Sunday, 14 May 2017

सोशल मिडियाबद्दल पसरलेल्या निगेटिव्हिटीला ‘नवी उमेद’ हे प्रभावी उत्तर

नवी उमेद वर्षपूर्ती 
टीमचं मनोगत
सोशल मिडियाबद्दल पसरलेल्या निगेटिव्हिटीला ‘नवी उमेद’ हे प्रभावी उत्तर आहे :
आशय गुणे,`नवी उमेद' टीमचे अनौपचारिक मार्गदर्शक, प्रथम या संस्थेत कार्यरत.
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या एका संध्याकाळी मला मेधाताईंचा फोन आला. "अरे आशय, आम्हाला 'संपर्क'चे फेसबुक पेज चालविण्यासाठी कुणीतरी हवे आहे. तुझ्या ओळखीचे कुणी आहे का?" मी क्षणभर विचारात पडलो. पण मग म्हटलं, "मीच करतो की!" आणि मी प्राथमिक कामाला सुरुवात केली. ‘संपर्क’मध्ये हेमंत कर्णिक आहेत, हे मला त्याच दिवशी कळलं. ते माझ्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये होते, पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती.
हे सगळं अगदी मागच्याच वर्षी झाले आहे, ह्यावर खरं तर विश्वासच बसत नाही. 'नवी उमेद'च्या टीमसोबत जुळलेलं 'ट्युनिंग' हे खूप आधीपासून आहे, असं वाटतंय.
सोशल मीडिया, आणि विशेषतः फेसबुक हे आज अतिशय महत्वाचे माध्यम आहे. पण हे किती लोकांच्या लक्षात येते? आपण सगळेजण फेसबुकवर सक्रीय असतो. अनेक विषय वाचतो आणि त्या विषयांवर आपले मतदेखील व्यक्त करतो. पण आपल्या ह्या मताद्वारे आपण काही विधायक करू शकतो का? इंटरनेट हा माहितीचा साठा आहे, हे मान्य. पण ह्या माहितीची किंवा त्यातून सुचत असलेल्या कल्पनांची देवाणघेवाण झाली तर? तर हे नक्कीच आपल्या सर्वांच्या फायद्याचे ठरेल. शिवाय, सोशल मिडियाबद्दल जी काही निगेटीव्हीटी समाजात पसरलेली आहे त्याला हा असा सकारात्मक वापर, हे नक्कीच एक प्रभावी उत्तर असेल.
आणि म्हणता म्हणता एक प्लॅन तयार झाला. पेजसंबंधित कामं आणि माहिती ह्यासाठी एक विशेष ग्रुप वॉट्सअप वर तयार झाला. पॉझिटिव्ह स्टोरीज पेजवर शेअर अथवा प्रकाशित करायच्या, हे ठरल्यानुसार सुरू झालं. त्याला थोडा प्रतिसाद मिळू लागला. आणि मग वाटलं, जर आपलं पेज महाराष्ट्रातून चांगल्या घडामोडी एकत्रित करण्याचा एक प्लॅटफॉर्म म्हणून समोर आलं तर?
संपर्कचे काही कार्यकर्ते, पत्रकार होतेच. त्यांचा संस्थेशी ऋणानुबंध असल्यामुळे त्यांनी हे काम सुरुवातीला हाती घेतलं. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागातून सकारात्मक घडामोडी येऊ लागल्या. आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग आणखी काही जिल्ह्यांतले पत्रकार टीममध्ये सामील झाले. स्टोरीला लाईक्स मिळू लागल्या आणि लोकं त्या शेअर करू लागले. ह्याचा अर्थ असा की फेसबुकद्वारे सकारात्मक गोष्टी 'शेअर' होऊन अनेक लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. आणि आमचा उत्साह वाढला. आम्ही लगेच जून महिन्यात फेसबुक वापरण्याबद्दल आमच्यातच एक वर्कशॉप घेतलं. आमच्या ह्या मित्रांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि आता सगळे फेसबुकवर सक्रिय झाले आहेत.
दरम्यान मी माझा फोन नंबर नवी उमेद पेज च्या 'contact us' मध्ये टाकला. कधी कधी फोन येतो, "नमस्कार, मी लातूरहून बोलतो आहे. सोलापूरच्या अबक ह्यांनी लिहिलेली स्टोरी वाचली. आवडली. मला माझ्याकडे तिचे अनुकरण करायचे आहे. त्यांना संपर्क करायचा आहे...” पेजचा उद्देश सफल होताना पाहणं हा नक्कीच एक वेगळा आनंद आहे!

