Monday, 19 December 2016

'गेटकेन लग्न — दुष्काकाळाची गरज


मराठवाडा- नाव जरी घेतलं की रणरणतं ऊन, ऊन्हामुळे सुकलेली वैराण भूमी, पाण्यासाठी घागरी, मडकी घेऊन फिरणारी डोकी नजरेसमोर येतात.
अशा या भागात 'गेटकेन' लग्नपद्धती पूर्वीपासून प्रचलित आहे. फारच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहेच्छुक वधुवरांचा विधीवत विवाह म्हणजे 'गेटकेन' लग्न. आजच्या परिस्थितीत 'गेटकेन' विवाहद्धती ही तेथील एक गरज बनत चालली आहे. कारण 'दुष्काळ'!
दुष्काळाच्या या चक्रव्युहात समाजातल्या सर्वच स्तरांतील लोक फसले आहेत. हौस, ऐपत असूनदेखील आज तेथे 'गेटकेन' पद्धतीनेच लग्नं लावली जात आहेत. कारण- पाण्याचे दुर्भिक्ष! लग्नसोहळ्यात पाण्याअभावी पाहुण्यांची व्यवस्था कशी करावी हा एक यक्षप्रश्न आज तिथे उभा आहे.पण यातून एक चांगलं फलित मिळतंय. लग्नसोहळ्यातला वायफळ खर्च वाचतोय. पैशाचा योग्य विनियोग करण्याच्या दृष्टीने ते एक यशस्वी पाऊल आहे. 'गेटकेन' लग्नांचा प्रसारही चांगला होतोय.
आता हा 'गेटकेन' शब्द आला कुठून?
गेट म्हणजे दरवाजा आणि केन म्हणजे ऊस.
गेटकेन म्हणजे साखर कारखान्याचे सभासद नसलेल्या बाहेरच्या शेतकऱ्यांचा कारखान्यांना कमी भावात मिळणारा ऊस.
गेट आणि केन हे दोन्ही शब्द मूळ इंग्लीश - याचा लग्नाशी कसा काय संबंध आला असेल?
कमी खर्चातील ऊस तसं कमी खर्चातील लग्न.
कांही भाव ना ठरवता , कांही देणं-घेणं न करता
केलेलं लग्न.
कविता जमादार - इंगळे

तुम्ही आवाज द्या;भाऊ बनून पाठीशी राहू’



माळेगाव इंजिनीअरिंग कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी
दिला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार
उस्मानाबाद, दि.20: पावसाअभावी हातची गेलेली पीके बघून धीर खचलेल्या काही शेतकऱ्यांनी परिस्थितीपुढे शरणागत होऊन आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग निवडला. मात्र, त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची परवड होऊ नये, यासाठी दातृत्वाचे हजारो हात पुढे आले. परिस्थितीला घाबरायचं नाही, तर त्याला सामोरं जात लढायचं , असा मायेचा आधार देत त्यांनी या कुटुंबियांना दिलासा दिला. त्याचबरोबर, आत्महत्येसारखा मर्ग स्वीकारु नका, असा संदेशही त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरीराजाला दिला. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थी आणि मित्र परिवाराने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या सांसारिक कामासाठी आणि उदरनिर्वाहासाठी मदत करुन या कुटुंबियांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा कायमस्वरुपी मार्ग उपलब्ध करुन दिला. ‘तुम्ही आवाज द्या, तुमचे भाऊ बनून पाठीशी राहू’ असा विश्वास या मित्रांनी या कुटुंबियांना दिला.
येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा सामाजिक संवेदना जागविणारा कार्यक्रम झाला. सतत चार वर्षे टंचाई अनुभवणाऱ्या उस्मानाबादकरांसाठी ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासनासोबत सारा समाज तुमच्या पाठीशी आहे’ असा अनुभव देणारा हा कार्यक्रम ठरला. व्हॉटस् ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माळेगावच्या या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा खरोखरच सामाजिक आशयासाठी उपयोग करता येतो, याची जणू प्रचितीच दिली. उस्मानाबाद व मराठवाड्यातील बातम्या वाचून व पाहून या ग्रुपमधील मित्रांची सामाजिक संवेदना जागली आणि आपणही काहीतरी केले पाहिजे, असा विचार करत त्यांनी जिल्ह्यातील 14 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे मदत करुन त्यांना नवी उभारी घेण्यासाठी प्रेरणाच दिली आणि हिंमत न हारण्याचा संदेशही दिला.

