Wednesday, 5 April 2017

शिक्षणाचं महत्त्व उमजलं

बापू तुकाराम तर्टे यांचा केडगाव (अहमदनगर) बस स्टँडवर १५ वर्षांपासून चहाचा व्यवसाय. त्यांच्यासोबत असतात भक्कम साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी शकुंतला. बापू सांगतात, ‘आधी मी एका कंपनीत काम करत होतो. पण कंपनी बंद पडली अन हा व्यवसाय सुरु करावा लागला’.
बापूंना दोन मुलं. मुलीचं लग्न करून दिलेलं. मुलगा परशुराम आधी पेट्रोल पंपावर काम करत होता. पण त्यातली अस्थिरता, १२ तास काम करूनही मिळणारा अपुरा पगार. मग त्यानंही बापूंच्या ठेल्याच्या बाजूलाच सरबताची गाडी लावली अन बापूंच्या पावलावर पाऊल ठेवले.
बापू सांगत होते, ‘घराचं भाडं तीन हजार अन लाईट बिल पकडून चार हजार हा ठरलेला खर्च. धंदा कधी होतो तर कधी नाही. तर अशा परिस्थितीत कशी गुजराण करायची’.
बापूंचा १५ वर्षाचा नातूही त्यांच्याकडेच शिक्षणासाठी राहिला आहे. त्याचं दहावीचं वर्ष. सगळे बापूंना सांगतात, की बापू त्याला अभ्यास करू द्या. त्याचं महत्वाचं वर्ष आहे. अर्थात बापूंची बंद पडलेली कंपनी, चालू करावा लागलेला व्यवसाय आणि घर परत उभं करणं हे सगळच बापूंना जाणवतं. त्यातूनच लोकांनी सांगितलेलं शिक्षणाचं महत्व आता त्यांना पटलं आहे. आपण किंवा मुलगा शिकला असता तर आज आपली परिस्थिती वेगळी असती याची जाणीवही बापूंना असल्याचं जाणवतं. ‘आज शिकलो असतो तर ही वेळ आली नसती’ बापू बोलून दाखवतात. 
- मनोज आहेर, मुंबई

माझा प्रवास - आर्थिक स्थैर्याकडे

 मी गणेश नवनाथ चौधरी. उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यातील निपाणी गावचा. घरची जिरायती शेती. तीन भावंडांत थोरला. म्हणूनच बारावीनंतर गावकर्‍याच्या ओळखीने पुणे गाठलं. दोन वर्षे सेंटरिंग, वायरिंग इत्यादी कामं करून महिन्याला चार हजारपर्यंत कमवू लागलो. 
एक दिवस शाळासोबती सूरज निपाणीकरचा फोन आला. किल्लारी, लातूर येथे पेस (PACE) संस्थेचं बार-बेंडिंग (सळई फिटर) हे तीन महिन्यांचं प्रशिक्षण शिबीर होतं. तिथं मी प्रवेश घ्यावा अशी त्यानं गळ घातली. प्रशिक्षण पूर्ण केलं. रायगड जिल्ह्यात साईगावला कामाला सुरुवात केली. माझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली होती. नंतर मुंबईत गोरेगावला एका प्रकल्पामध्ये सुपरवायझर म्हणून काम मिळालं. आता तीस हजार रुपयांपर्यंत कमाई पोहोचली होती. मग गावाकडे बोअर वेल घेतली. जमिनीत काळी माती टाकली. वांगी, गहू, हरभरा अशी पिके घेऊ लागलो. म्हशी घेतल्या. भावांच्या शिक्षणाला मदत करू लागलो. यापुढे शेतीला पूरक कुक्कुट आणि शेळी पालन सुरु करण्याचा विचार आहे.
२०१२ मध्ये परत एकदा सूरजचा फोन आला. केडगाव, अहमदनगर येथील ‘पेस’ केंद्रात बार-बेंडिंग डेमॉन्स्ट्रेटरचं काम होतं. पेसमुळेच मला आर्थिक स्थैर्य लाभलं होतं. ही संधी दवडणं शक्यच नव्हतं. संस्थेत काम करू लागलो. माझ्यासारख्या अनेक तरुणांना थिअरी आणि प्रात्याक्षिकं शिकवू लागलो. एक चक्र पूर्ण झालं. आता इथं येणाऱ्या मुलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष हातभार लावतो आहे. ‘पेस’ सेंटरमध्ये चालवले जाणारे मेसनरी वर्क आणि बार-बेंडिंग हे दोन निवासी कोर्स ‘प्रथम’ आणि ‘L & T Charitable Trust’ कडून पूर्णपणे मोफत आहेत. ते जीवनकौशल्य मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकासावर भर देतात.
इथं शिकलेल्या विद्यार्थांचे आता फोन येतात. त्यांचं भरभरून बोलण ऐकतो तेव्हा माझा इथे काम करण्याचा निर्णय योग्य होता याची जाणीव होते. एका अनस्कील्ड वर्करपासून डेमॉन्स्ट्रेटरपर्यंत असा आर्थिक स्थैर्याच्या दिशेने प्रवास ‘पेस’मुळे शक्य झाला.
PACE (पेस) च्या या कोर्सविषयी अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क साधावा - ८८८८२२७०८८
- हर्षल खाडे, पुणे

