, साग इ. वृक्षांची रोपं लावली आहेत. या शिवाय आम्ही बीजबँकेचा एक उपक्रमही केलेला आहे. त्यात उन्हाळ्याच्या सुटीत मुलांनी गोळा केलेल्या आंबा, फणस, जांभूळ, बोर, लिंबू यांच्या बिया पाऊस सुरू झाला की गावाला जाताना एसटीतून रस्त्याच्या कडेला मुलं बिया फेकतात.
निसर्गात रमणं कोणाला आवडत नाही?! विद्यार्थ्यांनाही निसर्गपर्यटनाची गोडी लावण्यासाठी आमच्या शाळेतर्फे दरवर्षी वर्षा सहलीचं आयोजन केलं जातं. आमच्या वरवडे गावाजवळच जानवली आणि गड या नद्यांचा संगम आहे. संगमाकडे जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता आहे, पण आम्ही मुद्दाम झाडाझुडूपांमधून पायवाटेने नेतो. गावाच्या जवळच 2-3 किमीवर हा संगम आहे. या वर्षासहलीत गावातले जुने जाणते, वृद्ध लोकही सोबत घेतो. जंगल म्हणावं इतकी दाट झाडी या वाटेवर आहे. जंगलातून जाताना साग, हिरडा, बेहडा, मोह अशा नानाविध झाडांची आणि भारद्वाज, वेडा राघू, कोतवाल, नाचण, धनेश अशा पक्ष्यांची ओळख आम्ही मुलांना करून देतो. सगळ्यात शेवटी संगमावर जाऊन शिक्षकांच्या देखरेखीखाली मुले पाण्यात मनसोक्त खेळतात आणि घरून आणलेला डबा खाऊन सहलीची सांगता होते.


पर्यावरण संवर्धनाचा आमचा आणखी एक अनोखा उपक्रम म्हणजे रानभाज्यांची ओळख. कोकणात पावसाळ्यात वेगवेगळ्या रानभाज्या उगवतात. आरोग्यासाठी त्या त्याच मोसमात खायलाही हव्यात, पण नव्या पिढीला त्यांची नावेही माहिती नाहीत. आमच्या शाळेजवळच्या रस्त्यावर घाडीआज्जी दर पावसाळ्यात या बहुमोलाच्या रानभाज्या विकतात. त्यांना मी एकदा शाळेत यायचं निमंत्रण दिलं आणि त्यांचा सन्मान करून मुलांना रानभाज्या, त्यांची नावं आणि उपयोग यांची माहिती द्यायला लावली. घाडी आज्जींनी भारंगी, टाकळा, कुर्डू या रानभाज्यांची तसेच कुडाच्या शेंगा, शेवग्याचा पाला यांच्या औषधी उपयोगाची ओळख करून दिली. वेगवेगळ्या व्याधींवर या भाज्या कशा उपयोगी आहेत हे सांगितलं. प्रत्येक ऋतुनुसार खानपान ठेवले आणि पुरेशी मेहनत केली तर आरोग्य चांगले राहते, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणावरून पटविलं.
- ऋजुता चव्हाण.

Saturday, 7 July 2018

डिलिव्हरी इथेच व्हायला हवी...

“बाहेर खाजगी हॉस्पिटलला सिझेरियन शस्त्रक्रियेला ५०-६० हजार रुपये खर्च येतो आणि इथं मात्र कित्येकदा नॉर्मल प्रसूती होते. हे आता लोकांना कळलं आहे. त्यामुळे लोक विश्वासाने इथं येतात.” डॉक्टर सांगत होते, “कित्येकदा नॉर्मल प्रसूती होण्यातही अडचणी येतात तेव्हा पेशंटला तसं सांगावं लागतं. पण पेशंट हट्ट करतात की, डिलिव्हरी इथेच व्हायला हवी, आमच्या जबाबदारीवर आम्ही इथं दाखल होतो. अशा वेळी, आम्हांला त्यांना समजावून सांगावं लागतं. आणि पुढे ससूनला पेशंट पाठवला जातो.” पेशंट्सचा इतका विश्वास कमावलेल्या, महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरलेल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्राची ही गोष्ट. 