कुणाला शेळ्या तर कुणाला कुक्कुटपक्षी, कुणाला पिठाची गिरणी तर कुणाला चक्क संगणक अशी त्या कुटुंबियांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांनी मदत केली. नितीन करडेकर, संजय सावंत, आनंद गादेकर, विजय जमदाडे, सुधीर रणनवरे, किशोर बोराटे, ईश्वर दौंडकर, विजय तावरे, संपत खोमणे, नरेंद्र देशमुख, अजित वग्गा, धनराज काळभोर, संदीप कुंजीर आणिप्रवीण घोरपडे अशी या सहकाऱ्यांची नावे. कॉलेजमधून उत्तीर्ण होऊन प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत. मात्र, व्हॉटस् ॲपच्या माध्यमातून एकत्र येत आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीचं भान राखत या सगळ्यांनीच सामाजिक बांधीलकी अशी अनोख्या पद्धतीने जपली त्याचबरोबर, आणखी काही मदत लागली तर सांगा, असा आधाराचा शब्दही दिला. त्यांच्या या शब्दामुळे कुटुंबातील महिलेच्या डोळ्यांतून ओघळलेले अश्रू त्यांच्याबद्दलची जणू कृतज्ञताच व्यक्त करत होता. केवळ आत्महत्याग्रस्त कुटुंबियच नाहीत तर उद्याचं भविष्य घडविण्यासाठी सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदतीअभावी अडचण येतेय, हे जाणून या मित्रांनी शासकीय तंत्रनिकेतनातील 12 विद्यार्थ्यांनाही प्रत्येकी 3 हजार याप्रमाणे पुस्तकेआणि शैक्षणिक खर्चासाठी मदत दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत या मित्रांनी या मदतीचे वाटप या कुटुंबियांना केले.
यावेळी बोलताना श्री. तांबे यांनी या सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त करताना त्यांनी दाखविलेले दातृत्व खूप मोठे असल्याचे आवर्जून सांगितले. या 14 कुटुंबियांना दिलेली ही मदत त्यांना कायमस्वरुपी आधार ठरेल आणि त्यांना आर्थिक बळ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्री. करडेकर यांनी प्रास्ताविकात, या मदतीमागची भूमिका आणि भावना व्यक्त केली. सहज गप्पांतून उलगडत गेलेले सामाजिक बांधीलकीचे पदर आणि चीन, जपान आणि अमेरिकेतही असणाऱ्या मित्रांनी मदतीद्वारे नोंदविलेला सहभाग हा या कुटुंबियांना आधार वाटेल, असा आहे. आमची मदत पुरेसी नसली तरी ही सेवा रुजू करुन घ्यावी, असे भावनिक आवाहन श्री. करडेकर यांनी केले.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते या मदतीचे वाटप करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीनेही एका महिलेने मनोगत व्यक्त केले. या मदतीमुळे भक्कम आधार मिळाल्याचे सांगत यापुढे अविचारा थारा नाही, असा विश्वास तिने दिला. एका विद्यार्थ्यानेही मनोगत व्यक्त केले. तुमच्या मदतीमुळे सक्षम होण्यास मदत होईल. जेव्हा मोठा होईल, तेव्हाही तुमच्यासारखाच समाजाचा आधार बनेन, अशी भावना त्याने व्यक्त केली तेव्हा सभागृहही हेलावले.
या माळेगाव येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाने मदत केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा. रवींद्र लगदिवे, विनय सारंग, नागनाथ कुबेर, सुप्रिया शेटे यांनी मदत केली. याशिवाय, उस्मानाबादचे तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधव, तुळजापूर तालुका कृषी अधिकारी एस.पी. जाधव,
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, कृषी मंडळ अधिकारी श्री. सस्ते आदींनी मदत केली.