त्यांच्या धैर्याला सलाम !

सहकाराचं मोठं जाळं असलेला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा. आर्थिक दृष्ट्या संपन्न जिल्हा समजला जात असला, तरी गरिबीशी झुंजणारे लोक इथे कमी नाहीत. या जिल्ह्यात पुणे-नगर हायवेवरचं चास नावाचं छोटं खेडं.
शहरालगत वसलेल्या याच गावात राहणारं जाधव कुटुंब. ८० वर्षाचे गंगाराम आणि ७५ वर्षांच्या त्यांच्या पत्नी सीताबाई जाधव.
पिढीजात गरीबी, राहायला स्वतःचं घर नाही. दुसऱ्याच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी आपला संसार मांडलेला. पोटापाण्याचं एकमेव साधन म्हणजे जेमतेम एकरभर शेती. हलाखीपायी दोन मुलींचं लहानपणीच लग्न लावून दिलेलं.
गंगाराम आणि सीताबाई कबाडकष्ट करुन आपला संसार चालवत होते.
एक दिवस अचानक गंगाराम यांचा मोठा अपघात झाला. त्यात त्यांचा एक हात अन् एक पाय गंभीर जखमी झाला. ते अंथरूणाला खिळून पडले. घरात पैसा नाही, कोणाचा मानसिक आधार नाही. या परिस्थितीतदेखील त्यांच्या पत्नी सीताबाई खचल्या नाहीत. त्यांनी हातात नांगर धरला. नवऱ्याची अहोरात्र सेवा करत करत त्यांनी स्वतः शेती करण्यास सुरुवात केली.
औषधखर्चासाठी जवळ असलेल्या ६ पैकी ४ शेळ्या विकाव्या लागल्या. एका एकरमध्ये पहिल्या वर्षी त्यांनी कांदा आणि लसूण लावला. कांद्याला भाव न मिळाल्याने तो सडला आणि अक्षरशः फेकून द्यावा लागला. पण सीताबाईंनी जिद्द सोडली नाही. आठवडी बाजारात जाऊन त्या लसूण विकत असत आणि सोबतच इतरांच्या शेतात मजुरीकाम करुन मिळणाऱ्या पैशातून नवऱ्याचं औषधपाणी करत.
जिद्द, कष्ट यांना या वर्षी निसर्गाचीदेखील साथ मिळाली. चांगला पाऊस झाल्याने गव्हाचं चांगलं पीक आलं. त्यासोबतच लसूण आणि कांद्याचं उत्पन्नही मिळालं. आता गंगाराम यांच्या तब्येतीत पण चांगला फरक पडलाय. ते आता चालु-फिरु शकत आहेत.
एकामागून एक संकटं येऊनसुद्धा, कोणाचाही आधार नसताना सीताबाई ठामपणे उभ्या राहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी मनात एक उमेद जागृत ठेवली. त्यांच्या धैर्याला सलाम !
धैर्या सीताबाई - कौशल खडकीकर, बीड

Monday, 3 April 2017

“संघटनेची गाडी ऽऽ ऽऽ पुढे...