Thursday, 4 May 2017

पोस्टवरच्या लाइक्सपेक्षा इंपॅक्ट महत्वाचा, हे कळलं

नवी उमेद वर्षपूर्ती 
टीमचं मनोगत
बघता बघता नवी उमेदला आणि मलाही उमेदसोबत काम करायला लागून एक वर्ष पूर्ण झालं. नेहमीपेक्षा वेगळं काम म्हणून ही जबाबदारी घेतली. पेजचं काम सुरू केलं तेव्हा मी कुणा मित्र-मैत्रिणींचे फोटो लाईक करणं, क्वचितच कमेंट करणं, जुन्या शाळा-कॉलेजातल्या मित्र-मैत्रिणींशी पुनर्भेट एवढ्यापुरतंच फेसबुक वापरत होते. जरा नवीन कुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली तरी ओळखीचं नसताना नकोच ऍक्सेप्ट करायला, असा विचार करायचे. 
नंतर जसं रोज फेसबुकवरचं पेज हँडल करायला लागले तशी मला या माध्यमाची ताकद जाणवायला लागली. म्हणजे एक पोस्ट होती, ‘मुलींच्या नावाच्या पाट्या’ ही. ती प्रसिद्ध झाली. नंतर एक-दोन दिवसातच पोस्टनायक दादाभाऊ जगदाळे यांचा फोन आला. त्यांच्या कामाविषयीची पोस्ट शेअर होत होत जालना सीईओपर्यन्त पोचली होती. त्यांनी त्याच दिवशी दुपारी दादाभाऊना बोलावून घेतलं, त्यांचं कौतुक केलं आणि जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. दादाभाऊ अगदी भारावून गेले होते. तुमच्यामुळे आणि नवी उमेदमुळे हे घडू शकलं, असं म्हणत राहिले. या प्रसंगामुळे माणसाला पाठिंब्याची, पाठीवर कुणाचा तरी हात असण्याची किती गरज असते आणि त्यातून पुढं काम करायचीही ऊर्जा मिळत राहते, हे जाणवलं. अर्थातच ती ऊर्जा माझ्यापर्यंतही पोहोचली.
माझं काम आलेल्या लेखांच्या संपादनाचं, तो थोडक्या शब्दांत पोस्टमध्ये रूपांतरित करायचा. लेख अशासाठी म्हणते, कारण माझ्यासह सगळ्यांनाच भारंभार लिहायची सवय. पण निरीक्षणातून हे लक्षात आलेलं की ‘रीड मोअर’ आलं की वाचक पुढे जात नाहीत. इतका पेशन्स आता कुणामध्येच नाही. म्हणून मग पोस्ट 700-800 वरून 500 शब्दांपर्यत आणली. फेसबुकने सांगितलं की वाचकांमध्ये मोबाईलवर वाचणारे अधिक आहेत. मग मोबाईलच्या स्क्रीनवर पटकन वाचता येणारी छोटीच गोष्ट हवी हे लक्षात आलं. जास्त शब्दांत आपण जेवढा आशय व्यक्त करतो तोच कमी शब्दातही सांगू शकतो हे मला तेव्हाच जाणवलं. आता मी योग्य आशय थोडक्या शब्दातही वाचकांपर्यंत पोचवू शकते. आत्तापर्यंत मी काम केलं होतं ते फिचर एजन्सीसाठी, साप्ताहिक किंवा क्वचित कधी पेपरसाठी. संपर्कसोबत पुणे प्रतिनिधी म्हणूनही काम केलं होतं. पण उमेदनी मला एकाचवेळी संपादक आणि समन्वयक अशा दोन्ही जबाबदाऱ्या दिल्या. समन्वयक म्हणून एकाचवेळी 20-22 जणांशी संपर्कात राहायचं, विषयांची चर्चा करायची, त्यांना एकत्र बांधून ठेवायचं, टीमस्पिरिट टिकवायचं, ही खरी माझी परीक्षा. पण माझ्या टीमनं नेहमीच सहकार्य केलं. एकदा विषयांचे निर्णय झाल्यावर सगळ्यांनीच त्यानुसार काम केलं, नवं काही सुचवलं आणि स्वतःहून सतत संपर्कात राहिलेसुद्धा.
पेजच्या कितीतरी तांत्रिक बाबी सुरुवातीला कळायच्या नाहीत. हळूहळू पोस्टचा ‘रिच’ किती, वाचक संख्या, पोस्ट आधीच draft करून ठेवणं, नंतर त्या शेड्युल करणं यामुळं काम खूपच सोपं झालं. फेसबुकने ही शिस्त घालून घ्यायला एक प्रकारे मदतच केली. तांत्रिक बाबी शिकताना कळलं की पोस्टला मिळालेल्या लाईक हा एक अगदीच छोटा, खरं तर दुर्लक्षित करण्याचा भाग आहे. खरं महत्त्व आहे ते कमेंटला आणि शेअर होत होत घडून येणार्याो इंपॅक्टला.
उमेदचं काम सुरू असतांनाच आम्ही विकासपिडियासह वेबलेखन प्रशिक्षण शिबीर आयोजित केलं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. उमेदला काही नवे लेखकही यातून गवसले.
वर्षपूर्तीनिमित्ताने हे सगळं शेअर करावंसं वाटलं. सोशल मिडियावरच्या नव्या प्रयोगात सहभागी होण्याचं मोठं समाधान वाटत आहे. वाचकांचा छान प्रतिसाद मिळत आहे. लहान मुलं-मुली हा आमचा फोकस आहे. लवकरच आम्ही काही नव्या कल्पना घेऊन येऊ. शेवटी मला आमच्या जिल्हा प्रतिनिधींचे खास आभार मानायचे आहेत खास. सलग वर्षभर नवनवीन विषय शोधून ते उत्साहात लिहीत राहिले. त्यांच्या पोस्टसने पेजचा प्रभाव वाढत आहे.
 : वर्षा जोशी-आठवले, संपादक-समन्वयक