Tuesday, 13 December 2016

नर्मदा काठची जीवनशाळा

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचा सरदार सरोवर प्रकल्प. त्यापाठोपाठ नेहमी माहिती असणारा नर्मदा आंदोलनाचा लढा. पण, या लढ्यासोबतच इथे अजूनही काही गोष्टी घडल्या. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट जीवनशाळा. छोटेखानी वर्ग उघडून 'नर्मदा नवनिर्माण अभियाना'तर्फे या भागात तब्बल सात शाळा सुरु झाल्या. नर्मदा जीवनशाळांचे हे २५ वे वर्ष. 
न्याय्य पुनर्वसनासाठी गेल्या तीस वर्षांपासून चाललेल्या 'नर्मदा बचाओ आंदोलना'च्या नवनिर्माणाचा या शाळा एक महत्वाचा हिस्सा ठरल्या आहेत. कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसतानाही सातपुडा आणि विंध्यच्या पर्वत रांगात, काही नर्मदेच्या किनारी अशा सात शाळा नेटाने चालत आहेत, असे आंदोलनाच्या कार्यकर्त्या योगिनी खानोलकर म्हणाल्या.
"आमची शाळा आम्हीच काढू...." असा चंग गावक-यांनी बांधला आणि या जीवन शाळांनी आकार घेतला. त्यामुळे शाळेला विद्यार्थी शोधत कधी फिरावे लागले नाही. कारण ती शाळा लोकांची होती.
आधीच विखुरलेली वस्ती आणि त्यात धरणाचे पाणी आत शिरल्यामुळे गावांपासून तुटलेली गावे, पाड्यांपासुन तुटलेले वाडे वस्त्या, अशा स्थितीत पहाडावरुन ६ ते १४ वर्षांच्या मुलांना तीन चार तास होणारी पायपीट टळावी म्हणून निवासी शाळेचा पर्याय उभा राहीला. लोकांनीच दांड्या, वळे गोळा करुन तट्ट्याच्या कुडाच्या जशा जमतील तशा भिंती बांधून वर्ग उभे केले. 
आपल्या गावात शिकलेले कोणी नाही तर दुस-या गावातले शिक्षक शोधायला जाण्याची मोहीम गावक-यांनी, कार्यकर्त्यांनी हाती घेतली. त्यात मुलांचाही सहभाग होता. माळ, तिनसमाळ, रोषमाळ सारख्या थोड्याफार शिक्षित असलेल्या गावातून १० वी १२ वी झालेली मुले पुढे आली. कोणीच शिकले नाही अशा गावांत शिकवायला जायला लागली. सरदार सरोवर धरणापासूनच पहिलेच गाव ‘मणिबेली’. तब्बल पाच सहा तास अखंड चालल्यावर, सातपुड्याच्या काही रांगा पार केल्यावर येणार गाव माळ. पहिली-दुसरीचे मणिबेली शाळेतले विद्यार्थी आपल्या शिक्षकांना घ्यायला आणि सोडायला येत. शिक्षकांच मन नवीन गावात रमेना पण मुलांच्या शिकण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने तेही शाळेशी बांधले गेले. आंदोलनाने शिक्षकांचे प्रशिक्षण करविले. कधी या शाळेला, कधी त्या शाळेला भेट दे... असे करत ही दहावी बारावीची शिक्षकांची फळी हळू हळू मजबूत झाली. प्रत्येक शिक्षक प्रयोग करायला लागला. प्रत्येकाची शैली वेगळी. कधी कधी एकमेकांना पूरक. मुख्य म्हणजे आपापल्या पद्धतीने शिकविण्याचे मिळालेले स्वातंत्र्य याने शिक्षक आपली छाप पाडू लागले. मुलांना त्यांच्या त्यांच्या भाषेत अर्थ सांगत शिकविण सर्वांसाठी सोप्पे झाले.