‘पोलिस’ ही संकल्पना प्रतिकच्या बालमनावर कोरली गेली होती. तो पोटात असतानाच दोनदा तुरुंगवास, १९ दिवसांचा असताना अटक झालेली. नैसर्गिक संसाधनांवर आदिवासींचा अधिकार, विस्थापितांचं न्यायपूर्ण पुनर्वसन यासाठीच्या चळवळीने भारावलेले आम्ही. मोर्चे सततचे. पोलिसांकडे दगड भिरकावत प्रतिक त्यांना सांगायचा, “तुम्ही आम्हाला नको..आमच्या माणसांना तुम्ही त्रास देता.” “संघटनेची गाडी ऽऽ ऽऽ पुढे... पोलिसांची गाडी ऽऽ ऽऽ मागे ऽऽ...” हे खेळातही चालायचं. हा तिरस्कार घालवण्याची संधी एकदा आली. संघटनेच्या दशकपूर्ती कार्यक्रमात एक मोठे पोलिस अधिकारी मंचावर होते. प्रतिकला म्हटलं, “बघ, तेही पोलिस आहेत नि आपल्याबरोबर बसलेत. म्हणजे पोलिस चांगले असतात.” तर तो थेट मंचावर आला. म्हणाला, “आधी खाली उतरा ! आमच्या आदिवासी मोर्चेकऱ्यांना तुम्ही त्रास देता.” पालकत्वाची अशी काही किंमत चुकवावी लागेल, असं कामात झोकून देताना वाटलंच नव्हतं ! 
सन २०००. सरदार सरोवराची उंची वाढवण्यास हरकत नसावी, असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय. त्यावर आदिवासींच्या पुनर्वसनाच्या आंदोलनासाठी आम्हाला दिल्लीला जावं लागलं. १९ दिवसांच्या प्रतिकला मी ज्यांच्या भरवशावर सोडून गेले, त्या कम्युनबद्दल सांगायलाच हवं. १९९३ पासून आम्ही कार्यकर्ते नंदुरबारला कम्युनमध्ये राहातो. यात मी आणि संजय महाजन हेच एकमेव विवाहित जोडपं नि प्रतिक एकमेव अपत्य. “दिल्लीला निर्धास्त जा...आम्ही बाळाला सांभाळू..” असं सर्वांनी सांगितल्यामुळेच मी चळवळीची निकड पूर्ण करू शकले. त्यांनी बाळाला छान सांभाळलं. गरोदरपणातल्या तुरुंगवासामुळे बाळाला आलेलं आजारपणही काढलं. बाळानं दूध प्यायला सुरुवात केली की ते अन्ननलिकेतून उडून श्वासनलिकेत जायचं, न्युमोनिया व्हायचा. म्हणून माझं दूध काढून बाळाला पाजावं लागायचं. यातले व्यापताप स्मितानं सांभाळले. ती, दीपाली, सुजाता या नेतृत्वगुण असलेल्या, स्वतंत्र विचारांच्या, संसाराचा अनुभव नसलेल्या. पण बाळाला सांभाळण्यात खोट नव्हती. त्यांनी पोषक आहाराचा तक्ता केला. हयगय माझ्याकडूनच व्हायची. माझ्यात आईसुलभ नाजुक भावना मुळातच कमी. मग खटके उडायचे. मुली म्हणायच्या की तू बाळाकडे नीटसं लक्ष देत नाहीस. अगदी लहान असताना तो घरातल्या प्रत्येकच स्त्रीला ‘आई’ म्हणायचा. आज मला जाणवतं की मी प्रतिकला जन्म दिला. पण त्याची खरी आई संजयच. आजही तो मोकळा होतो बाबाकडेच ! आई म्हणजे घरातला बाहेर जाणारा सदस्य, असं त्याच्या मनात असावं... कारण तो म्हणायचा, “आमच्याकडे टीव्ही नाही कारण माझी ‘आई’ गरीब आहे.” 