निसर्गाला हवी परतफेड : त्यासाठी माती, पाणी आणि पिकांत केले प्रयोग

परभणी तालुक्यातलं झरी गाव. इथं राहणाऱ्या कांतराव देशमुख यांनी स्वतःच्या शेतीत प्रयोग केलेच. पण गावालाही सोबत घेत त्यांनी परिसरात जलसंधारणाची कामं केली. त्यामुळे हा परिसर पाण्याच्या बाबतीत स्वयंपपूर्ण बनला आहे. 
कांतरावांनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली ७८ साली. त्यांच्याकडे एकूण ५५ एकर शेती. सुरुवातीला ते पारंपारिक पिकंच घेत. गहू, ज्वारी, तूर, मुग, सोयाबीन ही पिकं घेतली. कितीही कष्ट केले तरी उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे ही शेती परवडणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. मुख्य पिकांमध्ये आंतरपिकं घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे उत्पादनात वाढलं, तरी उत्पन्न वाढत नव्हतं. मग जरा वेगळ्या वाटेवर चालायचं ठरवलं. जे विकतंय त्याचंच उत्पादन घ्यायचं त्यांनी ठरवलं. मग विविध ठिकाणच्या यशस्वी शेतकर्‍यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. बाजारपेठांची माहिती करून घेतली. आणि मोसंबीची लागवड केली. सुरूवातीला पावणेचार एकरावर लावलेली मोसंबी पुढे ५० एकरापर्यंत वाढवत गेले. 