इकडची सगळी गणितेच वेगळी होती, आहेत. याचा गाभा शासनाची कोणती योजना नाही... की कायदा नाही... की मुलांना शिकण्याची आणि शिक्षकांना शिकवण्याची सक्ती नाही. त्या त्या वेळी आलेले कार्यकर्ते आंदोलनाचा संघर्ष पेलून नवनिर्माणाचे काम करणारे, आपले घर, शहर, मोठ्या पगाराच्या नोक-या सोडून आदिवासी समाजासाठी काम करत आहेत. हे प्रत्यक्ष पाहिल्याने कार्यकत्यांबद्दल आत्मियता वाटून सहकार्याचे नाते तयार झाले. यात मेधाताईं पाटकर यांचे सर्वांना सामावून घेणारे, व्यक्तीच्या गुण दोषासकट त्याला स्विकारुन त्याला बदलणारे नेतृत्वही महत्वाचे.
या शाळांचे कौतुक अनेकांनी केले. पण तरी शाळांना शासन दरबारी मान्यता दिली गेली नव्हती. अथक प्रयत्नानंतर २०१३ मधे स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर शासनाने नर्मदेच्या सध्या चालू असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील ७ शाळांना मान्यता दिली. या शाळा आजही तग धरुन आहेत. कारण लोकांना यांची गरज आहे. 
आंदोलन विदेशी पैसा घेत नाही. तेव्हा वेगवेगळ्य़ा क्षेत्रात काम करणा-या भारतीय लोकांच्या देणग्यांतून ह्या शाळा चालू आहेत. शाळेत शिक्षक शिकवण्याचे काम करतात, कार्यकर्ते देखरेखीचे आणि आंदोलनाशी जोडलेले समर्थक जशी जमेल तशी मदत करतात. योगिनी म्हणाल्या, आज येथे चौथी पर्यंत शाळा असून पुढे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत पाठविले जातात. शाळेत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडले आहेत. राज्य पातळीवर दोन विद्यार्थ्यानी सुवर्ण आणि रौप्य पदकासह अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत.
 संतोष मासोळ.

असंही व्यसन


दारूच्या कारखान्‍यात बाटल्या हाताळणा-या हातांना मोठमोठे ग्रंथ हाताळण्याची सवय लागली. रात्रंदिवस दारूच्या वासात काम करूनही व्यसन लागले ते वाचनाचे. या व्यसनातून मग उभे राहिले एक भव्य ग्रंथालय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाची ही कथा.... 
इतर सर्वसामान्य माणसासारखे काशीनाथ जाधव पोट भरण्यासाठी औरंगाबादला आले. शिक्षण फक्त बारावी. नोकरी मिळण्याची हमी नाही. कधी भाजी विकून तर कधी लोकांची छोटी-मोठी काम करून उदरनिर्वाह सुरू. तेव्हाच महाराष्ट्र डिस्टीलरी लि. या दारू कारखान्यात तृतीय श्रेणी कामगार म्हणून नोकरीची संधी चालून आली. नोकरीची गरज तर होतीच पण दारूच्या कारखान्यात काम करणे म्‍हणजे लोकांच्या नजरेतून उतरणे. शिवाय व्यसन जडण्याची भीती होतीच. जो कोणी दारूच्या कारखान्यात काम करतो, तो दारूच्या नादी लागला असे म्हणण्याचा तो काळ. पण पोटासाठी स्थिर नोकरीची गरज होती. काशीनाथ जाधव यांनी हा समज मोडून काढण्याचा निश्चय करीत कारखान्यात पाऊल टाकले. 