दुसरीत असताना टिळक पुण्यतिथीच्या भाषणाच्या वेळी त्याने अट घातली की तू ‘पालक’म्हणून यायचं, पाहुणी म्हणून नाही. प्रत्यक्षात मुख्याध्यापकांनी मला मंचावर बसायला लावलं. प्रतिकच्या भाषणाची वेळ आली तेव्हा तो म्हणाला, “मी लोकमान्य टिळकांना वंदन करतो. मी भाषणाची तयारी केलीय पण आईनं अट पाळली नाही म्हणून मी भाषण करणार नाही.”
कार्यकर्त्यांचं अपत्य म्हणून त्याचं शिक्षणही वेगळं. तळोद्यात आदिवासी नृत्य शिकला. घरी मराठी भाषा. नंदुरबारमध्ये गुजरातीचा प्रभाव. येणारे पाहुणे इंग्रजी, हिंदीत बोलणारे. या सर्व भाषा त्याला यायच्या. शिवाय अहिराणीसुद्धा.
शहरातल्या नातेवाईकांना त्याला मुख्य प्रवाहात न्यायचं होतं. त्याला जळगावला शिक्षणासाठी ठेवलं. मुख्याध्यापक असलेल्या माझ्या सासूबाईंनी तिथं बदली घेतली. संजयही त्याच्यासोबत राहिला. हा निर्णय माझ्या, प्रतिकच्या मनाविरुद्ध होता. समुपदेशकांच्या मदतीनं त्याचे तिथले दिवस आनंदी करावे लागले. त्या इंग्रजी शाळेत प्रवेशपरीक्षा होती. प्रतिकचा पेपर कोराच. तळोद्यात तो मराठीत शिकलेला. ही प्रश्नपत्रिका त्याला पूर्णपणे अनोळखी ! तेव्हा लक्षात आलं, प्रतिक हा त्या मुलांचा प्रतिनिधी आहे, ज्यांना कधी शिकवलंच जात नाही... शाळेत मास्तरच जात नाहीत... स्वातंत्र्य ज्यांच्यापर्यंत पोचलेलंच नाही! आणि त्यांना आपण नापास, ड्रॉपआऊट ठरवत सिस्टिमबाहेर काढतो! तळोद्यातल्या मुलांच्या शिक्षणासाठी कामाची प्रेरणा देणार्‍या घटनांपैकी ही एक.
संघटनेचं काम, माझं नेतृत्व विस्तारत असताना संजयने स्वतःतल्या कार्यकर्त्याला मुरड घालत पालकपण पेललं. मुलाची पौगंडावस्थेतली भावनिक आंदोलनं झेलली.
जळगावच्या शाळेत नंतर प्रतिक पहिलाही आला. वाचन करू लागला. चौथीपासून तो संजयसह पुण्यात आहे. शाळा प्रयोगशील, नावाजलेली. पण सधन कुटुंबातल्या मुलांनी सुरुवातीला प्रतिकला सामील करून घेतलं नाही. नंतर क्रिकेटमधलं कौशल्य, वर्गमित्रांच्या समस्या सोडवण्यात मदत यामुळे तो हवाहवासा झाला. आता त्याचं वाचनवेड चांगलंच वाढलं आहे. दीड हजार पुस्तकांची त्याची स्वत:ची लायब्ररी आहे. यंदा दहावीची परीक्षा देत असलेल्या प्रतिकला पुढे आर्थिक प्रश्नांच्या मुळाशी जाण्यासाठी अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घ्यायचंय.
मी सामाजिक वर्तुळ स्वेच्छेनं निवडलं. परिवार मोठा असल्याचं समाधान कौटुंबिक पातळीवर बरीच किंमत मोजून मला मिळालं आहे.
प्रतिभा शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा या आदिवासी संघटनेच्या प्रमुख
शब्दांकन: सुलेखा नलिनी नागेश