आता जवळपास ४० वर्ष ते मोसंबीचं उत्पादन घेत आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या भीषण दुष्काळातही ठिबक सिंचनद्वारे झाडांना पाणी देवून त्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला. मात्र पुन्हा दुष्काळाचा फटका बसला. नाईलाजाने मोसंबी बाग मोडून ते पेरू लागवडीकडे वळले आहेत. सध्या १४ एकरावर पेरू बाग असून गावात एक प्रोसेसींग युनिटही त्यांनी सुरू केले आहे. त्यांची फळं औरंगाबाद, नाशिकच्या बाजारात थेट विकली जातात. ज्यावेळी मोसंबीचं उत्पादन घेतलं जायचं तेव्हा कांतराव यांनी दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बेंगलोर, नागपूर, पुणे इथल्या व्यापार्‍यांना थेट माल पाठविण्याची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे विहीर आणि बोअरच्या पाण्यावर त्यांनी या फळबागा वाढविल्या आहेत. 
भारतात फळं खाणार्‍यांचं प्रमाण जास्त असल्याने चांगल्या फळांना मोठी मागणी असते. देशमुख म्हणतात, ‘निसर्गाशी जुळवून घेत मी शेती करत आलोय. मोसंबीचे मृग, आंबिया, हस्त असे तीन बहार असतात. पाणी नसताना मी मृग बहार घेतला. कारण यात एप्रिल-मे महिन्यांत बागांचं पाणी तोडावे लागते. पाणी नसलं की ताण द्यायचो. आंबिया बहार घेतला असता तर संपूर्ण उन्हाळ्यात झाडांना पाणी द्यावं लागलं असतं आणि पाण्याची अधिक गरज भासली असती. मी देशभरात अनेक ठिकाणी जाऊन शेतीतील वैविध्यपूर्ण प्रयोग पाहून आलोय. त्यांनी इस्त्रायल देशाचा दौराही केलेला आहे.
 कांतराव म्हणतात, ‘मी शेतावर काम करणारा माणूस आहे. शेतच मालकाला काम सांगत असते. शेतात सहज चक्कर मारली तर अनेक कामं आपल्या लक्षात येतात’.
आपण निसर्गाकडून खूप काही घेतो. पण परतफेड करत नाही, ही बाब कांतरावांना अस्वस्थ करते. ते सांगतात, आज आपण जे पाणी वापरतोय ते पूर्वजांनी साठवून ठेवलेलं होते. आपण त्याचा केवळ उपसा करत असून भविष्यासाठी पाणी साठवण्याची व्यवस्थाच नाही. कांतराव देशमुख यांनी 1989 मध्ये जलसंधारणाचं काम हाती घेतलं. विहीर पुनर्भरण केले.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले आहेत. ४० वर्षापासून ते शेतात हिरवळीचं खत घालतात. ते सांगतात, ‘आजकाल दर तीन महिन्याला पिकावर पिकं घेतली जातात. दुकानदाराच्या सांगण्यानुसार भरमसाठ खतं आणून घातली जातात. त्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडतं. मी सेंद्रीय पध्दतीची खतं वापरण्यावर अधिक भर देतो. शिवाय आम्ही शेणखतही मोठ्या प्रमाणात वापरतो. त्यामुळेच आमची जमीन अधिक भुसभुशीत आणि सुपीक बनली आहे’. अनेक संशोधक व शास्त्रज्ञांनी त्यांच्या जमिनीची, गांडूळाची पाहणी केल्याचंही ते सांगतात.
- बाळासाहेब काळे.

ते पाच दिवस तिला परत मिळणार !