योगायोगाने या कारखान्‍यात समविचारी सहकारी लाभल्‍याने त्‍यांचे मन थोडे स्‍थिर झाले. मात्र, दारू तयार करून आपण समाज बिघडवण्‍याचे काम करीत आहोत अशी बोच त्‍यांच्‍या मनात होतीच. नोकरी तर सोडू शकत नाही, पण इतर वेळेत आपण समाजोपयोगी काम करायचे याचा निर्धार करून काशीनाथ जाधव यांनी वाचनालय सुरू करण्‍याचा निर्णय घेतला. शाहू-फूले-आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्‍यासाठी ग्रंथालयाचा मार्ग योग्‍य वाटला. कारखान्‍यात काम करणा-या इतर निर्व्‍यसनी कामगारांना एकत्र करत त्‍यांची बैठक घेतली. ग्रंथालय सुरू करण्‍याचा विचार त्‍यांच्‍या समोर मांडल्‍यानंतर सर्वांनी एकमुखाने संमती दिली. या संमतीनंतर ३१ मार्च १९८२ रोजी घरोघरी जाऊन ११० पुस्‍तके जमा केली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे बीज रोवले. 
या ग्रंथालयात आज ३५ हजार पुस्‍तके आहेत. दररोज ७०० ते ८०० वाचक ग्रंथालयात येतात. सुरूवातीला फक्‍त ५०० रूपये अनुदान मिळत असे. आज या ग्रंथालयाला वर्षाला चार लाख रूपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. बालसाहित्‍य, विद्यार्थी, तरूण यांच्‍याबरोबरच मोठयांसाठी विविध पुस्‍तके इथे उपलब्‍ध आहेत. कार्ल मार्क्‍सपासून ते विविध विचारवंतांची पुस्‍तके, संदर्भ ग्रंथांचे भांडार उपलब्ध आहे. ३ सप्‍टेंबर १९८३ रोजी वाचनालयाच्‍या इमारतीचे भूमिपूजन मा. शरद पवार यांच्‍या हस्‍ते झाले होते. सुप्रिया सुळे यांनी अर्थिक मदत केल्‍याने या वाचनालयाची सुसज्‍ज इमारत जवाहर कॉलनीत उभी आहे.
मराठवाडा वृत्‍तपत्र बंद पडल्‍यानंतर कार्यालयातील सर्व फर्निचर अशोक भालेराव यांनी वाचनालयात वापरण्‍यासाठी दिेले. आज या वाचनालयाचे 1500 सभासद आहेत. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वाचनालय सुरू असते. विद्यार्थ्‍यांचे अभ्‍यासवर्ग येथे सतत होत असतात. नीलिमा पोखारे आणि वनिता खोत या दोघी ग्रंथालयाचे काम समर्थपणे संभाळत आहेत. 
दारूच्‍या कारखान्‍यात काम करत असताना होणारे शारीरिक श्रम, मानसिक अस्‍वस्‍थता दूर करण्‍यासाठी तेथील कामगार दारूकडे वळलेले दिसतात. काशीनाथ जाधव आणि त्‍यांचे सहकाऱ्यांनी मात्र या वेदनांवरचा उतारा पुस्‍तकांमध्‍ये शोधला आहे. आज त्‍यांच्‍या जीवनाला एक नवे परिमाण लाभल्‍याने मोठी वाचक चळवळ उभी राहिली.

हनुमंत लवाळे.

लावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार

अभिषेक पवार आणि सचिन घारगडे या दोन मित्रांचा प्रेरणा देणारा व्यवसाय. 
लावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार
• नागपुर, गोंदिया, चंद्रपुर जिल्ह्यात पुरवठा
• हॅचरी टाकण्याचा मानस
• सव्वा वर्षात 15 लाखांचा नफा.
जापानीज़ लावा हा कुक्कुट या संवर्गातील पक्षी. 2013 पर्यंत हा पक्षी पाळण्यावर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाने बंदी घातली होती. 6 डिसेंबर 2013 रोजी या “जापनीज़ क्वेल्स” म्हणजेच जापानी लावावरील बंदी उठवून त्याला पोल्ट्री फ़ार्मिंगसाठी मान्यता देण्यात आली. भंडारा जिल्ह्यात अभिषेक पवार आणि सचिन घारगडे या दोन मित्रांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेत खुर्शीपार येथील शेतात लावा फार्मिंग सुरु केले आणि केवळ सव्वा वर्षात आज ते नागपुर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, या जिल्ह्यात लावा पुरवठा करणारे एकमेव पुरवठादार झाले आहेत.
भंडारा शहरापापासून वरठी रोडवर 10 किलोमीटर अंतरावर असणारे खुर्शीपार गाव. याच गावात अभिषेक आणि सचिन हे दोघे मित्र पदवी आणि कृषि पदविका धारक तरुण, वडिलोपार्जित शेती करतात. मात्र काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास दोघांचाही मनात घोळत होता. अभिषेकच्या पशु वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या मावस भावाने त्याला लावा पक्षी पालनाबाबत मार्गदर्शन केले. यातून प्रेरणा घेत अभिषेक पवार याने त्याच्या शेतात 1500 चौरस फुट जागेवर जाळी लावून शेड तयार केले. छत्तीसगडमधील दुर्ग येथून एक दिवसाचे 1000 लावा पिल्ले त्यांनी विकत आणले. त्यासाठी 12 हजार रुपये खर्च आला. मात्र प्रत्येक व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यातील अनुभव आणि खाचखळगे समजून घेणे महत्वाचे असते याची जाणीव त्यांना लगेच झाली. आणलेल्या 1000 पिल्लांपैकी 500 पिल्ले 15 दिवसातच दगावाले. यातून सावरत एकेक अनुभव घेत त्यांनी 500 पक्षाना वाचवले. एक महिन्यात हे पक्षी 150 ग्रॅम वजनाचे झाले. विक्रीसाठी तयार झालेले पक्षी विकण्यासाठी त्यांनी बाजरपेठेच्या शोधात नागपुर गाठले.
पहिल्यांदा या मित्रांना लावा पक्षाच्या विक्रीसाठी सुद्धा बराच त्रास सहन करावा लागला. कारण ठोक विक्रेत्यांना यावरील बंदी उठल्याचे माहीत नव्हते. त्यासाठी प्रत्येकवेळी प्रसिद्ध झालेले राजपत्र दाखवून लोकांना पटवून दयावे लागे. काही वेळा वनविभाग आणि पोलिस यांचाही ससेमिरा त्यांच्या मागे लागला. मात्र सर्वाना शासन निर्णय आणि पोल्ट्री फार्म दाखवून त्यांनी सत्यता पटवून दिली. इतकी खटपट करूनही या मित्रांना पहिल्यांदा तोटाच सहन करावा लागला, कारण 500 पिल्ले आधीच दगावाले होते. 
दुसऱ्या वेळी मात्र त्यांनी अनुभवातून शिकत 15 हजार रुपये नफ़ा कमावला. आतापर्यंत यांनी 30 हजार पक्षी विकलेत आणि त्यातून 15 लाख रुपयांचा नफ़ा झाला आहे. केवळ सव्वा वर्षात त्यांनी लावा पालनातून येथपर्यंत मजल मारली आहे. आज गोंदिया, चंद्रपुर, नागपुर, गडचिरोली आणि भंडारा या पाचही जिल्ह्यात त्यांचे लावा पक्षी विक्रीसाठी जातात. याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याप्रमाणात पुरवठा करण्यासाठी आम्ही कमी पडतो. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांनी याकडे वळावे, असे आवाहन पवार यानी केले आहे.
या पक्षाची पिल्ले दुर्ग, पुणे आणि हैद्रराबाद येथे मिळत असल्यामुळे पक्षी आणायला त्रास होतो. एक दिवसाचे पक्षी आणले तर त्यांचे रस्त्यातच दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात हॅचरी सुरु करण्याचा मानस अभिषेक पवार यांनी व्यक्त केला. जिल्हयातील इतर तरुणांनाही मार्गदर्शक ठरेल, अशा प्रकारचा कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून अभिषेक आणि सचिन यांनी आर्थिक उन्नतीची कास धरली आहे
मुख्य म्हणजे लावा पालन अत्यंत सोपे आहे. 500 स्क्वेयर फुट जागेत 2000 पक्षी राहु शकतात. कमी कालावधीत, कमी खर्चात, हा पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी करू शकतात. शिवाय या पक्षाला कुठल्याही रोगप्रतिकारक लसीची गरज नाही. त्यामुळे लसिकरणाचा खर्च शुन्य आहे. शिवाय पशु वैद्यकीय डॉक्टरची पण गरज पडत नाही. कोंबड़ीला लागणारे खाद्याच या पक्षाला लागते. एक महिन्यात 150 ग्रॅम वजनाचे पक्षी विक्रीसाठी तयार होतात. पक्षाची एक जोड़ी 130 रुपयाला तर ठोक मध्ये 50 रुपये प्रति पक्षी याप्रमाणे दर मिळतात. लावा पक्षाचे मास खाण्यास पौष्टिक असून त्यामध्ये प्रथिने, खनिजे, लोह आणि जीवनसत्व भरपूर असतात. तामिळनाडु राज्यातील कन्याकुमारी या जिल्हयात मोठया प्रमाणात लहान शेतकरी लावा फार्मिगं करतात.
मनीषा सावळे, जिल्हा माहिती अधिकारी (भंडारा).