कृषी पर्यटन आलं, भविष्य घडू लागलं

एखाद्या फार्मवर बैलगाडी, ट्रक्टर सैर करायची, हुरडा खायचा किंवा क्वचित कुणाच्या शेतात खास भातलावणीसाठी जायचं, ही झाली शहरात राहणाऱ्यांसाठी शेताची ओळख. आणि शहराच्या आसपास राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा झाला किफायतशीर व्यवसाय. सध्या पुण्या-मुंबईच्या आसपास तर अशा ऍग्रो टुरिझमचं पेवच फुटलेलं आहे. 
या शहरांपासून कोसो दूर असलेलं चंद्रपूर. इथल्या राजुरा गावातल्या चार तरुणांनी कृषी पर्यटनाचा प्रयोग त्यांच्या गावातच सुरु केला आहे. त्यातून त्यांनी बेरोजगारीवर मात केलीच शिवाय लोकांसमोर आदर्शही निर्माण केला आहे. सुहास आसेकर, नितीन मुसळे, रिंकू मरस्कोल्हे, रुपेश शिवणकर ही त्यांची नावे. नितीन सांगतात, पश्चिम महाराष्ट्रात कृषी पर्यटनाला मोठे वलय आहे़ दरवर्षी आम्ही काही मित्र पश्चिम महाराष्ट्रात फिरायला जायचो. त्यावेळी तिकडील कृषी पर्यटनाला आवर्जुन भेट द्यायचो. विदर्भात मात्र, कृषी पर्यटनाविषयी शेतकरी फारसे जागृत नाहीत. त्यामुळे विदर्भात असा काही प्रयोग करता येईल का? हे आमच्या मनात होते. एका मित्राची पडिक जमीन होती. तिथं हा प्रयोग करायचा असे ठरलं आणि त्यासाठी आम्ही चौघे एकत्र आलो. अजूनही कामं सुरू आहेत. मात्र, आमचे कृषी पर्यटन पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, येथे अनेक नागरिक पर्यटनाचा आनंद लुटायला येऊ लागले आहेत.
एकीकडे चांगले पीक होत नाही, पिकाला भाव नाही, कर्ज कसे फेडायचे ही विवंचना. तरीही शेतकऱ्यांना या युवकांनी शेतीविकासाचा धडा दिला. आणि त्यातून रोजगारही उपलब्ध केला आहे. 
आज अनेक पर्यटक त्यांनी फुलविलेल्या शेतीत पर्यटनाला जात आहेत. या तरूणांकडे शिक्षण आहे. पण नोकरी नाही़. मग नुसतेच रडत बसण्यापेक्षा काही तरी नवीन करून दाखवायचे या उद्देशाने त्यांनी एकत्र येत पडिक शेत विकत घेतलं. राजुरापासून आठ किमीवरच्या चनाखा येथे त्यांनी शेती घेतली. इथंच आल्याचं विक्रमी उत्पादन घेतलं आणि बाकी शेतकऱ्यांचं लक्ष या मुलांकडे वेधलं गेलं. मग याच शेतीला त्यांनी कृषी पर्यटनाची साथ दिली. शेतात त्यांनी लहान मुलांकरिता बैलबंडीची सैर, झाडावरील झुले, कॉर्न पार्टी असा उपक्रम राबवून शेताला पर्यटनाचे स्थळ बनविण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांसाठी खेळण्याचे मैदान, मोठ्यासाठी खेळण्याचे साहित्य, मचाण अशा गोष्टी शेतात तयार केल्या आहेत. बच्चेकंपनीसह मोठेही या शेतात पर्यटनासाठी येत आहेत.
पर्यटकांकडून प्रवेश शुल्क घेतले जाते. शिवाय शेतात हुर्डा पार्टी, जेवण आदी तयार करून दिले जाते. त्यामुळे पर्यटकांचा ओघ कृषी पर्यटनाकडे वाढला आहे. आणि या तरुणांना रोजगारही गवसला आहे.
प्रशांत देवतळे.