आमदार डॉ भारती लव्हेकर यांच्या वर्सोवा मतदारसंघातल्या सर्व शाळा-कॉलेजात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग आणि डिसपोजल मशिन्स बसवली जाणार आहेत. असा कालसुसंगत उपक्रम करणारा - वर्सोवा हा महाराष्ट्रातला पहिलाच मतदारसंघ ठरणार आहे. हा ‘नवी उमेद’च्या जिव्हाळ्याचा, गेलं वर्षभर लावून धरलेला विषय असल्याने आज, या पोस्टद्वारे आम्ही भारतीताईंचं अभिनंदन करत आहोत. विशेष म्हणजे, भारतीताईंनी स्वतःहून, ही बातमी आम्हाला कळवली. मतदारसंघातली एखादी समस्या संवेदनशीलपणे जाणून घेऊन तड लावणार्‍या सर्वच आमदारांना पाठबळ द्यायला हवं.
मतदारसंघातल्या एखाद्या घरात मुलगी जन्माला आली, की भारतीताई स्वतः त्या तान्हुलीचं स्वागत करायला जातात, यावर ‘नवी उमेद’ने मागे लिहिलं आहेच. मासिक पाळीच्या दिवसांतलं मुलींचं आरोग्य हा खूप लक्ष देण्याचा, मुली – पालक - शिक्षक या सगळ्यांनाच जागरूक करण्याचा विषय. हे लक्षात घेऊन भारतीताईनी सुरू केलेल्या कामाने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या वर्सोवा मतदारसंघातल्या सर्व शाळा-कॉलेजांत आणि अन्य मोक्याच्या ठिकाणी मशिन्स बसवली जाणार आहेत. मशिनमधून नॅपकिन्स काढण्यासाठी रिचार्ज करता येण्यासारखं स्मार्ट कार्डही तयार केलं आहे.
उपक्रमाची सुरूवात उद्याच (२१ एप्रिल १७) चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर संस्थेच्या यारी रोड इथल्या शाळेत आणि कॉमर्स कॉलेजात होणार आहे.भारतीताईंच्या प्रयत्नांमुळे ही अत्याधुनिक सुविधा देणं शक्य झाल्याचं संस्थापक अजय कौल म्हणाले. संस्थेचे ऍक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत कशिद यांनी सांगितलं, “या निर्णयाने शाळेतल्या मुलींना फारच आनंद झाला आहे. शाळा आणि कॉलेज मिळून सुमारे अडीच हजार मुली या मशीन्सचा लाभ घेतील.” 
लातूर जिल्ह्यातल्या तांदुळजा जिप शाळा, पारधेवाडी आणि पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन इथे अलिकडेच एनजीओच्या पुढाकाराने मशिन्स बसवली गेली असल्याचं ‘नवी उमेद’ पेजवरून आम्ही प्रसिद्ध केलंच आहे. आता मुंबईतल्या शाळेचाही समावेश यात होत आहे.
आमदार निधीतून मुली-स्त्रियांसाठी ही मशिन्स बसवण्याची परवानगी मिळावी, ही मागणी भारती लव्हेकर यांनी लावून धरली आहे. तसा धोरणात्मक निर्णय अजून झाला नसला, तरी स्वतःच्या आमदार निधीतून मतदारसंघात मशिन्स बसवण्याची परवानगी त्यांनी मिळवली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे हे घडल्याचं भारतीताई म्हणाल्या.
भारतीताई या विधिमंडळाच्या महिला कल्याण समितीच्या सदस्य आहेत. समितीच्या दौर्‍यांदरम्यान जिप शाळा, आश्रमशाळा, वसतीगृह पाहाताना मासिक पाळीच्या काळातली मुलींची सॅनिटरी नॅपकिन्सची निकड भागवणं किती तातडीचं आहे, हे त्यांना जाणवलं. याचसाठी त्यांनी आणि अन्य आमदारांनी त्यासंबंधीच्या धोरणाचा आग्रह धरला आहे. युनिसेफच्या अजेंड्यावरही हा विषय अग्रक्रमाने आहे.
 भारतीताईंनी माहिती दिल्यानुसार वर्सोवा मतदारसंघातल्या सुमारे ५०० जागा मशिन्स बसवण्यासाठी हेरल्या आहेत. यात मेट्रो स्टेशन, बस डेपो, महिलांची स्वच्छतागृह, झोपड्या आणि चाळी असलेल्या वस्त्या आहेत. पोलिस स्टेशनकडूनही मशिन्सची मागणी आली आहे. मतदारसंघाबाहेरचे लोकही माझ्याकडे मशिन्ससाठी मागणी करताहेत, असं त्या म्हणाल्या. टप्प्याटप्प्याने मशिन्स बसवली जातील. सॅनिटरी नॅपकिन्सचा सुरळीत पुरवठा, मशिन्सचा मेंटेनन्स ही यापुढची आव्हानं आहेत. मुली आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागृती करणंही सुरूच ठेवणार असल्याचं भारती लव्हेकर म्हणाल्या. 
- समता रेड्डी, लता परब

Wednesday, 3 May 2017

‘आम्हाला पण शिकवा’

व्यवसायाने सॉफ्टवेअर सल्लागार. शिक्षण-नोकरीसाठी परदेशात वास्तव्य झालेलं. शेतीची आवड म्हणून मूळ गावी जाणंयेणं... अशी पार्श्वभूमी असलेल्या अमोद जोशी यांनी ३०-३५ शाळकरी मुलांच्या शिक्षणाचं पालकत्वच घेतलं आहे. त्यांनी सांगितलं, “अधनंमधनं आरजपाडा (तलासरी) इथं काकांकडे जात असतो. तिथं कामाला असणाऱया गावकरयांच्या मुलांची अभ्यासात गती नाही, हे बघितलं. मला गणिताची आवड. म्हणून मुलांना गणित शिकवायला सुरुवात केली. एका वर्षात दीप आणि सूरज दुबे या दोघांनी गणितात इतकी प्रगती केली की गावातली बरीच मुलंमुली ‘आम्हाला पण शिकवा’ म्हणू लागली…” 

बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार, संख्यासराव (३६ – ६३ सारख्या संख्यांमध्ये होणारी गल्लत आदी समस्या टाळण्यासाठी) आणि पाढे हे प्राथमिक शाळेच्या मुलांना शिकवण्यासाठी अमोदनी मोबाइल प्रोग्राम तयार केला आहे. एका मोबाइलवर एका वेळी चार मुलं उदाहरणं सोडवू शकतील अशी व्यवस्था यात केली आहे. खूप उदाहरणं सोडवायला मिळत असल्यामुळे सरावाचा हेतू साध्य होतो. तासाला १०० गणितं हा वेग मुलांनी गाठला आहे. दीप- सूरजच्या शाळांमित्रांचा ओढा जोशींच्या घराकडे वाढला आणि दोन वर्षांत त्यांच्याकडे शिकायला येणार्यांशची संख्या ३५वर गेली. या सगळ्यांना मोबाइल मिळवून देऊन अमोदनी अभ्यासाची व्यवस्था केली. गणित शिकणं आनंदाचं झालं. 
पण विद्यार्थ्यांचे इतरही विषय कच्चे. कारण पालक अशिक्षित नि सामाजिक वातावरण मागास. अमोद यांच्या पत्नी तेजस्विनी आफळे शुद्धलेखन, इतिहास, भाषाविषयांचं आकलन वाढवण्यासाठी मुलांची शिकवणी घेऊ लागल्या. त्या व्यवसायानं आर्किऑलॉजिस्ट. अमोद यांच्यासारखंच त्याही महिन्यातले १५ दिवस गावी जाऊन शिकवतात. 
गावात शाळा दोन. जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते सातवी. आठवी ते बारावीचं शिक्षण ‘बालकल्याण मंदिर’च्या शाळेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकबळ कमी. ४५० विद्यार्थ्यांना ५ शिक्षक हे प्रमाण. त्यामुळे जोशींच्या प्रयत्नांचा शिक्षकांना फायदाच झाला. निस्वार्थी हेतू, इनोव्हेटिव्ह कल्पना यामुळे शाळेनं त्यांच्या सहकार्याचं स्वागतच केलं. मित्रांच्या मदतीनं जुने मोबाइल मिळवून अमोदनी शाळेत ‘मोबाइल लायब्ररी’ सुरू केली. नोव्हेंबर २०१६ पासून सुरू केलेल्या या लायब्ररीला तुफान प्रतिसाद मिळाला.
शिक्षकांच्या कमतरतेवर त्यांनी उपाय सुचवला. पहिली ते चौथीच्या मुलांचा संख्यावाचनाचा शिकवणीवर्ग शाळेच्याच वेळात घ्यायचा आणि तिथे वरच्या वर्गातल्या मुलांनी शिकवायचं. सहावी, सातवी, आठवीतल्या मुलांना तयार करण्यात आलं. आपल्या गावासाठी काहीतरी करणं, ही तुमची जबाबदारी आहे, असं त्यांना समजावलं. आज अभ्यासामध्ये गुणवत्ता वाढवण्याचं काम मुलं अतिशय उत्तमरीत्या करत आहेत. 

 अमोद सांगतात, “शाळा सुटल्यावर संध्याकाळी अभ्यासासाठी येतानाही मुलं उत्साही असतात. आणि यात मुली ७० टक्के आहेत. डेडिकेशन, चिकाटी म्हणजे काय, हे मुलींकडून शिकावं.”
आता उभयतांनी ‘पालकत्व’ घेतलं म्हटल्यावर मुलांचा अभ्यासाचा कंटाळा घालवणंही आलंच. बसून गणितं करून फार वेळ झाला की सायकलवरून चक्कर मारून येता येतं. वीकएन्डला डोंगरांवर भ्रमंतीचा कार्यक्रम असतो. या वेळी मात्र निसर्गवाचनाची गुरू मुलं असतात!
तलासरी तालुक्यातल्या १५४ शाळांतल्या सर्वच मुलांना प्राथमिक स्तरावरचं गणित आलंच पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत, अशी अमोद जोशींची तळमळ आहे. प्राथमिक स्तरावरचं गणित केवळ १७ ते १८ टक्के मुलांनाच जमतं, ही आकडेवारी किती वेदनादायक आहे, असं ते म्हणतात. मुलाला शाळेत घातलं की आपली जबाबदारी संपली, असं पालकांनी करू नये. अशिक्षित पालकही मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतात, असं त्यांचं सांगणं.
‘प्रथम’चं तलासरीमध्ये काम आधीपासून असल्यामुळे गणित क्षमताविकनसनाचं काम या संस्थेच्या साथीनं पुढं न्यायचं, असं आता ठरत आहे. 
प्रवास पालकत्वाचा - अमोद जोशी .
- सुलेखा नलिनी नागेश