डॉक्टर सांगतात, “एक पेशंट इथं प्रसूतीसाठी आली होती. बाळ पायाळू होतं. इथं तिची नॉर्मल प्रसूती झाली. कुटुंबाला आनंद झाला. आणि त्यांनीच, डॉक्टर, तुम्हांला काय बक्षीस द्यायचं, असं विचारलं”. डॉक्टर म्हणाले, “तुम्ही पुन्हा इथं आलात, तर तुम्हांला स्मरण राहावं असं काही तुम्ही या केंद्रासाठी करा. मग त्या कुटुंबाने दवाखान्याची बाहेरची जागा नीट करून दिली.” सीसीटीव्ही कॅमेरा, फर्निचर, इथली मशिनरी हे सगळं गावकऱ्यांनी भेट दिलेलं आहे. 
पुणे जिल्ह्यातलं लोणी काळभोर. पुण्याहून जेमतेम ११ किलोमीटरवरचं गाव. लोकसंख्या २२ हजाराच्या आसपास. इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रवेश करताच डाव्या हाताला छान रेखीव बाग. आजूबाजूला स्वच्छता. दवाखाना पेशंट्सनी भरलेला. तरीही गडबड, गोंधळ नाही. सर्व काम शिस्तीत सुरु. दवाखान्यात शिरल्यावर जागोजागी माहिती देणारे फलक. औषधं कोणती, किती शिल्लक आहेत, त्याची एक्सपायरी डेट काय आहे याचाही बोर्ड दिसतो. इथले आरोग्यअधिकारी डॉ डी.जे. जाधव समरसून सांगत होते, “मला इथं येऊन आता सहा वर्ष झाली. आधी इथं ७० ते ८० पेशंट्सची ओपीडी असायची. माझ्या काळात २५० ते २६० ओपीडी व्हायला लागली. दर महिन्याला ८०-९० प्रसूती होतात. तर वर्षभरात ७० हजाराच्या आसपास पेशंटवर उपचार केले जातात. चांगली वागणूक, योग्य सेवा, २४ तास डॉक्टरांची उपलब्धता. 
हे सगळं घडलं कसं? 



लोकांचा सहभाग आणि त्यांची वस्तुरूपी मदत, यामुळे या केंद्राचा कायापालट घडला. केंद्रात प्रवेश करताच डावीकडे दिसणारी छोटेखानी बाग इथल्या लोकांमुळे उभी राहिली आहे. एकेका पेशंटनी आणून दिलेली झाडं आणि दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन डॉक्टरांनी बाग उभी केली आहे. इथं गरोदर मातेची नोंद १२ आठवड्यांच्या आत केली जाते. त्यामुळे सुरुवातीपासूनच तिला योग्य मार्गदर्शन केलं जातं. प्रत्येक आठवड्याला गर्भवतींसाठी शिबीर घेतलं जातं. त्यावेळी प्रत्येक मातेला डॉक्टरांचा, अब्म्युलन्सचा आणि इथल्या सिस्टरचा फोन नंबर दिलेला असतो. कधीही काहीही त्रास वाटला तर गरोदर माता फोन करून विचारू, मदत घेऊ शकते. अति जोखमीच्या मातेची स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घेतली जाते. त्यांची नऊ महिन्यांच्या काळात योग्य काळजी घेऊन नॉर्मल प्रसूती होणार असेल तर या केंद्रात, एरवी, त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवलं जातं. 
डॉक्टर सांगतात, गर्भवतींना प्रसूतीसाठी आणणं, प्रसुतीनंतर घरी सोडणं, मातेला सकस आहार, आई-बाळासाठी कपडे, स्वच्छतेची साधनं यासह कमी वजनाच्या बाळासाठी रेडिएन्ट वॉर्मर सुविधा इथं आहे. एकूण बारा प्रकारच्या रक्ततपासणीसाठी अद्यावत प्रयोगशाळा, नेत्र तपासणी कक्ष, मधुमेह आणि ऊच्च रक्तदाब तपासणी, ट्रॅक्शन सुविधा ते अगदी कुष्ठरोग, क्षयरोग, मलेरीया, डेग्यू, चिकनगुनिया, टायफॉइड इत्यादी आजार असलेल्या रूग्णांवरही येथे उपचार केले जातात. २०१६ साली या प्राथमिक आरोग्य केंद्राची नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर (NABH) या राष्ट्रीय नामांकनासाठी निवड झाली आहे. 