४३८ मुलांचा ' सिंगल फादर '

‘चोर’! - मूल जन्माला आल्यावर त्याला लावलं जाणारं फासेपारधी समाजातलं विशेषण. मतीन भोसले हा या मुलांसारखाच फासेपारधी समाजातला. स्वत:सह या मुलांवरील गुन्हेगारीचा टिळा पुसून काढण्यासाठी तो जिवाचं रान करत आहे. फक्त महाराष्ट्रच नाही, तर इतर राज्यातलीही गावं, पारधी बेडे... जिथं असतील तिथून त्यानं मुलं शोधून काढली अन या मुलांना एकत्र केलं. तुटक - फुटकं का असेना, त्यांच्या डोक्यावर छप्पर दिलं. 


स्वतः जवळचं होतं-नव्हतं ते सगळं विकून प्रसंगी भीक मागून तो या मुलांच्या शिक्षणासाठी, पोटा-पाण्यासाठी झटत आहे. 
अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा हे मतीनचं गाव. त्याचे वडील शिकार करायचे. गावात-परिसरात कार्यक्रम झाल्यानंतर पत्रावळीत राहिलेले उष्टं अन्न जमा करायचे. त्यातून मुलाचं पोट भरायचं. मात्र रोज अन्न मिळेलच याची खात्री नाही. उपासमार ठरलेली. मतीनने दहावी झाल्यावर लगेचच एका सोशल सेंटरमध्ये नोकरी सुरु केली. फासेपारधी समाजातील शाळाबाह्य विद्यार्थी, स्त्री-पुरुष, रोजगार असं सर्वेचं काम त्याला मिळालं. त्याच वेळी गावात राज्य शासनाने पारधी समाजातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या वस्तीशाळेवर निम्न शिक्षक म्हणूनही त्याला काम मिळालं. पुढे २००५ साली त्याने आदीवासी ‘फासेपारधी सुधार समिती’ची स्थापना करून समाजातील लोकांचे जॉब कार्ड, शिधापत्रिका,जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लढा सुरु केला. आपल्या समाजातील लहान मुलांना भीक मागताना पाहून, त्यांचे हाल पाहून अस्वस्थ झालेल्या मतीनने आपली शाळेतील नोकरी सोडली.

समाज बदलायचा तर आधी मुलांना शिक्षित करायला हवं, म्हणून मुलांचा शोध सुरू झाला. ही मुलं, त्यांचे आई-वडील काय करतात हे शोधलं. शिकार हेच त्यांच्या रोजगाराचं साधन होतं. पण, वनसंरक्षण कायद्यामुळे तो आधारही गेला. जगायचं कसं? पोरांपासून आई-वडिलांर्पयत सर्वानीच मुंबई, नागपूर पासून चेन्नई, दिल्लीर्पयत मिळेल ते गाव गाठून भीक मागणं सुरू केलेलं. या प्रत्येक शहरांत फिरून मतीनने १६९ मुले गोळा केली. तब्बल नऊ महिने लागले. स्वत:कडील बकऱ्या विकल्या आणि २००९ मध्ये त्याने ‘प्रश्नचिन्ह’ शाळा सुरू केली.