ए जिंदगी, गले लगा ले

निळ्या डोळ्यांच्या गो-यापान योगिताला डोळ्यांचा काही त्रास असेल, असं कोणालाच वाटलं नाही. जन्मानंतर काही महिन्यांतच तिला डायरिया-गॅस्ट्रो झाला. मुलगी जगते की नाही, इतकी वाईट स्थिती. इथचं जिद्दीची पहिली चुणूक योगितानं दाखवली. काही दिवस हॉस्पिटलमध्ये घालवून ती घरी आली. थोड्या दिवसातच ती आजूबाजूला बघत नाही, हे लक्षात आलं. मग सहाच महिन्याच्या या तान्ह्या बाळीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. लेन्सेस बसवल्या. दुर्देवानं ऑपरेशन अयशस्वी झालं. वय वाढलं, मग थोडं दिसतंय, म्हणून शिशुवर्ग सुरु झाला. इंग्लिश-देवनागरी अक्षरं पाटीवर गिरवणं चालू झालं. पाच वर्षांची झाली. पण बाकी हालचाली खूप कमी, चालणं-बोलणंही नव्हतंच. काही नातेवाईकांनी तर ती मतीमंद असल्याचीही शंका काढली. त्यातूनही तिची शिकायची इच्छा दिसत होतीच. 
मग डॉक्टरांच्या सल्ल्याने कमला मेहता अंध विद्यालयात तिला नवव्या वर्षी पहिलीत प्रवेश मिळाला. सोमवार ते शुक्रवार दादरला हॉस्टेलमध्ये आणि शनिवार-रविवार आजी-आजोबांकडे जोगेश्वरीला असं चक्र सुरु झालं.
 पुढे वडील सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी गावी शालोपयोगी साहित्याचं दुकान काढलं. त्यामुळे आई-वडील गावीच राहायचे. योगिताचं अभ्यासाबरोबर संगीतशिक्षणही चालू होतं. तिचा संगीतामधला रस पाहून, शाळेने ‘अल्लारखा’ संस्थेची शिष्यवृत्ती दिली. त्यामुळे रीतसर तबल्याचं शिक्षण घेता आलं. अभ्यास आणि संगीत दोन्ही छान चालू होतं. दहावीपर्यंत डाव्या डोळ्याने थोडं दिसत होतं. पण परीक्षेच्या आधी डोळ्याला अपघात झाला. डॉक्टरने मेंदू कमजोर होतोय, त्यावर ताण नको, असं सांगितलं. आणि संगीत किंवा शिक्षण यापैकी एकाचीच निवड करायला सांगितली. प्रयत्नशील योगिता हार कसली मानतेय ? संगीत आणि शिक्षण - दोन्ही चालू राहिलं. इतिहासामध्ये एमए देखील झालं. 
सध्या ती संगीत विशारदची तयारी करते आहे. तिचा आवडता कलाप्रकार लोकसंगीत. तबला, ढोलकी, मृदंग, ताशा-दिमडी, हलगी, पखवाज, खंजीरी, टाळ अशी जवळपास ३०-३५ वाद्य ती वाजवते. विशेष म्हणजे तालवाद्य ती रेडिओवर ऐकून शिकली आहे. कांचनताई सोनटक्केंच्या नाट्यशाळा संस्थेशी ती दुसरीपासून जोडली आहे. तिथे तिने अभिनय, पार्श्वसंगीत, गाणं, नाटक असं सगळं केलंय. 
 मुंबई विद्यापीठाच्या फेस्टिवलमध्ये योगिताच्या गटानं सुवर्णपदक मिळवलं. कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडन्ट ट्रॉफी तर योगिताचीच! आज ती अस्मिता विद्यालय, जोगेश्वरी इथे सर्वसाधारण मुलांना संगीत आणि इतिहास शिकवते. आकाशवाणीच्या बातम्या ऐकणं ती कधीच चुकवत नाही. केंद्रिय दिव्यांगण सशक्तीकरण विभागाच्या ‘क्रिएटिव्ह adult’ या क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी २०१६च्या राष्ट्रपती पुरस्काराची ती मानकरी. स्वतःला दृष्टिहीन न समजता - मी दृष्टिबाधीत आहे, असं ती सांगते.
इतक्या वर्षाच्या प्रवासाने आता आपल्याला जगाकडे पहायची दृष्टी मिळाल्याचं ती सांगते. आपण स्वतःला आहे तसं स्वीकारलं, तर न्यूनगंडाचा प्रश्नच येत नाही, असं ती म्हणते. मेडिटेशन, शास्त्रीय संगीत हे तिच्या आनंदी राहण्याची प्रेरणा. आनंदी राहा, आनंदी जगा आणि आनंद पसरवा हे तिचं जीवनसूत्र. तिच्या मनमोकळ्या हास्याचं रहस्य हेच आहे.
जगण्यासाठी दृष्टीपेक्षाही सकारात्मक दृष्टिकोन हवा, हेच योगिता आपल्याला शिकवते.
 - मेघना धर्मेश.