मराठवाड्याची हिमकन्या

''गेल्या वर्षी जिथून माघारी फिरावं लागलं होतं, तिथंच ऑक्सिजन सिलेंडरचा रेग्युलेटर बिघडला. दुरुस्त करता करता एका गिर्यारोहकाचा धक्का लागून तो पडलाच. तो पुन्हा मिळणं शक्य नव्हतं. हिलरी स्टेप- एव्हरेस्ट मोहिमेतला शेवटचा टप्पा. तिथून १७० मीटर अंतरावर होतं, गेल्या १० वर्षांपासून पाहत असलेलं स्वप्न. शेर्पानं सांगितलं , रेग्युलेटरसाठी माघारी परतावं लागेल. यंदा मात्र माघारी जायचं नव्हतं. अजून दोन तास लागणार होते. शेवटी शेर्पाचा ऑक्सिजन मास्क दोघांमध्ये अर्धा अर्धा तास वापरत शिखर गाठलं. तारीख होती २१ मे , वेळ सकाळचे ८ वाजून १० मिनिटं. आयुष्यातला अत्युच्य आनंदक्षण.'' जगातलं सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करणारी मराठवाड्यातली पहिली महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे सांगत होती.
मनीषा मूळची परभणीची. गांधी विद्यालयात १० वी तर ज्ञानोपासक महाविद्यालयात १२ वी पर्यंतचं शिक्षण. आई-वडील, चार बहिणी, एक भाऊ. वडील जयकिशनराव चतुर्थ श्रेणी कर्मचारी. ते आणि मनीषा दोघेही व्हॉलीबॉलपटू. शिवछत्रपती पुरस्काराची ती मानकरी. मनीषा सध्या औरंगाबादमधल्या इंदिरा पाठक महिला महाविद्यालयात क्रीडा विभागप्रमुख.
इंडियन कॅडेट फोर्सच्या शिबिरादरम्यान २००५ च्या सुमाराला गिर्यारोहणाचा ध्यास निर्माण झाला. नोव्हेंबर २०१४ पासून 'मिशन गो फॉर सेव्हन समिट एक्सपेडिशन' अंतर्गत सात खंडांमधल्या सात सर्वोच्च शिखरांवर राष्ट्रध्वज फडकावण्याची तयारी सुरू. मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एव्हरेस्टखेरीज माऊंट किलीमांजारो, माउंट एलबर्स आणि ऑस्ट्रेलियातील माऊंट कोर्सिस्को व ऑसी 10 ही शिखरं पादाक्रांत. माउंट कोर्सिस्को व ऑसी 10 सर करणाऱ्या पहिल्या भारतीय टीममध्ये मनीषा होती. 







एशियन अ‍ॅडव्हेन्चर कंपनीतर्फे मग एव्हरेस्टसाठी निवड. १३ महिन्यांचं खडतर प्रशिक्षण. गेल्या वर्षी हिमवादळामुळे स्वप्न अपुरं राहिलं. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे फुप्फुसांचा संसर्ग, रुग्णालयातले उपचार. या साऱ्यातून ती १५ एप्रिलला पुन्हा जिद्दीनं मोहिमेसाठी रवाना झाली. ५६ दिवसांच्या मोहिमेमध्ये ४० दिवस रोटेशन्स. १७ मेच्या मध्यरात्रीपासून बेस कॅम्पवरून चढाईला सुरुवात केली. ६२ दिवसांची मोहीम अवघ्या ५१ दिवसात पूर्ण. शेर्पा दावत शेरींगच्या मदतीमुळेच मोहीम फत्ते झाल्याचं मनीषा सांगते. त्याचबरोबर आजवरच्या संपूर्ण वाटचालीत मामा भीमराव खाडे यांचा मोठा वाटा असल्याचं ती आवर्जून सांगते. गेल्या वर्षी मोहिमेसाठी कर्ज घेतलं होतं. यंदा या मोहिमेसाठी औरंगाबादमधल्या महात्मा गांधी मिशननं १५ लाख रुपये तर कॉलेजनं ४ लाख रुपये दिले. इतरही काही सामाजिक संस्था, व्यक्तींनी मदत केली.







मनीषाचं पुढलं लक्ष्य आहे उत्‍तर अमेरिकेतील डेनाली शिखर.
(एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे- संपर्क क्रमांक-9923249815)

गौताळा आज मोकळा श्वास घेत आहे....