आज जेमतेम ३५० चौरस फुटाच्या जागेत तब्बल ४३८ मुलांचा सांभाळ तो एकटा करत आहे. इथं मुलांना शिक्षण, डोक्यावर छप्पर आणि पोटभर अन्न मिळत आहे. आपणही काहीतरी करू शकतो, हा विश्वास प्रत्येक मुलाला मिळाला आहे. मुलांना आता ‘प्रश्नचिन्ह’ शाळा आपली वाटू लागली आहे.
अथक प्रयत्नानंतर २०१३ साली आदिवासी फासेपारधी सुधार समिती संचालित 'प्रश्नचिन्ह' आदिवासी आश्रमशाळाही सुरू झाली. मंगरूळ चव्हाळ्यात मुख्य रस्त्याच्या बाजूलाच एका हॉलमध्ये ही शाळा भरते. बाजूला एका कुडात अन्न शिजवलं जातं. पूर्वी कचरा-भंगार गोळा करणारी, भीक मागून, शिकार करून खाणारी, अगदी पाकीटमारी-चोऱ्या करणारी मुलं आता शाळेत धडे गिरवताना दिसतात. काही मुलं दहावी झाली. ती मोठ्या पदावरच्या नोकरीचं स्वप्न बघत आहेत. या मुलांनी हे स्वप्न पाहावं, यापेक्षा मोठा बदल कुठला असू शकतो ?
मतीन भोसले

Monday, 12 December 2016

‘स्वाधार’मुळे अंध शिकले जगणं

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातलं बुधोडा गाव. येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या स्वाधार केंद्रानं अंधांना प्रशिक्षण देत तिथेच स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांना स्वत:च्या पायावर उभं केलं आहे. स्वाधारचं वेगळेपण म्हणजे अंधपणाचे भांडवल न करता सन्मानाने अर्थाजन करीत एकमेकांना आधार देत समूहजीवन जगतात. हरिश्चंद्र सुडे हे सर्वांचे पपा तर सविता सुडे या ममा. या दाम्पत्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून अंधांना आधार आणि स्वाभिमानही दिला. सविता यांचं मागच्या वर्षी निधन झालं. पण त्यामुळे खचून न जाता हरिश्चंद्र सुडे स्वाधार सांभाळत आहेत. राष्ट्र सेवा दल, यदुनाथ थत्ते आणि दादा गुजर यांच्या संस्कारात हरिश्चंद्र सुडे वाढले. 

निलंगा तालुक्यात अंधांसाठी सुरू केलेला प्रकल्प नंतर त्यांनी बुधोडा येथे आणला. १९८७ ते ८८ दरम्यान सुडे यांनी आठ -दहा झोपड्या उभारून अंध प्रशिक्षण व अर्थाजनासह पुनर्वसन कामाला सुरूवात केली. संस्थेत राहून प्रशिक्षण घ्यावे आणि कमवावे, हीच काय ती इथल्या प्रवेशासाठी अट. इथे २५ हातमाग यंत्र आहेत. त्यावर सुंदर अशा सतरंज्या, गालिचे, शाळेसाठी लागणाऱ्या आसनपट्टया तयार होऊ लागल्या आहेत. आता जुन्या साड्यांपासून अत्यंत सुंदर व कलात्मक गालीचे, सतरंज्या विणण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. लातूर शहरातील मिनी मार्केटमध्ये एका गाळ्यात विक्रीकेंद्रही उघडलं आहे.
यातून अंधांना महिन्याकाठी तीन-साडेतीन हजार रुपयांपर्यंतची मिळकत येते. शिवाय अंध व्यक्तींना अॅतक्युप्रेशर मसाज करण्याचं प्रशिक्षण देऊन मसाजसेंटर देखील सुरू केले आहे. अंध व्यक्ती अत्यंत कुशलतेने मसाज करतात. 
केंद्रात अंध स्त्री-पुरुषांना मोफत प्रवेश आहे. राहायची, भोजनाची सोय आणि रोजगारप्रशिक्षण दिलं जाते. तिथेच कामही मिळते. सुडे यांनी या ठिकाणी काम करणाऱ्यांचे आंतरजातीय विवाहदेखील लावून दिले आहेत. येथील अंधांना जगण्याचा आत्मविश्वास मिळाला की ते आपापल्या गावी परत जातात आणि सन्मानाने ताठ मानेने जीवन व्यतीत करतात.
सुडे म्हणतात, "स्पर्शज्ञानातून अंधांना स्वावलंबी बनविण्याचं काम करतो. त्यातून अनेक अंध उभे राहिले आहेत. गेल्या ३० वर्षांत हजारो अंध सन्मानजनक अर्थाजन करीत जगणं शिकले आहेत. आता मुलगा प्रशांत या कामात साथ देत आहे".


लेखक: शिवाजी कांबळे, लातूर.