वाचनगोडी लावणारे कडगे काका

वाचनसंस्कृती जपली पाहिजे..मराठी भाषा जगली पाहिजे.. वाचेल तो वाचेल.. वगैरे बोलणारे अनेक. पण पदरमोड करून, वाचकांना पुस्तकं विनामूल्य घरपोच पुरवत गेल्या २० वर्षापासून वाचनसंस्कृती जपणारा एखादाच. तोही सत्तरीचा ‘तरुण’. नांदेडचे बसवराज शंकरअप्पा कडगे. फुफ्फ्साची शस्त्रक्रिया, श्वास घेण्याचा त्रास, खांदेदुखी हे सारे विसरून आपल्या सायकलवर पुस्तकांचा गठ्ठा घेऊन लोकांना वाचनगोडी लावणारे. 
बसवराज उदगीरचे. शासनाच्या सिंचनविभागात ड्राफ्टमन म्हणून नोकरी मिळाल्याने नांदेडला स्थायिक झाले. नोकरीला १५ वर्षे शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी पत्नीसोबत गुंतवणूक सल्लागार व्यवसाय सुरू केला. सुखसंपन्न आयुष्य जगत असताना आपल्याकडील पैशाचा आणि वेळेचा सदुपयोग करण्याचे ठरवून सायकलवर घरपोच पुस्तकसेवा देणे सुरू केले. आणि नांदेडमधल्या वाचकांचे कडगेकाका बनले.
“पालक-मुले टीव्हीचे वेडे झाले आहेत. ते काहीच वाचत नाहीत. त्यांना चांगली पुस्तके वाचायचा आग्रह धरून वाचनसंस्कार जपण्याचा आणि समाजऋण फेण्याचा प्रयत्न करावा असं ठरवून मी हे काम सुरु केलं,” ते सांगतात. 
१९९८ साली परळीला भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातल्या पुस्तक प्रदर्शनातून तीन हजार रुपयांची दोनशे पुस्तके विकत घेऊन ते नांदेडला परतले. “माझी हौसमोज करायला तुमच्याकडे पैसे नसताना ही पुस्तके घ्यायला कुठून पैसे आले?” पत्नीने जाब विचारला. त्याकडे दुर्लक्ष करत ते कामाला लागले. 
लोकांना सांगू लागले, “तुमच्याकडे धन आहे. आरोग्यधनही आहे. पण चांगलं विचारधन साठवायला तुम्ही काय केलं आहे? तुम्ही काय वाचता? तेव्हा लोक म्हणायचे, “आम्ही काहीच वाचत नाही. त्याने काय फरक पडतो?”
कडगे सांगत, “गांधीजींनी ‘अन टू दी लास्ट’ हे पुस्तक वाचलं आणि त्यांचं जीवन बदललं. विवेकानंदांचं चरित्र वाचून एक सैनिक समाजसेवक अण्णा हजारे झाला. विनोबा भावे, वि.दा.सावरकर अशा थोरामोठ्यांच्या जीवनावर झालेले वाचनसंस्कार माहीत नाहीत का? विचारधनाची शिदोरी नसेल तर तुम्ही खरे समाधान मिळवू शकणार नाही. मी तुम्हाला मोफत चांगली पुस्तके घरपोच देतो. ती वाचून मला परत करा.” सुमारे तीनशे कुटुंबाना ते चांगली पुस्तके पुरवत आहेत. याखेरीज त्यांच्या तीन हजार दर्जेदार पुस्तकांच्या ग्रंथालयाचा लाभ सुमारे दोन हजार लोक नियमितपणे घेत आहेत. सरकार सार्वजनिक ग्रंथालय काढायला अनुदान देते. पण कुठलीच सरकारी मदत न घेता कडगेकाका हे काम करत आहेत. कोणी आपल्याजवळचे चांगले ग्रंथ आणून दिले तर ते दान म्हणून स्वीकारतात. नांदेडमधल्या सर्वात जुन्या, स्वातंत्र्यसेनानींनी स्थापलेल्या विचार विकास वाचनालयाला अनेक दानशूर लोकांकडून त्यांनी ग्रंथ मिळवून दिले आहेत.
 “हे काम कष्टाचे आहे. पण वाचकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला समाधान मिळतं. तीच माझ्या जगण्याची उर्जा आहे”, कडगेकाका सांगतात.
कडगेंचा दिवस जिथे सुरू होतो त्या अंबिका योग कुटीर मधले साधक, नांदेडमधले विद्यार्थी, सामाजिक संस्था, उद्योगपती, बूटपॉलीश आणि चप्पलदुरुस्तीचं काम करणारा धीराजी देशमाने, कपडेधुलाईचं काम करणारा शेख गणी, एटीएमचे सुरक्षारक्षक असे अनेकजण कडगे काकांच्या पुस्तकसेवेचा लाभ घेत आहेत.
- सु. मा. कुळकर्णी.