औरंगाबाद शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर वसलेलं गौताळा अभयारण्य. सातमाळ्याचे उंच डोंगर, दऱ्या ,आकाशाला भिडणारी असंख्य झाडं, नाले, झरे आणि तळ्यांनी औरंगाबाद - जळगाव सीमेवरचं हे समृद्ध जंगल. 54 प्रजातींचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी. नीलगायी, बिबट्या, अस्वल, हरीण, तरस, लांडगे, रानडुक्कर या जंगलाचं वैशिष्ठय. आणखी एक विशेष म्हणजे हे जंगल पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त आहे. 




याचं श्रेय वनाधिकारी रत्नाकर नागपूरकर यांना. राज्यात प्लॅस्टिकमुक्तीची घोषणा होताच नागपूरकर यांनीही जंगलात तातडीनं अंमलबजावणी सुरू केली. प्लॅस्टिक जंगलात न्यायला पूर्णपणे बंदी. पाण्याच्या बाटल्यांसाठी 10 रुपये डिपॉझिट. आत जाताना वॉचमनला बाटल्या दाखवायच्या, कुपन घ्यायचं. परत आल्यावर नेलेल्या सगळ्या बाटल्या परत आणून दाखवायच्या आणि डिपॉझिट परत घ्यायचं. यामुळे प्लॅस्टिकचा नवीन कचरा थांबला.



जंगलात आधीचा कचरा वेचण्यासाठी नागपूरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जंगल अक्षरशः पिंजून काढलं. या मोहिमेत प्लॅस्टिकच्या तब्बल 15 हजार बाटल्या जमा झाल्या. त्या प्लॅस्टिक कचरावेचकांकडे देण्यात येत आहे. त्यातून त्यांचंही अर्थार्जन होत आहे.
जंगलाची नीट पाखरण करणारे वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे गौताळा आज मोकळा श्वास घेत आहे. असं करणं शक्य आहे, बघा. 

प्लीज, आमच्या शाळेत तंबाखू खाऊ नका....

“ एकदा असं झालं, शाळेत आलेल्या पाहुण्यांनी चहापाणी झाल्यावर हळूच गायछापची पुडी काढून तंबाखू मळायला सुरुवात केली. तेव्हा स्वागत करणार्‍या विद्यार्थी प्रतिनिधीने पुढे येऊन ‘सर, शाळेत तंबाखूवर बंदी आहे, प्लीज, इथे तंबाखू खाऊ नका. हवंच असेल, तर तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता.’ असं स्पष्ट शब्दांत सुनावलं. हे ऐकून तो पाहुणाही वरमला.” बीडच्या गेवराई तालुक्यातल्या पंचाळेश्वर जिल्हा परिषद शाळेतला हा किस्सा. मुख्याध्यापक नामदेव चौधार यांनी सांगितला. 



त्यांनी सांगितलं, “आमच्या शाळेत तर कुठल्याही व्यसनावर बंदी आहेच पण विद्यार्थी घरीसुद्धा पालकांना व्यसन करू नका, असं विनवतात. यामुळे अनेक पालकांनी व्यसन सोडलं आहे. पालकांनी जरी पैसे देऊन गुटखा किंवा बिडी/ सिगारेट आणायला सांगितली, तर विद्यार्थी त्याच पैशाचे गोळ्या- चॉकलेट घेऊन शाळेत आणतात.’ शाळेतल्या व्यसनबंदीचं भान विद्यार्थ्यांना किती आहे, हे यातून कळतं. या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम इतक्या चांगल्या प्रकारे पटवून दिले आहेत, की विद्यार्थी आपल्या पालकांना कसलंच व्यसन करू देत नाहीत, त्यामुळे पंचाळेश्वर गावही जवळपास तंबाखूमुक्त झालं आहे. अशा जागरूक विद्यार्थ्यांमुळेच पंचाळेश्वर शाळेला 2017 साली ‘तंबाखूमुक्त शाळा’ पुरस्कारही मिळाला आहे. 