ग्रामस्थांच्या सहभागाने शिक्षणही आलं..!

स्पर्धेचं युग, त्यात इंग्रजीशिवाय पुढे जाता येणार नाही. मराठी शाळेत शिकून भविष्य नाही, अशी कारणं सांगून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यांचा विचार पालक करतात. अनेक जण मराठी शाळांचा दर्जा चांगला नाही म्हणूनही मुलांना मराठी शाळेत घालण्यााचे टाळतात. हे सध्याचं चित्र. यातूनही काही शिक्षक व ग्रामस्थ असलेल्या शाळा टिकवण्याचे आणि त्यांचा दर्जा सुधारण्यााचे प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न बीड जिल्ह्यात घडतो आहे. माजलगाव तालुक्यातील एक हजार लोकसंख्येचं जायकोवाडी गाव.

ग्रामस्थ, शिक्षण समिती व जिल्हा परिषद यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक माणिक राठोड यांनी शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प केला. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी आणि त्यांनी शिक्षणात रमावं यासाठी काय करता येर्इल, हा विचार सुरु झाला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी राठोड यांनी १५ ऑगस्ट २०१६ रोजी ग्रामस्थांची शाळेत बैठक घेतली. पहिली ते पाचवीचे विद्यार्थी होते ९०. पैकी अनेक विद्यार्थी गैरहजर असत. या विद्यार्थांना शाळेत आणण्याासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली. शाळेत रंगरंगोटी करण्याबरोबच अद्ययावत ई-लर्निंग कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढच्या आठ-दहा दिवसातच ग्रामस्थ आणि शिक्षकांनी तब्बल तीन लाख रूपयांचे वर्गणी गोळा केली. त्यातून एका वर्गात डीजीटल कक्ष स्थापन करण्याात आला. शिवाय बोलक्या भिंती, ज्ञानरचानवादावर आधारित फरशीकाम, वृक्षारोपण आणि शौचालय उभारण्यात आलं. प्रोजेक्टरही खरेदी करण्यात आला. 
शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शिक्षकांसह ग्रामस्थांनी एकत्र येत चोख काम केलं. या कष्टाचं फलित आता शाळेत पाहायला मिळतंय. शाळेत प्रत्येक दिवशी ९७ ते ९८ टक्के उपस्थिती वाढली. पंचक्रोशीत गावाचं कौतुक तर झालंच. शिवाय अन्य शाळांच्या तब्बल एक हजार शिक्षक व मुख्यााध्याोपकांनी शाळेला भेट दिली. यापैकी अनेक शिक्षकांनी शाळेच्या‍ नोंदवहीत ‘शाळा तर आहेच, याबरोबर शिक्षणही आहे’ अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
- हनुमंत लवाळे.