‘तुम्ही पुढे जा

‘तुम्ही पुढे जा. मदत लागलीच तर मी तुमच्या आसपास आहे...’ इतकंच सूत्र मी ठेवलं आहे. नीरद आणि दीया दोघांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणं आणि त्यांची नावं काय असावीत, असे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके निर्णय केवळ मी आणि सुमीतनं मुलांच्या वतीनं घेतले. त्यांच्या आयुष्याची दिशा त्यांनी ठरवावी, हे मत आम्ही जगत आलोय. आम्ही दोघं सश्रद्ध, तर मुलं नास्तिक. हे आम्ही करू शकलो. याचं कारण आमचे पालक. आम्हा दोघांच्या पालकांनी आम्हाला आमच्या जगण्याबाबतच्या गोष्टी ठरवण्याची मुभा दिलेली होती.
माझं आणि सुमीतचं पालकत्व आम्ही आईबाबा होण्याआधीच घडायला सुरुवात झाली होती. आमच्यापेक्षा वयानं मोठ्या मावस-चुलत भावंडांच्या मुलांना खेळवण्याची, सांभाळण्याची संधी आम्हाला मिळाली होती. मुलांची मानसिकता हाताळण्याची सवय होती. एकत्र कुटुंबपद्धतीत वाढलो नाही, तरी कौटुंबिक संमेलनांच्या निमित्तानं आम्ही सर्व नातेवाईक वरचेवर एकत्र येत असू.
 मुलांनी आम्हाला खूप काही शिकवलं. नीरद अडीच वर्षांचा असतानाची गोष्ट. माझी आई सामान घेऊन चार जिने चढून घरात आली; तेव्हा नीरदनं विचारलं, ‘दमलीस का?... कसा झाला प्रवास?’ बाहेरून घरात आलेल्याची विचारपूस करणं हे इतकं मुरलेलं असेल... मलाही कल्पना नव्हती.
साध्या मराठी शाळेमुळे दोघांच्या अवतीभवती हायफाय वातावरण नव्हतं. पण घरी मर्सिडिज, स्कोडा आहे. मुलांचे वर्गमित्र चालत किंवा रिक्षानं येणारे. मुलांनी मला त्यांना कधीही गाडीनं शाळेत सोडू दिलं नाही.
‘मी निघालेच आहे, वाटेत तुला सोडते,’ असं म्हटलं तर दीया यायची पण ‘शाळेच्या अलीकडच्या गल्लीत मला उतरव’, म्हणायची. स्वत: विचार करून कृती करणं हे मुलं लहान वयात करू लागली. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाल्याचं हे फळ.
मुलांना हवं ते करायला मिळावं म्हणून काही वेळा पठडीशी झगडावं लागलं. नीरदचा कल संगीताकडे. मात्र गणितात तो जीनिअस. आठवीपासून पेटी वाजवण्यात, पिआनो शिकण्यात रस घेणाऱ्या नीरदच्या शिक्षकांना मात्र त्यानं इंजिनीअरिंग हेच करियरसाठी निवडावं, असं वाटायचं. शिक्षक सतत मला म्हणायचे, “पालक म्हणून तुम्ही हस्तक्षेप करा. तुम्ही मुलाचं नुकसान करताय! आर्टिस्ट होऊन काय होणार?” आपण एका कलाकाराशी बोलतोय, याचं भान त्यांना नसावं! पण सायन्स फक्त बारावीपर्यंत करण्यावर नीरद ठाम होता.
नीरद शाळकरी होता तेव्हा ‘मार्क मिळवणं’ त्याला आवडायचं. दीयाला मार्कांच्या मागे लागणं आवडायचं नाही. ती क्रीडापटू आहे. पण शाळेत तिचा हा गुण फारसा महत्त्वाचा मानला गेला नव्हता. शिक्षकांनी दोघा भावंडांमध्ये तुलना करणं सुरू ठेवलं. मग मी दीयाची शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. तिला केवळ दीया म्हणून बघितलं जाईल, तिची गुणवत्ता इतर कोणाशी तुलना करून ठरवली जाणार नाही, अशा ठिकाणी तिचं शिक्षण व्हावं, असं ठरलं. हे सगळं होत असताना दीया मात्र अजिबात कोमजलेली नव्हती. एसएससीला ९३ टक्के मिळवणाऱ्या भावाचा तिला अभिमान होता. ती तो फार प्रेमानं व्यक्तही करायची. शिक्षकांबद्दलही तिला अढी नव्हती, प्रेमादरच होता.
पुढे ‘गुरुकुला’मध्ये तिला निकोप वातावरण मिळालं. आधीच्या शाळेतल्या शिक्षकांना ती पास होईल की नाही, याची चिंता असायची. पण नव्या शाळेतून ती एसएससीला ७५ टक्के मिळवून पास झाली. या शाळेत तिच्यातल्या क्रीडापटूला वाव मिळाला. स्किपिंगमध्ये तिनं राष्ट्रीय पातळीवरचं रौप्यपदक मिळवलं. आपल्याकडे हा खेळ फारसा लोकप्रिय नसतानाही तिनं केवळ तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हे यश मिळवलं. तिनं गायन, फोटोग्राफीतही प्राविण्य मिळवलंय, याचं समाधान आहे. सिनेमॅटोग्राफर होण्याचं स्वप्न ती आज १६व्या वर्षी पाहतेय. फक्त गरज वाटेल तेव्हाच मुलांच्या व्यवहारांत लक्ष घालणं हे मला बऱ्यापैकी जमलंय, असं वाटतं. 
चिन्मयी सुमीत, सुप्रसिद्ध अभिनेत्री

 (शब्दांकन : सुलेखा नलिनी नागेश)