पंचाळेश्वर शाळेत सध्या विद्यार्थी आहेत 90. शिक्षक मात्र दोनच. त्यामुळे एका वेळी दोन- तीन वर्गांना शिकवावं लागतं. या अडचणीतूनही त्यांनी मार्ग काढला आहे. ज्ञानरचनावादी कार्डस् आणि खेळांचा शिक्षक शिताफीने वापर करून घेतात. शाळेत मराठी, इंग्रजी, गणित इ विषयांसाठी सुमारे 90 रचनावादी ट्रेज आहेत. त्यात प्रत्येक इयत्तेला अनुसरून त्या- त्या विषयाचे साहित्य उदा. शब्दपट्ट्या, अंक ठोकळे, दशकमण्यांच्या माळा, रंगीबेरंगी चित्रे असलेली कार्ड, जिगसॉ पझल्स असं भरपूर शैक्षणिक साहित्य आहे. आणि हे साहित्य नामदेव चौधार सर, भरत पोपळे सर आणि आधी या शाळेत कार्यरत असणाऱ्या सचिन खिल्लारे सरांनी स्वहस्ते बनविलेलं आहे, हे विशेष. शाळेतल्या संगणकावर टायपिंग करून, प्रिंट काढून, शाळेतल्या लॅमिनेशन मशीनवर ते लॅमिनेट करण्यात ये्तं. त्यामुळे शिक्षक जर एखाद्या वर्गाला शिकवीत असतील तर दुसरा वर्ग या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने स्वयंअध्ययन करू शकतो. अशी ही पंचाळेश्वरची स्वयंपूर्ण शाळा! अनुकरणीयदेखील.
चौधर सरांचा नंबर- +91 94042 50586

एक धागा सुखाचा

बीड तालुक्यातील पाली गावाजवळचा डोंगर. इथला आंनदवन प्रकल्प. एचआयव्हीसह जगणाऱ्या मुला-मुलींचा दत्ता आणि संध्या बारगजे हे जोडपं अकरा वर्षांपासून सांभाळ करत आहे. सध्या इथं ६५ मुलं असून त्यात ३७ मुली आहेत. दत्ता बारगजे म्हणतात, “शिक्षणासोबत आनंदवनातील मुलं स्वत:च्या पायावर उभी राहावीत, यासाठी शिक्षण,पालनपोषण यासोबत. त्यांना शिलाई प्रशिक्षण द्यायचं सुचलं.” मुंबईतले सामाजिक सल्लागार टी.एन.व्ही अय्यर यांनी चार वर्षापूर्वी ६० हजार रूपये किंमतीच्या १२ शिलाई मशीन खरेदी करून आंनदवनला मोफत भेट दिल्या. मुलांनी शिक्षण सांभाळून शिवणकामाचे धडे घ्यायला सुरूवात केली. फिरोजा, आसमा, पूजा, अर्चना, कोमल, तुषार, निखील, अभिजीत ही मुलं आता शिवणकामात तरबेज झाली आहेत. त्यातून मुलं सध्या बंडी, झबलं, पॅन्ट, शर्ट, पेटीकोट, कापडी पिशव्या, उशाच्या खोळी तयार करू लागली आहेत. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरीही आता या मुलांकडून विजार, खमीस, कोपरी, कानटोपी शिवून घेतात. 




आंनदवनात लाकूड आणि कपड्यात विणलेले झोकेही तयार केले जातात. जुन्या साड्यांपासून विणलेली पायपुसणी प्रकल्प पाहायला आलेल्या पाहुण्याला भेट दिल्या जातात. औषधं, गोळ्या ठेवण्यासाठी कागदी पॉकेटही मुलं तयार करत आहेत.
एचआयव्हीबाबत जनजागृती करण्यासाठी ते ग्रिटींग कार्ड तयार करतात. दरवर्षी जागतिक एड्स दिनी बीडच्या बसस्थानकात त्यांच्या ग्रिटींग कार्ड्सचं प्रदर्शन भरवण्यात येतं. धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जा-ये करणारे ट्रकचालक, क्लिनर्स यांचं आनंदवनकडून एडसबाबत समुपदेशन केलं जातं. 




आता ही मुलं मार्गी लागत आहेत. तुषार प्लंबिंगचं, अभिजीत बांधकाम व्यवसायाचं आणि निखील काॅम्प्युटरचं प्रशिक्षण बी्डमधल्या शासकीय आयटीआयमध्ये घेत आहे. ज्योतीने अकरावी सायन्सची परिक्षा दिली आहे. नितीन, निलेश, चतुरा, अर्चना, कोमल, सोनी यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. ही मुलं आज स्वत:च्या पायावर उभी राहत असल्याने, आनंद वाटत असल्याचं बारगजे बोलून दाखवतात. एचआयव्हीने या मुलांच्या आयुष्यात दुःख आणलं असलं तरी आनंदवनाने त्यात एक धागा सुखाचा गुंफला आहे.
दत्ता बारगजे संपर्क क्र. - 9422693585